‘धीस हॅपन्स ओन्ली इन इंडिया’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2018   
Total Views |



मोदींना कुणा बुद्धिजीवींना आश्रित ठेवायची म्हणूनच भीती वाटत असावी. निंदक इतके मदतनीस ठरत असतील, तर कुठला राजा सत्ताधीश भाट खुशमस्कऱ्यांची फौज कशाला बाळगणार ना? तेव्हा अशा पुरोगाम्यांनी राहुल गांधींचे गुणगान अशाच आवेशात व जोशात चालू ठेवावे. आणखी आठ-दहा महिन्यांत मोदींना पुन्हा लोकसभा जिंकायची आहे. त्यात पुरोगामी बुद्धिमतांच्या तोडीची मदत कोणी हिंदुत्ववादी विचारवंत नक्कीच करू शकणार नाही.

 

रोमन साम्राज्य दीर्घकाळ टिकून राहिले, याचे कारण देखील काही प्रमाणात तरी ग्रीक बुद्धिजीवी मंडळी आणि रोमन राज्यकर्ते या दोघातील घनिष्ठ सख्यत्व हेच होय. जीत ग्रीकांना वाटत होते की, ते जेत्या रोमनांना कायदा व सुसंस्कृततेचे धडे देत आहेत आणि म्हणून ग्रीक बुद्धिजीवी स्वत:वर बेहद्द खुश होते. रोमन सम्राट निरोचा ग्रीकांनी जो सन्मान केला त्याची लांबलचक वर्णने उपलब्ध आहेत. ही वर्णने एखाद्याने वाचली, तर ग्रीकांबद्दल त्याला घृणाच वाटेल आणि आश्चर्यसुद्धा वाटेल. कारण सम्राट निरो शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारच्या व्याधींनी पछाडला असूनसुद्धा ग्रीकांमधील चांगली सुशिक्षित मंडळी त्याची स्तुती करीत होती. ग्रीक बुद्धिमंतांनी निरोचा सत्कार करण्याचे कारण हे होते की, तो ग्रीक बुद्धिमंतांचे तोंड भरून कौतुक करीत असे आणि त्या कौतुकाची परतफेड म्हणून ते बुद्धिमंत एक अत्यंत बुद्धिमान कलासक्त राजा म्हणून तोंड फाटेस्तोवर त्याची स्तुती करीत होते. (‘झुंडीचे मानसशास्त्र’ पृष्ठ २०४)

 

शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा चालली होती आणि त्यापेक्षा मोठी रणधुमाळी सर्वभाषिक वाहिन्यांवर माजलेली होती. त्यात अविश्वास प्रस्ताव आणि त्यातल्या मुद्दे तपशीलांसह विविध नेत्यांची भाषणे एका बाजूला राहिली. राहुल गांधी यांचा आवेश व वर्तन याचीच चर्चा सर्वाधिक झाली. राहुलच्या लहानसहान हालचाली व कृतीचे समर्थन वा टवाळी त्यातून रंगलेली होती. त्यातही कौतुक शोधणाऱ्या विद्वानांची भाष्ये ऐकली आणि दिवंगत विचारवंत विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ पुस्तकाचे स्मरण झाले. त्यातलाच हा उतारा आहे. काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर दीर्घकाळ या देशावर राज्य का केले? त्याचे नेमके उत्तर त्या पुस्तकाच्या उपरोक्त परिच्छेदात आलेले आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रीक बुद्धिजीवी वर्गाची शुक्रवारी अनेक पुरोगामी विचारवंत अभ्यासकांनी आठवण करून दिली.

 

रस्त्यावरच्या सामान्य माणसाला किंवा खेड्यापाड्यातल्या खेडूताला जरी ती दृष्ये दाखवली, तरी त्यातला खुळेपणा कोणीही सहज सांगू शकतो. पण त्यातही उपरोधिक आशय शोधण्याची भारतीय पुरोगामी विचारवंतांची कला, अक्षरश: कौतुकास्पद आहे. कुठल्याही देशाच्या संसदेत असे चित्र बघायला मिळणार नाही की, कुठल्या पक्षाचा वरिष्ठ नेता जाऊन प्रतिपक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या गळी पडलेला दिसणार नाही. एखाद्या प्रसंगी संसदेत हाणामाऱ्या वा फेकाफेक हिंसा झालेली असेल. पण असे चमत्कारीक प्रेमभावाचे दृष्य बघायला मिळणार नाही. प्रतिपक्षाच्या नेत्याची शेलक्या भाषेत निंदा करायची आणि मग त्यालाच आपली प्रेमाची शिकवण म्हणून गळ्यात पडायला धाव घ्यायची, हा चमत्कार फक्त राहुल गांधीच करू शकतात. त्यापेक्षा कौतुकाची बाब म्हणजे त्यातले औदार्य शोधू शकणारे बुद्धिजीवीही आपल्या देशात उपलब्ध आहेत. आपल्या अशा वागण्यातून प्रतिपक्षाला खिल्ली उडवण्याची आयती संधी देणाऱ्या खुळेपणाला विजय ठरवणाराही अजब शहाणपणा फक्त आपल्या देशातच मिळू शकतो. म्हणून मग त्या ग्रीक विचारवंतांचे स्मरण झाले. ते निरोचे कौतुक कशाला करायचे आणि निरो, तत्कालीन साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना कशासाठी देत असे, त्याचे नेमके स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकते. किंबहुना दोन वर्षांपूर्वी अचानक पुरस्कार वापसीचे नाटक कशामुळे हाती घेण्यात आले, त्याचेही धागेदोरे सापडू शकतात. सामान्य लोकांना अशा बुद्धिजीवींचा तिटकारा कशाला निर्माण झाला आहे, त्याचाही खुलासा होऊ शकतो. जो खुळेपणा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघता येतो आणि समजू शकतो, त्यात शहाणपणा शोधणाऱ्या बुद्धिमतांकडे लोक मग कुठल्या नजरेने बघू शकतील? देशातील पुरोगामी बुद्धिमतांची आज केविलवाणी स्थिती होऊन गेलेली आहे. कारण कुठल्याही आश्रित विचारवंतांची त्यापेक्षा वेगळी स्थिती होत नसते.

 

वस्त्रहरण होताना द्रौपदीने दुर्योधनाच्या दरबारातील बुद्धिमतांना एक प्रश्न विचारला होता, “जे आधीच दास होऊन गेलेत, त्यांना पत्नी म्हणून कुणा व्यक्तीला पणाला लावण्याचा अधिकार असू शकतो का?” त्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच होते. पण ते उत्तर उच्चारण्याची हिंमत द्रोणाचार्य, कृपाचार्य वा द्रोणाचार्य दाखवू शकलेले नव्हते. कारण ते बुद्धिमान जरूर असतील. पण त्यांनी दुर्योधनाच्या सत्तेचा पट्टा आपल्या गळ्यात अडकवून घेतलेला होता. त्यांची बुद्धीही दास झालेली असेल, तर त्यांना राजाला मान्य असलेले बोलण्याचे स्वातंत्र्य कसे असू शकते? ज्यांनी आधुनिक कालखंडात नेहरू राजघराण्याला आपली बुद्धी गहाण दिलेली आहे, त्यांना स्वयंभूपणे आपली बुद्धी वापरून कुठलेही मत कशाला व्यक्त करता येईल? त्यापेक्षा कुठल्याही खुळेपणात शहाणपणा सिद्ध करण्यातच ‘शहाणपणा’ असतो ना? म्हणून राहुल गांधी यांनी लोकसभेत जी सर्कस केली, त्याचे गुणगान करण्यापलीकडे अशा लोकांची बुद्धी जाऊ शकत नाही. एकदा ही बौद्धिक गहाणवट स्वीकारली, मग सोनिया गांधींमध्ये इंदिरा गांधी बघता येतात आणि राहुल गांधींमध्ये भविष्यातले नेहरूही शोधता येत असतात. त्याच्या बालीश चाळ्यांमध्ये धूर्त डावपेचही सिद्ध करता येतात आणि सगळ्या निवडणुका हरूनही ‘जिंकलास वत्सा’ असा आशीर्वादही तोंड भरून देता येत असतो. कारण जिंकण्याला काहीही अर्थ नसतो. जिंकण्यावर शिक्कामोर्तब पुरे असते. त्यामुळेच आणखी एक नैतिक विजय हा राहुल गांधी मिळवून गेले आहेत, किंबहुना एका निवडणुकांचा अपवाद सोडल्यास राहुल गांधी कायम जिंकत राहिलेले आहेत. कारण ते जिंकण्यासाठीच जन्माला आलेले असल्याचे पुरोगामी मनुवादात नमूद केलेले आहे. त्यानुसार चालतात व बोलतात, त्यांना़च पुरोगामी विचारवंत बुद्धिजीवी म्हणून मान्यता मिळत असते. सहाजिकच अविश्वास प्रस्ताव अशा नैतिक बळावर जिंकला गेलेला असला, तर नवल नाही.

 

मागल्या अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणात राज्यसभेत रेणुका चौधरी या काँग्रेसी सदस्य हास्याचा गडगडाट करून व्यत्यय आणत होत्या. तर त्यांना सभाध्यक्षपदी बसलेले व्यंकय्या नायडु समज देत होते. तेव्हा त्यांना थांबवताना मोदींनी उपरोधिक भाष्य केलेले होते. “रामायण कथामाला संपल्यापासून असे हास्य ऐकायचे सौभाग्य कुठे मिळाले आहे? रेणूकाजींना हसू द्यावे,” असे मोदी म्हणाले. त्याचा अर्थ व उपरोध अनेकांच्या लक्षात यायलाही काही वेळ गेला. पण तोंडाने वा शब्दाने ‘शूर्पणखा’ असा शब्द उच्चारल्याशिवाय मोदींनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवलेले होते. तर बहुतांश पुरोगामी शहाण्यांना औचित्याचे स्मरण झालेले होते. जो शब्द मोदींनी उच्चारला नाही, तो जणू त्यांनी उच्चारला असावा, अशा थाटात मोदींना तेव्हा औचित्य शिकवले जात होते. व्यवहारात त्याला ‘उपरोध’ म्हणतात. पण त्या उपरोधालाच वक्तव्य ठरवून हातपाय आपटले गेले होते. ज्यांना त्यातले औचित्य उशिरा दिसले, त्यांना शुक्रवारच्या राहुल गांधीकृत वैगुण्यातले औचित्य मात्र तात्काळ उमजले होते. यासारखी बौद्धिक दिवाळखोरी फक्त दरबारी खुशमस्कऱ्यांमध्येच सापडू शकते. अन्यथा बालिशपणात शहाणपणा आणि धूर्तपणा कोणी शोधला असता? किंबहुना अशा बुद्धिजीवींवर मोदी खुश असतात. कारण आपल्या असल्या बौद्धिक दिवाळखोरीने याच शहाण्यांनी मोदींना पंतप्रधानपदी आणून बसवलेले आहे. मोदींना कुणा बुद्धिजीवींना आश्रित ठेवायची म्हणूनच भीती वाटत असावी. निंदक इतके मदतनीस ठरत असतील, तर कुठला राजा सत्ताधीश भाट खुशमस्कऱ्यांची फौज कशाला बाळगणार ना? तेव्हा अशा पुरोगाम्यांनी राहुल गांधींचे गुणगान अशाच आवेशात व जोशात चालू ठेवावे. आणखी आठ-दहा महिन्यांत मोदींना पुन्हा लोकसभा जिंकायची आहे. त्यात पुरोगामी बुद्धिमतांच्या तोडीची मदत कोणी हिंदुत्ववादी विचारवंत नक्कीच करू शकणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@