कोल्डस्टीम गार्डस् आणि कॅप्टन लिडेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
भूमध्य समुद्रात इजिप्तच्या अलेक्झांड्री या बंदराजवळ अचू कीरच्या उपसागरात ब्रिटिश आणि फ्रेंच नौदलांमध्ये घनघोर लढाई झाली होती. ब्रिटिशांनी फ्रेंच ध्वजनौकाच बुडविली आणि फ्रेंच नौदलाचा साफ धुव्वा उडवला.
 

आर्थर वेलस्ली उर्फ ड्युक ऑफ वेलिंग्टन याच्या सेनापतित्वाखाली युरोपातल्या नऊ राष्ट्रांच्या फौजा वॉटर्लूच्या रणमैदानावर एकवटल्या. समोरच्या बाजूला होती फ्रेंच सेना आणि तिचा सेनापती नेपोलियन बोनापार्ट. खरी लढत होती इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातच. घमासान झुंजीच्या अखेरीस ड्युक ऑफ वेलिंग्टन जिंकला. पहिल्या महायुद्धात विमानांचा वापर लष्करी कामासाठी सुरू झाला. विमानातून शत्रूवर बॉम्ब टाकता येईल किंवा विमान कमी उंचीवर नेऊन, शत्रूवर मशीनगनचा भडिमार करता येईल, याची कल्पनाच अँग्लो-फ्रेंच व जर्मन दोघांनाही आली नाही. त्यामुळे उभय पक्षांनी विमानांचा वापर शत्रूच्या प्रदेशात टेहळणी करण्यासाठी केला, पण लवकरच विमानांची मारक शक्ती दोघांच्याही लक्षात आली आणि दोघांचीही दरोबस्त वायुदलं उभी राहिली. वर दिलेली तीन उदाहरणं ब्रिटिश नौदल, ब्रिटिश लष्कर आणि ब्रिटिश वायुदल यांच्या संबंधीची आहेत. आजही ब्रिटिश नौदल अबू कीर बे (उपसागर) च्या लढाईतल्या विजयाचा स्मृतिदिन साजरा करतं. ब्रिटिश लष्कर वाटच्या युद्धातल्या विजयाची स्मृती जागवतं. तर ब्रिटिश वायुदल त्याच्या स्थापनेचा दिवस साजरा करतं. आणि ब्रिटिश सेनादलच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक देशाची सेनादले अशा रीतीने त्यांच्या-त्यांच्या इतिहासातले विजयाचे, पराक्रमाचे, गौरवाचे दिवस आवर्जून साजरे करीत असतात. आज सेनादलांमध्ये जे सैनिक काम करतात, त्यांच्या मनावर देशभक्तीचा, शौर्याचा आणि विजयाचा आणखी एक संस्कार करणं, झुंजार मनोवृत्तीच्या मात्रेचा आणखी एक वळसा देणं, हेच अशा कार्यक्रमांचं उद्दिष्ट असतं, त्यामुळेच जगातली सर्व सेनादले अशा परंपरा आवर्जून पाळतात.

 

ब्रिटिश सेनादलांचं उदाहरण देण्याचं कारण एवढंच की, स्वतंत्र भारताच्या तिन्ही सेनादलांचं गठण ब्रिटिश धर्तीवरच झालं आहे. म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार उभारलेली ही तिन्ही सेनादले ते इथून निघून गेल्यावरही आपण त्यांच्याच पद्धतीनुसार चालवत आहोत. भूदलातल्या अनेक पलटणी त्याचे जे विजयदिन साजरे करतात, ते विजय ब्रिटिशांनी मिळवलेले होते. १९६२ साली चीनकडून पराभवाचा फटका खाल्ल्यावर भारतीय सेनादलांचं पुनर्गठन हळूहळू सुरू झालं. नंतरच्या काळात १९६५, १९७१ अशी दोन मोठी नि १९९९ चे छोटे, अशी आपली पाकिस्तानबरोबर तीन युद्ध झाली. त्यात आपल्या सैनिकांनी चांगलाच पराक्रम गाजवला. म्हणजे आता आपल्याकडेही नव्या विजय परंपरांसाठी अवकाश निर्माण झाला. या वर्षी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ३० एप्रिल १९४५ या दिवशी हिटलरने आत्महत्या केल्यावर ८ मे १९४५ च्या मध्यरात्री जर्मनीने हत्यार टेकवले. पूर्वेकडचं युद्ध आणखी तीन महिने लांबलं. कारण जपान हत्यार टेकवायला तयार नव्हता. १९४५ च्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यावर मात्र जपाननेही शरणागती पत्करली.

 

सध्या दुसऱ्या महायुद्धातले विजेते ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया, त्या युद्धातल्या विजयाचा 73 वा स्मृतिदिन साजरा करीत आहेत. युद्धात काही विशेष कामगिरी केलेल्या पलटणी, त्यांच्या त्या विशेष कामगिरीचे वेगळे स्मृतिदिन साजरे करीत आहेत. त्यानिमित्ताने काही दुर्लक्षित हकीगती उजेडात येत आहेत.

 

ब्रिटिश लष्करातल्या कोल्डस्ट्रीम गार्डस या नावाने ओळखल्या जाणार्‍या रेजिमेंटने लंडनच्या ’इंपीरियल वॉर म्युझियम’मध्ये आपला विजयदिन नुकताच साजरा केला त्यावेळी कोल्डस्टीम् गार्डस कर्नल असलेले जनरल सर मायवेल रोझ या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित होते. कोल्डस्ट्रीमगार्ड्स रेजिमेंटला व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवून जाणाऱ्या कॅप्टन इयान लिडेल याची आठवण जागवण्यात आली.

 

कॅप्टन इयान लिडेल महायुद्ध सुरू झाल्या झाल्या म्हणजे १९३९ सालीच लष्करात भरती झाला. त्याच्या पथकाला राजकुटुंबाचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमण्यात आलं. सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची होती. कारण राजा, राणी त्यांचे कुटुंबीय यांचा नित्य संपर्क येत होता. आपल्या गंमत्या स्वभावामुळे कॅप्टन लिडेल राजकुटुंबाचा आवडताही झाला होता, पण मनातून तो प्रत्यक्ष रणांगणावर जाण्यासाठी फार-फार उत्सुक होता.

 

अखेर १९४५ साली, युद्धाच्या अगदी अखेरच्या काळात कॅप्टन लिडेलची बदली सरळ आघाडीवर झाली. कोल्डस्ट्रीमगार्ड्स हे त्याचं पथक उत्तरेकडून जर्मनीत पुसणार होतं. या कालखंडातली दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांची मनस्थिती मोठी गंमतीशीर होती. आपण निश्चित विजयी होणार आहोत हे सगळ्यांनाच दिसत होतं. त्यामुळे उगीचच चमकदार लढाया करून, मुसंडी मारण्यापेक्षा शांतपणे, हळूहळू पुढे जायचे; तोफा, रणगाडे आणि विमाने यांच्या मदतीने जर्मन सेना भाजून काढायची नि पुढे सरकायच, असं दोस्तांचं एकंदर धोरण होतं. थोडक्यात, समोरासमोरची लढाई टाळायची, म्हणजेच मनुष्यहानी टाळायची. सर्वसामान्य सैनिकांनाही असंच वाटत होतं.

 

बलिदान वगैरे करून, अमर होण्यापेक्षा, जीव वाचवून विजयाचा आनंद उपभोगू, असंच त्यांना वाटत होतं. हा मनुष्यस्वभावच आहे. विजय प्रत्यक्ष मिळण्याअगोदरच, विजयाच्या कल्पनेनेच माणूस सुस्तावतो.

 

कोल्डस्ट्रीमगार्ड्स उत्तर जर्मनीत घुसले आणि एम्स नदीच्या काठावर येऊन उभे राहिले. नदीवरचे सर्व पूल माघार घेणाऱ्या जर्मन सेनेने उद्ध्वस्त केले होते. फक्त एक पूल त्यांनी स्वत:च्या सोयीसाठी शिल्लक ठेवता होता. अर्थात तोदेखील स्फोटकांच्या तारांनी वेढलेला होता आणि पुलापलीकडे जर्मन सैनिक खंदक खणून सज्ज होते. थोडक्यात कोणत्याही क्षणी पूल उडवून दिला जाऊ शकत होता. आगेकूच करणाऱ्या सैन्याला नेहमीच अशा अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर काय तोड काढावी याबद्दल विचार चालू असताना कॅप्टन लिडेल पुढे सरसावला आणि त्याने आपली योजना वरिष्ठांपुढे ठेवली. योजना तशी अगदी साधी होती. शेरमन रणगाड्यांनी जर्मन खंदकांच्या पाठीमागे भडिमार करायचा, तोफखान्याने जर्मन खंदक आणि पूल यांच्यामध्ये गोळे फेकून, एक धुराचा पडदा म्हणजे लष्करी भाषेत ’कॉमोफ्लॉज’ निर्माण करायचा. मग फक्त एक सैनिक पुलाच्या अलीकडला लाकडी ओंडक्यांचा अडथळा ओलांडून, पुलावर उतरेल. पुलाला जोडलेल्या स्फोटकांच्या तारा कापून टाकेल. त्याच्याकडून इशारा मिळताच शेरमन रणगाडे आग ओकतच पुलावरून पुढे सरकतील.

 

वरिष्ठांना योजना पसंत पडली, पण पुलावर जाणारा एक सैनिक कोण असावा याबद्दल विचार सुरू झाला, कारण हा सैनिक मरणार ही गोष्ट नक्की होती, कॅप्टन लिडेल म्हणाला, ”मीच जातो. आणि लक्षात ठेवा; मी कामगिरी फत्ते करून परत येणार. मी मरणार नाही.” बैठकीतले सगळेजण थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले.

 

दुसरा दिवस उजाडला. रिमझिम पाऊस पडत होता. एम्स नदीचा काठ नुसता चिकचिकीत होऊन गेला होता. ठरल्याप्रमाणे शेरमन रणगाड्यांनी जर्मन खंदकांच्या पिछाडीवर भडिमार सुरू केला. उखळी तोफांनी खंदक आणि पूल यांच्यामध्ये गोलंदाजी करून धुराचा कृत्रिम पडदा उभा केला. कॅप्टन इयान लिडेल निघाला. त्याच्या पलटणीतल्या एका मित्राने त्याला स्फोटकांच्या तारा कापण्यासाठी कात्री देऊन सांगितलं, ’ही ऐतिहासिक कात्री आहे, बरं का! माझ्या वडिलांनी पहिल्या महायुद्धात जर्मन खंदकांभोवतीच्या तारा कापण्यासाठी ही कात्री वापरली होती. तेव्हा ती जपून आण असं बोलून, त्याने इयानच्या पाठीत दणादणा गुद्दे मारले व त्याता मिठी मारली.

 

चिकचिकीत जमिनीवरुन सरपटत इयान पुलाच्या दिशेने सरकू लागला. त्यांच्या मित्रांचे नि वरिष्ठाचे हजारो डोळे त्यांच्याकडे रोखलेले होते. इयान पुलावरच्या लाकडी ओंडक्यांच्या अडथळ्यापर्यंत पोचला. त्या अडथळ्यावर चढताना त्याला हातातल्या स्टेनगनची अडचण होऊ लागली. त्याने स्टेनगन चक्क बाजूला ठेवली. बघणाऱ्या मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला. बापरे! आता याच्याकडे शस्त्र नाही, तेवढ्यात इयानेने अडथळा ओलाडून स्फोटकांच्या तारा कापायला सुरुवात केली पुलाची वरची बाजू साफ झाली मग स्फोटकांच्या तारा करायला सुरुवात केली. पुलाची वरची बाजू साफ झाली. मग इयान सारखा लोंबकळत पुलाच्या खाली आला. तिथल्या तारा त्याने भराभर कापल्या. एवढं होईपर्यंत पुलावर गस्त घालणाऱ्या जर्मन संत्र्याला संशय आला. इयान पुन्हा पुलावर येतो, तर समोर जर्मन संत्री. त्याचा हात त्याच्या स्टेनगनच्या ट्रिगरवर दाबला जाण्यापूर्वीच इयानने हातातली कात्री जीव खाऊन त्याच्या तोंडावर मारली. संत्री कोलमडला. इयानने सर्व तारा कापल्याची खात्री पुन्हा एकदा करून घेतली नि आपल्या मित्रांना इशारा केला. त्या क्षणी दोन शेरमन रणगाड धडधडत, आग ओकत पुलाकडे सुटले. त्यांच्या पाठोपाठ पायदळही जाऊ लागले. अर्ध्या तासात पूल नि पलीकडचे सर्व जर्मन खंदक दोस्त सेनेच्या ताब्यात आले. कॅप्टन इयान लिडल स्वतः जिवंत परत आलाच; पण पहिल्या महायुद्धातली ऐतिहासिक कात्रीही परत घेऊन आला.

 

त्याचे त्यावेळचे सहकारी म्हणतात, आम्हाला एवढ्या सहज नि झटपट विजय मिळेल, असं अजिबात वाटत नव्हतं. विशेषत: लिडेल जिवंत परत येईल, याची तर सुतराम शक्यता वाटत नव्हती, पण ती सकाळच चमत्कारांनी भरलेली होती. एम्स नदीवरच्या या पराक्रमाबद्दल नंतर कॅप्टन इयान लिडेलला व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार जाहीर झाला, परंतु तो स्वीकारायला लिडेल राहिला नाही. वरील घटनेनंतर १८ दिवसांनी झालेल्या दुसऱ्या एका लढाईत तो ठार झाला. युद्धाच्या अगदी अखेरच्या कालखंडात घडलेली ही घटना, नंतरच्या विजयाच्या जल्लोषात दुर्लक्षित झाली होती. कोल्डस्ट्रीमगार्ड्स पलटणीतले सर्व आजी, माजी सैनिक, अधिकारी मात्र दरवर्षी न चुकता या घटनेचा स्मृतिदिन साजरा करतात.

 

असा पराक्रम गाजवणं ही काही ब्रिटन या देशाची किंवा कोणत्याच एखाद दुसऱ्या देशाची मिरासदारी नव्हे. शौर्य, पराक्रम, पौरुष हे गुण जगभरच्या सर्वच समाजामध्ये आढळतात. नवनवीन पिढ्यांपर्यंत ते गुण संक्रमित व्हावेत, आपणही आपल्या पूर्वजांप्रमाणे रणांगणे गाजवावीत, अशा भावनेने तरुणांची मनं फुरफुरू लागावीत, मनगटं शिवशिवू लागावीत म्हणून हे विजयदिन साजरे करायचे असतात.

@@AUTHORINFO_V1@@