बाळासाहेबांच्या नावाची शान राखा साहेब...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018   
Total Views |

 

 

परम आदरणीय

उद्धव साहेब,

त्रिवार कुर्निसात...

 

तसे महाराष्ट्रात सरकारविरुद्ध उभे ठाकण्यासाठी आणि दिल्लीत विराजमान असलेल्या मोदींविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्यासाठी गेले काही दिवस आपण जो विखारी बाण लावलेला धनुष्य पेलताहात, त्याला खरंच तोड नाही. खुद्द सरकारमध्ये राहूनही, त्याच्याशी आपला काडीचाही संबंध नसल्याच्या थाटात त्याची ऐशीतैशी करण्याची एकही संधी न दवडण्याची तर्‍हा अनुसरणे, हे काय येर्‍यागबाळ्याचे काम थोडीच आहे! पण आपण लीलया साकारताहात, ती दुतोंडी भूमिका!

 

खरंच साहेब, कमाल आहे बरं तुमची! काश्मीर काय, अमेरिकेशी संबंध काय, शेतकर्‍यांच्या आत्महत्या काय नि नोटबंदी काय, सरकारचा कुठलाच निर्णय पटत नसतानाही सरकारमध्ये राहण्याची किमया... प्रत्यक्षात न देताही, राजीनामे खिशात बाळगून असल्याची धमकी देत वर पुन्हा कॉलर टाईट करून दिमाखाने मिरवण्याची दुर्मिळ कला, जी आपल्या मावळ्यांनी आत्मसात केलीय्‌, ती तर वर्णनातीतच! कायपण स्टाईल आहे साहेब राजकारणाची. व्वा! मानलं बुवा आपल्याला. वाट्याला आलेल्या सरकारी सुविधांना कवडसे घालत, त्याची लयलूट करत, सरकारी बंगल्यांपासून तर गाड्यांपर्यंत सार्‍याच बाबींचा यथोचित उपयोग करीत, चाललेला सरकारविरुद्धचा आपला थयथयाट अनोखाच बघा!

 

खरं सांगतो उद्धवसाहेब, हे कुण्या ऐर्‍यागैर्‍याचे काम नाहीच. असे गावात असूनही नसल्यासारखे वागायला, सरकारचा एक भाग बनून सरकारलाच धारेवर धरायला धमक लागते. ती सिद्ध करत चाललेल्या आपल्या वर्तणुकीला काही लोक धिंगाणा म्हणतीलही, पण तो घालायलाही हुशारी लागते ना राव! नाकातल्या नथीतून तीर चालवत तो धिंगाणा गेले कित्येक दिवस चाललाय्‌, आपल्या पक्षाच्या माध्यमातून. पण हिंमत झाली कुणाची त्याला विरोध करण्याची? छे! छे! अरे, बिशाद आहे कुणाची आपल्याला हात लावण्याची? सरकारमधली मंत्रिपदं मिळविण्यासाठीची लाचारी असली तरी, ती दवडीत दिमाखानं मिरविण्यासाठीचा तो आवेश तर सोबतीला घेऊनच फिरतात आपले सैनिक. त्यामुळे पदांची लालसा बाळगत चाललेली तोंडपाटीलकी राजकीय वर्तुळात हास्यास्पद ठरली तरी त्याची तमा बाळगणार कोण अन्‌ कशाला? शिवसैनिक काय असली तमा बाळगायला जन्माला आलेत? छे!

 

उद्धवसाहेब, परवा काश्मिरात पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्याबरोबर आपण जी तळपती तलवार म्यानातून बाहेर काढून पाजळली... व्वा! एकदम लाजवाब! तसेही, काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपली थोडीच आहे? त्यामुळे बेताल बोलत सुटलं तरी अडवणार कोण आहे? आणि असलं बरळत सुटलेल्यांना, तुमचा काश्मीर प्रश्नाशी संबंध काय, तो प्रश्न सोडवण्यात कालपर्यंतचं आपलं योगदान काय, असंही विचारत नाही कुणी इथे. त्यामुळे कुणीही कशावरही बेधडक बोलायला मोकळा असतो या देशात. आता आपलंच उदाहरण घ्या ना साहेब, संबंध असो वा नसो, कितीतरी मुद्यांवर बेधडक विधानं करताच ना आपण? तसा, राजकारणी म्हणूनच अधिकारच आहे म्हणा तो आपला!

 

भाजपाने मुफ्ती मेहबूबांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला तेव्हाही आपण विरोधात बोलला होता अन्‌ परवा भाजपाने त्यांचा पाठिंबा काढला तर तेव्हाही केवढे पाणी आले आपल्या डोळ्यांत! लागलीच भाजपाला पळपुटे ठरवायला सरसावलात! तुम्हाला सांगतो साहेब, भाजपाने मेहबूबांचा पाठिंबा काढल्याबरोबर काही नतद्रष्ट्यांना नक्राश्रू आवरले नाहीत. अर्थात आपण त्यातलेनाहीत हे ठावूक आहे सार्‍या महाराष्ट्राला, पण तरीही इंग्रजही असेच पळून गेले होतेअसे सांगून, आपल्या ऐतिहासिक ज्ञानाचेजे जाहीर प्रदर्शन आपण मांडले, ते निर्विवाद दर्जाहीन होते... काश्मीरातला दहशतवाद संपला की अद्याप शिल्लक आहे, त्याबाबत करण्यात आलेले दावे खरे की फोल, हे लोक ठावतीलच यथावकाश, पण त्यावरून स्वत: सहभागी असलेल्या सरकारची लाज काढण्याची आपली इस्टाईल एकदम हटके हा! काश्मीरची हालत इतकी कधीच बिघडली नव्हती, तिथे रक्ताचे असे पाट यापूर्वी कधीच वाहिले नव्हते वगैरे विधानातून आपल्याकडील माहितीच्या खजिन्याचेजे दर्शन आपण तमामजनांना घडविले, त्या माध्यमातून जे ज्ञानामृत आपण देशभरातील जनतेला प्रशविले, ते कीव करण्याच्या लायकीचे ठरवतीलही काही लोक, पण आपण नका लक्ष देऊ साहेब तिकडे.
 
असं दरवेळी खर्‍या खोट्याचं गणित मांडण्यात वेळ दवडला तर राजकारण केव्हा करायचं लोकांनी? तेव्हा आपणही वेळ मुळीच दवडू नका. काश्मीरचं काय व्हायचं ते होईल, आपलं राजकारण महत्त्वाचं. काश्मीरातून इंग्रज कधी पळून गेले होते, काश्मिरी पंडितांचे हाल कुणी केले, तेव्हा दहशत नेमकी कुणी माजवली होती अन्‌ हा सारा तमाशा घडत असताना मूग गिळून गप्प कोण बसलं होतं... हे जाणतो सारा देश. बहुधा संजयने ही माहिती दिली नसेल. त्यामुळे, सरकारमधून बाहेर पडणे म्हणजे पळपुटेपणा असल्याचा जावईशोध लागला असेल, आपल्याला. बघा ना, इथे महाराष्ट्रात तुमच्या सवंगड्यांच्या खिशातले राजीनामे बाहेर पडता पडत नाहीयेत्‌ अन्‌ तिकडे काश्मीरात भाजपावाले एका क्षणात बाहेरही पडलेत सत्तेतून. छे! काहीतरीच.

 

महत्प्रयासानंतर हाती आलेली सत्ता काय अशी सहजासहजी उधळून द्यायची असते? बरं केलं साहेब, तुम्ही त्यांना पळपुटं ठरवलं. त्यातून, तुम्ही पळपुटे नाहीत हेही सिद्ध झालं आणि काहीही झालं तरी मराठी मुलुखातील सैनिकांच्या खिशातले राजीनामे कधीच बाहेर येणार नाहीत, हेही स्पष्ट झालं एकदाचं. हो! राजीनामे फेकून सरकारमधून बाहेर पडायला आपण आणि आपले सैनिक पळपुटे थोडीच आहेत? एकदम मस्तच स्टाईल बरं साहेब ही आपल्या राजकारणाची! भल्या भल्यांना साधले नाही हे राजकीय चातुर्य. पण तुम्ही? कसे सहज आत्मसात केलेत बघा. मानलं साहेब आपल्याला.
 
राजकारण करावं तर हे असं. सरकारमध्येही राहायचं अन्‌ सरकारला ठोकूनही काढायचं. सत्ता मनमुराद उपभोगायचीही, पण आपल्याला त्याचा जरासाही लोभ नसल्याची नौटंकीही बेमालूमपणे करायची. विरोधी पक्षालाही लाज वाटावी, इतक्या बेमुर्वतखोरपणे आपल्याच सरकारवर तोंडसुख घ्यायचं. त्याला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडायची नाही. त्याला पळपुटं ठरवायचं, त्याला हिणकस भाषेत हिणवायचं, सार्‍या अपयशाचं खापर त्याच्या डोक्यावर फोडायचं, त्याच्या नावानं जाहीर शिमगा करायचा... वा. वा. एकदम जिगरबाज आहे साहेब काम आपलं. काश्मीरवर बोललं की मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांकडे लक्षही जात नाही बघा कुणाचं. थेट मोदींवर निशाणा साधायचा की अमित शहा दारात हजर... व्वा! उस्ताद मान गये आपको तो!

 

बरं पण एक सांगा साहेब, जाहीर सांगायचं नसलं तर खाजगीत सांगा. अगदीच अडचण असल्यास कानात सांगितलं तरी चालेल, पण ते दिल्लीत भाजपाचे सरकार आल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचा जो दावा आपण करता, तो खरंच खरा आहे का हो? बरं ते इंग्रज काश्मीरातून केव्हा पळाले होते, ते तरी सांगून टाका की एकदा. तो इतिहास आपण वाचला तरी होता, की बस्स! उचलली जीभ अन्‌... अर्थात तुम्ही नाही सांगितलं तरी लोकांना कळतेच म्हणा! बाळासाहेबांच्या नावानं त्यांच्या पश्चात शिवसेनेचा डोलारा सांभाळणं काय सोप्पं आहे? तो सांभाळताना होणारी तुमची दमछाक... कळते बरं मराठीजनांना.

 

मुंबईपुरती दिलेली आश्वासनंही इतक्या वर्षांच्या सत्तेच्या काळात पूर्ण करू न शकलेल्या शिवसेनेला मोदी-फडणविसांकडून मात्र शंभर टक्के रिझल्ट हवाय्‌, एकूण एक आश्वासन पूर्ण झालेलं हवंय्‌ म्हटल्यावर आपली अगतिकताही येते ध्यानात लोकांच्या. फक्त आपल्या वागण्याचा, बेताल बरळण्याचा अर्थ लोकांच्या ध्यानात येतो, हे आपल्या ध्यानात येत नाही, हीच खरी अडचण आहे बघा! एकदा तेवढं ध्यानात अन्‌ मनावर घ्या साहेब... राजकारणात घाण करायला आहेत खूप लोक. तुम्ही फक्त बाळासाहेबांच्या नावाची शान राखा साहेब...

आपला

एक सैनिक

@@AUTHORINFO_V1@@