एक धडपड... फुलपाखरांसाठीची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jun-2018   
Total Views |

जवळपास आठ वर्षे झालीत त्या थरारक प्रसंगाला. महाराष्ट्रातले एक वनाधिकारी फुलपाखरांच्या अभ्यासाचं वेड सोबतीला घेऊन अरुणाचलात दाखल झाले होते. छंद आपला, आपण, आपल्यासाठी जोपासलेला. मग त्याचं ओझं सरकारी यंत्रणेवर कशाला, म्हणून एक पर्यटक म्हणून तिथे जाण्याचा मार्ग त्यांनी स्वत:हून निवडला होता. त्यासाठी रीतसर सुट्ट्या काढल्या आणि स्वारी दाखल झाली पूर्वांचलात. बस्स! आता उद्यापासून दिवसाचे कुठलेच वेळापत्रक नाही. मनसोक्त हिंडायचं. निसर्ग न्याहाळायचा. जमेल तितका साठवून ठेवायचा. डोळ्यात, कॅमेर्‍यात... आणि मनातही. इरादा झाला. तयारीही झाली होती. कॅमेरा सोबतीला होताच. खरं तर भटकंती सुरूही झाली होती एव्हाना. पण, पुढ्यात काही वेगळेच वाढून ठेवले होते. अजून फिरस्तीच्या वाटाही निश्चित व्हायच्या होत्या, जंगलाच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यांची पुरती ओळखही अद्याप झाली नव्हती, ज्याच्यासाठी म्हणून खास येणे झाले होते, त्या फुलपाखरांच्या विश्वातली सफर आत्ता कुठे सुरू होणार होती. अजून कितीतरी फुलपाखरं न्याहाळायची होती. कॅमेर्‍यातनं टिपायची होती. त्यांची वैज्ञानिक नावं काय असतील याचा अंदाज स्मरणशक्तीनं बांधता आला तर ठीक, नाही तर पुस्तकांच्या गर्दीतून त्याचा धांडोळा घ्यायचा. तब्बल सतराशे प्रकारची फुलपाखरं आहेत म्हणतात या पृथ्वीतलावर.
 
 
जगाच्या कानाकोपर्‍यात, निसर्गाच्या कप्प्यात दडलेली. त्यातली काही इथे, पूर्वांचलात विसावलेल्या निसर्गाच्या कुशीत शोधायची होती. हो! मग काय? त्यासाठीच तर ते दूरवरच्या पुण्याहून इकडे दाखल झाले होते. पण कसचं काय. कसा कोण जाणे पण काहीतरी गैरसमज झाला अन्‌ मोहीम सुरू होण्यापूर्वीच स्वतंत्र बोडोलॅण्डच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या काही बंदूकधारी तरुणांनी घेरले. त्यांचे बेताल, मुजोर वागणे सुरू झाले. मारहाण काय, धक्काबुक्की काय, वाट्टेल तसे बरळणे काय... डोळ्यांवर पट्टी बांधून चाललेला अंधारलेल्या वाटांवरचा प्रवास, वस्त्यांपासून दूर कुठेतरी लपूनछपून राहायचे. मागावर असलेली सैन्यदलातील जवानांची फौज जवळपास पोहोचली असल्याचा निरोप मिळाला की पुन्हा पळापळ सुरू... का, कशासाठी वगैरे प्रश्नांची उत्तरं काही सापडत नव्हती, पण आपले अपहरण झाले असल्याची कल्पना यायलाही काही काळ जावा लागला त्या वनाधिकार्‍यांसाठी...
 


 
 
 
 
विलास बर्डेकर. राज्याच्या वन विभागात विविध पदांवर कार्यरत राहिलेले एक वरिष्ठ अधिकारी. प्रचलित ‘सरकारी’ कार्यपद्धती मोडून जरासे हटके काम करण्याची तर्‍हा मुळातच त्यांच्या स्वभावाचा एक भाग राहिली आहे. कचेरीतल्या खर्डेघाशीपलीकडेही आयुष्यात करण्यासारखं बरंच काही असल्याची कल्पना कोणत्याही माणसाला स्वस्थ बसू देत नाही. चौकट मोडून धडपडण्यासाठी खुणावत राहते. विलास बर्डेकरही त्यातलेच एक. चाकोरीबाहेरच्या विश्वाचा धांडोळा घेण्यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व. सरळ, साधा, मनमिळावू स्वभाव आणि सालस व्यक्तिमत्त्वाची शिदोरी सोबतीला घेऊन जराशा निराळ्या वाटांची कास धरण्याचा निग्रह खरं तर खूप दिवसांपासून मनात रुंजी घालत असलेला. अशात एक दिवस नागझिर्‍याला जाणं झालं. तिथे एका वनाधिकार्‍याचे ‘बटरफ्लाईज ऑफ नागझिरा’ हे पुस्तक हाती पडलं. आणि मनातल्या त्या निग्रहालाही मार्ग गवसला. ठरलं. पीएच.डी.साठी हाच विषय निवडायचा. फुलपाखरं...

 
 
 
 
 
 
फोटोग्राफीचा छंद आधीच होता. त्यात नोकरी जंगलातली. मग काय झाडं झुडपं, प्राणी, पक्षी कॅमेराबद्ध होऊ लागले. पण, पीएच.डी.चा विषय निश्चित झाला अन्‌ मग कॅमेर्‍यालाही वेड लागलं, रंगीबेरंगी फुलपाखरं टिपण्याचं. देहभान विसरून हा उपद्व्याप चाललेला असायचा. कुठल्याशा कामानं निघाल्यावर रस्त्यानं जात असो की सकाळचा अंगणातला फेरफटका. नोकरीचा भाग म्हणून जंगलातला राऊंड असो की मग फिरस्तीची वार्‍यावरची सहल... हा माणूस एकाच वेडानं झपाटलेला आढळायचा प्रत्येकाला. कधी वेगानं गाडी पळवणार्‍या चालकाला, अरे अरे थांब! म्हणत गाडी वाट्टेल तिथे थांबवायची. गाडी थांबली रे थांबली की सुसाट पळत सुटायचे. या झाडावरून त्या झाडावर हुंदडणार्‍या फुलपाखरांचा पाठलाग करत. जंगलातल्या पाण्याचा खळखळाट वाहून नेणार्‍या ओढ्यांच्या ऐलतीरावर उभे राहून पैलतीरावरचे पाखरू टिपण्यासाठी कॅमेर्‍याचा अँगल सांभाळताना कधी तोल जाऊन पाण्यात पडून कपडे ओले झाले तरी त्याची चिंता वाहतो कोण? कॅमेरा ओला होऊ नये. बस्स! पण तोही ओला व्हायचा कधीमधी. धडपडीत कपडे फाटायचे. साहेब, अजून किती वेळ, हा प्रश्न गाडी चालकाच्या चेहर्‍यावर कायम उमटलेला असायचा. फुलपाखरांच्या मागे धावत सुटण्याचे हे वेड बघून काहींना आश्चर्य वाटायचं, काहींना तो मूर्खपणा वाटायचा. पण बर्डेकरांच्या माध्यमातून चाललेला फुलपाखरांचा पाठलाग मात्र तसाच सुरू राहिला... अविरत. नोकरी सरकारी असल्याने कधी चंद्रपूर तर कधी थेट पुणे अशी स्थलांतरं होत राहिली. चंद्रपूर परिसरातच जवळपास सव्वाशे प्रकारची फुलपाखरं बघून, शोधून झाली होती. काही पश्चिम घाटात गवसली.
 
 
एव्हाना या विषयावरची एवढी पुस्तकं वाचून झाली होती की, रंग-आकार बघूनही त्याची शास्त्रीय नावं सहज सांगता यावीत. एकदा जंगलातला फेरफटका चालला असताना ‘त्वानी राजा’ नावाच्या प्रजातीचं दुर्मिळ फुलपाखरू नजरेस पडलं. घनदाट जंगलात गाडी रस्त्याच्या कडेला थांबवण्याची सूचना चालकाला झाली. झालं. आता निदान तासभर तरी वाया जाणार म्हणून ड्रायव्हरच्या कपाळावर आठ्या आल्या. पण साहेबांचा आदेश असल्याने, गाडी थांबवली गेली. पुन्हा तोच खेळ. या कोपर्‍यातून, त्या अँगलने, कधी या बाजूने, कधी त्या बाजूने... कॅमेर्‍याचे बटन पटापट क्लीक होऊ लागले. जमेल तेवढी छायाचित्रं काढली जाऊ लागलीत. एवढ्यात वाघाची दोन पिल्लं त्या परिसराकडे येत असल्याचे संकेत मिळू लागले. पक्ष्यांपासून वानरापर्यंत सर्वांचीच लगबग सुरू झाली. इकडे ड्रायव्हरही खुणावण्याचा प्रयत्न करतोय्‌. पण फुलपाखरांच्या मागावर असलेल्या साहेबांना कळावं कसं? लक्षात आलं तेव्हा अगदीच काही अंतरावर वाघाचा एक बछडा एका झाडाला पाठ घासत असलेला दिसला... बाकां प्रसंग टळला होता खरा. पण, तो आठवला की अजूनही अंगावर सर्रकन्‌ काटा उभा राहतो...!
 
 
जवळपास चार ते पाच वर्षं हा अभ्यास चालला. कुठे कुठे लिहून ठेवलेल्या नोट्‌स, डायरीच्या वेगवेगळ्या पानांवर घेऊन ठेवलेल्या नोंदी कधीतरी शब्दबद्ध झाल्या. कॅमेर्‍यात कैद केलेल्या फुलपाखरांची जोड देत एक अवजड पेपर विद्यापीठाला सादर झाला. सारी प्रक्रिया पार पडली. एक मोठी जबाबदारी पूर्ण झाली होती. पण, सतराशेपैकी अजून कितीतरी जातीची फुलपाखरं अद्याप बघायची राहून गेली असल्याची सल काही स्वस्थ बसू देईना! त्या अस्वस्थतेने निर्माण केलेल्या ओढीतूनच पूर्वांचलातला प्रवास निश्चित झाला. तर अरुणाचलातला तो थरार घडला. सुमारे एक्याऐंशी दिवस विलास बर्डेकर बोडो आंदोलकांच्या ताब्यात होते. सुरुवातीच्या काळातली मारहाण, धमक्या, पैशाची मागणी हळूहळू क्षीण होऊ लागली. पण, मनावरच्या दहशतीची तीव्रता मात्र अजूनही तेवढीच होती. सैन्यदलातील जवानांचा पाठलाग टाळण्यासाठीची पळापळही तशीच कायम होती. आपण चुकीच्या माणसाचे अपहरण केल्याची बाब स्पष्ट झाल्यावर त्यांनी बर्डेकरांना सोडून तर दिले, पण या त्यासाठी जवळपास अडीच-पावणेतीन महिन्यांचा कालावधी जावा लागला. तो थरार, ती घालमेल, ती अस्वस्थता, ‘संपलं सारं आता’ असं वाटणारे काही प्रसंग, कुठलेसे सकारात्मक संकेत अन्‌ पुन्हा एकदा जागणारी, पल्लवित होणारी आशा... अपहरणाच्या अनुभवावर आधारलेलं बर्डेकरांचं ‘पोखिला’ हे पुस्तक म्हणजे या सार्‍या भावभावनांची शब्दव्युत्पत्ती आहे. फुलपाखरांच्या मागे धावण्याच्या छंदात या कटू अनुभवानं जरासा खोडा घातला एवढंच. बाकी, तो छंद अजूनही तसाच आहे... आता महाराष्ट्राच्या जैवविविधता मंडळाचं अध्यक्षपद सांभाळतानादेखील...
@@AUTHORINFO_V1@@