राजनीती, परराष्ट्रनीती इत्यादी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 
न्यू ऑर्लिन्स बंदर अमेरिकेला मिळालं तेच मुळी थॉमस जेफर्सनमुळे. नुसतं न्यू ऑर्लिन्सचा नव्हे, तर अटलांटिक महासागरापासून वायव्येला जवळजवळ पॅसिफिक महासागरापर्यंतचा एक अतिशय विशाल असा भूभाग अमेरिकेला मिळाला, तो थॉमस जेफर्सनच्या दूरदृष्टीमुळे. या विशाल भूभागात आजची लुईझिआना, आर्कन्सो, ओक्लाहोमा, मिझुरी, कॅन्सस, नेब्रास्का, आयोवा, मिनेसोटा, दक्षिण डाकोटा, उत्तर डाकोटा, वायोमिंग, मॉन्टेना ही संपूर्ण राज्य व कोलेरॅडो आणि आयडाहो या राज्यांचा बराच मोठा भाग एवढा प्रदेश येतो.
 

न्यू ऑर्लिन्स किंवा खरा उच्चार न्यू ऑर्लिअन्झ हे मिसिसिपी या प्रचंड नदीच्या मुखावरचं एक अत्यंत महत्त्वाचं बंदर आहे. मिसिसिपी ही एक अत्यंत विशाल नदी आहे. तिची प्रमुख उपनदी मिझुरी ही उत्तर अमेरिकेत उगम पावून मध्य अमेरिकेत मिसिसिपीला मिळते. म्हणजेच, अटलांटिक महासागरातून न्यू ऑर्लिन्स बंदरातून आत शिरणारी जहाजं, मिसिसिपी मिझुरी कोलंबिया नदी या जलमार्गाने पॅसिफिक समुद्रात पोहोचू शकतात. त्यामुळेच व्यापारीदृष्ट्या न्यू ऑर्लिन्स बंदराला अतिशय महत्त्व आहे. ‘कॅटरिना’ वादळाने न्यू ऑर्लिन्सला तडाखा हाणल्यामुळे अमेरिकेच्या व्यापाराची अतोनात हानी झाली आहे. आता व्यापारी मालाची वाहतूक विमानं किंवा ट्रक्सद्वारे होते, पण विमानांना अतिशुद्ध तेल (व्हाईट पेट्रोल) लागतं, ट्रक्सना डिझेल चालतं. परंतु, जहाजांना त्यापेक्षा कमी डिझेल लागतं, कारण पाण्याचा प्रवाह आणि वारा यांचाही उपयोग त्यांना करून घेता येतो. त्यामुळेच आजही जहाजांमधून होणारी मालवाहतूक सगळ्यात स्वस्त आहे.

 

 
 

तर हे न्यू ऑर्लिन्स बंदर अमेरिकेला मिळालं तेच मुळी थॉमस जेफर्सनमुळे. नुसतं न्यू ऑर्लिन्सचा नव्हे, तर अटलांटिक महासागरापासून वायव्येला जवळजवळ पॅसिफिक महासागरापर्यंतचा एक अतिशय विशाल असा भूभाग अमेरिकेला मिळाला, तो थॉमस जेफर्सनच्या दूरदृष्टीमुळे. या विशाल भूभागात आजची लुईझिआना, आर्कन्सो, ओक्लाहोमा, मिझुरी, कॅन्सस, नेब्रास्का, आयोवा, मिनेसोटा, दक्षिण डाकोटा, उत्तर डाकोटा, वायोमिंग, मॉन्टेना ही संपूर्ण राज्य व कोलेरॅडो आणि आयडाहो या राज्यांचा बराच मोठा भाग एवढा प्रदेश येतो. थॉमस जेफर्सनने आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात फार दूरदृष्टी दाखवून, मोठं राजकारण लढवून हा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. थॉमस जेफर्सन हा सर्वत्र, अमेरिकन राज्यघटनेचा निर्माता, स्वातंत्र्य या आधुनिक लोकशाही मूल्याचा उद्गाता, राज्यघटनेशी अत्यंत प्रामाणिक राहून शासन चालविणारा प्रशासक, अशा अभिधानांनी ओळखला जातो. या साऱ्या गोष्टी खऱ्याच आहेत, पण अमेरिकेला सर्वार्थाने संपन्न बनवणारी वर उल्लेखिलेली कामगिरीदेखील त्यानेच केली, याचा फारसा उल्लेख होत नाही. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरचा भाग ब्रिटिशांनी व्यापला. तिथे त्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. शतकभरानंतर या वसाहतींना स्वतंत्र राजकीय आकांक्षा निर्माण झाल्या. ब्रिटनने त्या आकांक्षांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केल्यावर अमेरिकन क्रांतियुद्ध सुरू झालं. सन १७७५ साली सुरू झालेलं हे क्रांतियुद्ध साधारण १७८८ साली अधिकृतपणे संपलं आणि नव्या सार्वभौम अमेरिकन राष्ट्राचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने १७८९ साली शपथ घेतली. या नव्या राष्ट्रात फक्त तेरा प्रांत होते. मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडचा फार मोठा प्रदेश फ्रेंचाच्या ताब्यात होता. त्याला नाव होतं लुईझियाना प्रदेश. सन १६३२ साली एक फ्रेंच दर्यावर्दी मिसिसिपी नदीच्या मुखातून आता शिरून तिच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळचा फ्रेंच सम्राट चौदावा लुई याच्या नावे ती भूमी आपल्या ताब्यात घेत त्याने 'लुईझियाना' असं त्या प्रदेशाचं नामकरण करून टाकलं.

 

युरोपात फ्रान्स, इंग्लंड, स्पेन यांच्या आपापसात मारामाऱ्या सतत चालूच असायच्या, अशाच एका लढाईत फ्रान्स आणि स्पेन यांच्यात तह झाला आणि फ्रान्सने लुईझियाना प्रदेश स्पेनला देऊन टाकला. पुढे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. परंपरागत राजे-राण्या वगैरे मंडळींची कत्तल झाली आणि नेपोलियन बोनापार्ट हा सामान्य कुटुंबातला, असामान्य कर्तृत्वाचा माणूस फ्रान्सचा राजा झाला. त्याने लुईझियाना प्रदेश पुन्हा स्पेनकडून फ्रान्सकडे घेतला. अमेरिकन राज्यघटनेचा निर्माता असलेला नि लोकांच्या हक्कांबाबत कमालीचा जागरूक असलेला थॉमस जेफर्सन हा नुसताच यशस्वी वकील किंवा आगखाऊ कामगार पुढारी नव्हता. तो एक कुशल राजकारणी व दूरदृष्टीचा मुत्सद्दीदेखील होता. राज्य टिकलं आणि वाढलं तरच राज्यघटना उपयोगाची असते, याचं त्याला पुरेपूर भान होतं. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मंत्रिमंडळात तो परराष्ट्रमंत्री होता, तर जॉन अॅतडॅम्सच्या मंत्रिमंडळात तो उपराष्ट्राध्यक्ष होता. युरोपीय राजकारणाचं बारीक ज्ञान त्याला होतं. यावेळी म्हणजे १८०१ साली तो स्वत:च नुकताच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला होता. त्याने अचूकपणे संधी हेरली नि नेपोलियनचा परराष्ट्रमंत्री तालेराँ याच्याकडे बोलणं लावलं की, “लुईझियाना प्रदेश आम्हाला विकत द्या. किंमत तुम्ही म्हणाल ती!” नेपोलियनला अख्खा युरोप जिंकायचा होता. ब्रिटनला टक्कर देणारं नौदल उभारायचं होतं. त्यासाठी त्याला पैसा हवा होता आणि इकडे जेफर्सनला न्यू ऑर्लिन्स बंदर म्हणजेच अटलांटिक आणि पॅसिफिक यांना जोडणाऱ्या जलमार्गाचं नाक हवं होतं. नेपोलियन आणि तालेराँ पक्के खट. त्यांना जेफर्सनचं राजकारण कळतच होतं. त्यांनी टाळाटाळ चालवली. जेफर्सनही खटच. त्याने ब्रिटनशी मैत्रीचा तह करण्याचा आव आणला. राजकारण कसं असतं पाहा!

 

 
 

१० वर्षांपूर्वी अमेरिकन क्रांतियुद्धात ब्रिटनविरुद्ध अमेरिका आणि फ्रान्स मित्र होते. पण, आता पवित्रे बदलले. न्यू ऑर्लिन्स बंदरासाठी, अमेरिकेने जुना मित्र फ्रान्स याला ठेंगा दाखवून, जुना शत्रू ब्रिटन याला गोंजारायला सुरुवात केली. ही चाल यशस्वी ठरली. नेपोलियन आणि तालेराँ यांनी २७ कोटी डॉलर्सच्या बदल्यात २१ लक्ष चौरस कि. मी.चा लुईझियाना प्रदेश अमेरिकेला विकून टाकला. ही घटना १८०३ सालची. ताबडतोब जेफर्सनने आपला खाजगी चिटणीस कॅप्टन मेरीवेदर लुईस आणि लेफ्टनंट विल्यम क्लार्क या दोघांना नव्याने ताब्यात आलेल्या या प्रदेशाची पाहणी करायला पाठवलं. मिसिसिपी नदीवरच्या सेंट लुई या ठिकाणाहून ते निघाले आणि वायव्येकडे प्रवास करत मिसिसिपी-मिझुरी-कोलंबिया या नद्यांमधून जात त्यांनी पॅसिफिकचा किनारा गाठला. अमेरिकेची वायव्य सरहद्द त्यांनी निश्चित केली. अत्यंत रोमहर्षक अशी ही सफर आटोपून ते दोघे नि त्यांचा चाळीस लोकांचा चमू १८०५ सालच्या अखेरीस सेंट लुईला परतली. हे दोघे जण उत्तम ट्रेकर्स तर होतेच, पण सफरीला निघण्यापूर्वी त्यांना आणि त्यांच्या चमूला वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, नौकानयनशास्त्र, भूगोल, नकाशारेखन इत्यादीचं सक्त प्रशिक्षण देण्यात आलं होतं. शिवाय बहुतेक सगळेच जण सैन्यातले होते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं काय, याची जाण त्यांना होतीच.

 

वरील प्रत्येक क्षेत्राच्या अनुषंगाने आपल्या सफरीत काय पाहायला मिळालं, याचा लेखाजोखा त्यांनी राष्ट्राध्यक्षांसमोर मांडला. त्या आधारावर अमेरिकेची पुढची व्यापारी, लष्करी धोरणं ठरली. एखादा प्रदेश नुसता जिंकला म्हणजे भागत नाही. तो पूर्णपणे आत्मसात करून टाकण्यासाठी तिथल्या स्थितीची प्रत्यक्ष माहिती घेऊन त्या आधारावर राजकीय, लष्करी, व्यापारी, सामाजिक धोरणं ठरवायची असतात. विजयाची इच्छा धरणारा प्रत्येक राजा असंच वागतो, किंबहुना त्याने असंच वागलं पाहिजे, असं आर्य चाणक्य नि त्याच्यापूर्वीचे सगळे राजनीतिशास्त्रज्ञ म्हणतात. थॉमस जेफर्सन राजा नव्हता. उलट राजेशाहीचा कट्टर विरोधक नि लोकशाहीचा उद्गाता होता. तरी तो राजाप्रमाणेच वागला. कारण, नवस्वतंत्र, अमेरिकेची अर्थव्यवस्था युरोपातल्या ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, रशिया या बलाढ्य साम्राज्यांच्या तुलनेत केवळ बाल्यावस्थेत होती. ती प्रबळ करण्यासाठी अटलांटिक-पॅसिफिक जोडणारा जलमार्ग ताब्यात हवाच होता. जेफर्सनने मोठी किंमत देऊन तो घेतला. या खरेदीप्रकरणी संसदेत गोंधळही झाला. अशा प्रकारे भूप्रदेश विकत घेण्याबाबत अमेरिकन राज्यघटनेत कोणतीही तरतूद नव्हती. एरवी जेफर्सन राज्यघटनेबाबत अत्यंत जागरूक, पण आपल्या राष्ट्राचा स्वार्थ पाहून त्याने घटनेतील तरतूद वगैरे तांत्रिक गोष्टी बाजूला ठेवल्या नि कार्यभाग उरकून घेतला. आपल्या राष्ट्रांचा स्वार्थ उत्तम रीतीने साधून घेणं हीच यशस्वी परराष्ट्रनीती!

@@AUTHORINFO_V1@@