चंद्राबाबूंची आत्महत्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2018   
Total Views |



 

२००४ साली चंद्राबाबू म्हणजे माध्यमांच्या गळ्यातला ताईत होता आणि त्यातून मिळणारी वाहवा नशा होऊन हा माणूस आत्महत्येला प्रवृत्त झाला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. परंतु, टाळ्यांच्या गडगडाटात कधी सत्याचा आवाज ऐकू येतो काय? मग बंगळुरु ते दिल्लीपर्यंत माध्यमातल्या टाळ्यांचा गजर कानात साठवून घेतलेल्या चंद्राबाबूंना येणारे संकट सुवर्णसंधी वाटली तर नवल कुठले?


पुढल्या वर्षी एव्हाना लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असतील आणि त्याचसोबत काही विधानसभांच्या निवडणुकाही संपलेल्या असतील. नव्या लोकसभा-विधानसभांचे प्रतिनिधी नव्याने निवडून आलेले असतील. त्या लोकसभेचे स्वरूप काय असेल ते तेव्हाच कळेल. कारण, त्यासाठी जी ‘मोदी हटाव’ आघाडी उभारण्याचे प्रयास चालू आहेत, त्याला किती यश येईल, यावरच लोकसभेचे निकाल अवलंबून आहेत. पण, ज्या दोन-चार विधानसभा निवडणुका तेव्हा व्हायच्या आहेत, त्यामध्ये व्हायच्या राज्यांचे समीकरण आताच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आंध्रप्रदेश, तेलंगण व ओडिशा या विधानसभेचे निकाल काय असू शकतील, त्याचा अंदाज आज काहीसा करता येऊ शकेल. किंबहुना, तेच डोळ्यासमोर ठेवून तीन राज्यातील प्रादेशिक नेते आपल्या खेळी करत आहेत आणि त्यातला सर्वात आत्मघातकी डावपेच तेलुगू देसमचे अध्यक्ष मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी खेळलेला आहे. उलट ओडिशाचे नवीनबाबू पटनाईक एक एक पाऊल जपून टाकत आहेत, तर आंध्राचेच प्रादेशिक तरूण नेते जगनमोहन रेड्डी यांनी अतिशय सावधपणे खेळी केलेली आहे. किंबहुना, त्याच्याच सापळ्यात अडकून चंद्राबाबूंनी आत्महत्येचे पाऊल उचललेले आहे. यातली गंमत अशी की, याच मार्गाने जाऊन चंद्राबाबूंनी तब्बल दहा वर्षांचा वनवास भोगलेला आहे. पण, त्यांना अक्कल मात्र अजिबात आलेली नाही. २००४ साली चंद्राबाबू म्हणजे माध्यमांच्या गळ्यातला ताईत होता आणि त्यातून मिळणारी वाहवा नशा होऊन हा माणूस आत्महत्येला प्रवृत्त झाला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. परंतु, टाळ्यांच्या गडगडाटात कधी सत्याचा आवाज ऐकू येतो काय? मग बंगळुरु ते दिल्लीपर्यंत माध्यमातल्या टाळ्यांचा गजर कानात साठवून घेतलेल्या चंद्राबाबूंना येणारे संकट सुवर्णसंधी वाटली तर नवल कुठले?

 

१४ वर्षांपूर्वी चंद्राबाबूंचे देशात भयंकर कौतुक होते. ‘सीईओ’ म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचा अध्यक्ष-महाव्यवस्थापक असल्यासारखे उत्तम राज्य सरकार चालवण्याचे इतके कौतुक होते की, चंद्राबाबूंना आपण सहज विधानसभा जिंकणार याची खात्री झालेली होती. त्यात या माध्यम कौतुकाची इतकी मोठी नशा झाली की, गुजरातच्या दंगलीचे निमित्त साधून चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडलेले होते. त्यांनीच सर्वप्रथम नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती. त्यांना हरभऱ्याच्या झाडावर पुरोगामी माध्यमांनी चढवले होते आणि मग चंद्राबाबूंचे बाजूला होणे म्हणजे वाजपेयी सरकार व भाजपचा शेवट असल्याचीही भाकिते झालेली होती. मात्र, त्याच काळात काँग्रेसचा राजशेखर रेड्डी नावाचा नेता आंध्रभर पदयात्रा काढून शेतकरी आत्महत्या व सामान्य लोकांच्या दुर्दशेचा टाहो फोडत होता. पण, चंद्राबाबूंना ते कुठे ऐकू येत होते? मग लोकसभा व विधानसभा निवडणुका आल्या आणि त्यात डाव्या पक्षांसह तेलंगण राज्य समितीला सोबत घेऊन राजशेखर रेड्डीने तेलुगू देसमचा पार धुव्वा उडवला. नुसता आंध्र प्रदेश काँग्रेसच्या पंखाखाली आला नाही, तर तिथून मिळालेल्या लोकसभेतील जागांमुळे काँग्रेसच्या हाती दिल्लीतील देशाच्या सत्तेची सूत्रे आली. तेव्हा आणि पुढे पाच वर्षांनी एकट्या आंध्र प्रदेशने काँग्रेसला युपीएच्या नावावर राज्य करण्यासाठी भरपूर जागा पुरवल्या. आज त्याच मुळच्या आंध्र प्रदेश व बाजूला केलेल्या तेलंगणात काँग्रेसला एकही खासदार निवडून आणता आलेला नाही. दरम्यान, दहा वर्षांच्या वनवासात चंद्राबाबू गेले आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्याच महान नेत्याला त्याच मोदीसमोर शरणागत व्हावे लागले. ज्याचा राजीनामा मागून चंद्राबाबू हरभऱ्याच्या झाडावर चढलेले होते. मात्र, निकाल लागले आणि आपण आत्महत्या करून बसल्याचे भान आले. पण, व्हायचे ते दुष्परिणाम झालेले होते.

 

आज परिस्थिती खुप बदललेली आहे., मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनाच शिव्याशाप देत चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडलेले आहेत. सगळ्या सेक्युलर पुरोगामी मेळाव्यात हात उंचावून मिरवत आहेत. अगदी केजरीवालच्याही समर्थनाला चंद्राबाबू पोहोचलेत. पण हे सगळे अन्य राज्यातले नेते आंध्रामध्ये किती उपयोगी ठरू शकतात? काँग्रेसला त्या राज्यात स्थान उरलेले नाही आणि जे काही बळ शिल्लक आहे, ते काँग्रेस चंद्राबाबूंच्या पाठीशी उभे करणार नाही. पुर्वी त्या राज्यात ज्याला कॉग्रेस म्हटले जायचे, ते बळ व संघटन आज राजशेखर रेड्डी यांचा पुत्र जगनमोहनच्या पाठीशी गेलेले आहे आणि तो कुठल्याही बाबतीत काँग्रेसशी हातमिळवणी करीत नाही. मागल्या निवडणुकीत तोच चंद्राबाबूंचा एकमेव खरा प्रतिस्पर्धी होता आणि मोदी भाजपची सोबत नसती, तर चंद्राबाबू एकट्याच्या बळावत जगनला हरवू शकले नसते. मोदींना सोबत घेऊनही चंद्रबाबूंना आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही. लोकसभेत व विधानसभेत एकट्याच्या बळावर जगनने मात्र मोठी बाजी मारली. त्याला बहूमत वा सत्ता मिळवता आलेली नसेल. पण राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष तोच आहे आणि तेलगू देसमच्या तुलनेत त्यानेही तितकीच मतेही मिळवलेली आहेत. आताही तो काँग्रेसशी गळाभेट करायला गेलेला नाही आणि चंद्राबाबूंनी तसे करून आपल्या बिगरकॉग्रेसी मतदाराला नाराज केलेले आहे. सहाजिकच तेलुगू देसम पक्षाचा काँग्रेस विरोधी मतदार नाराज आहे आणि त्याला जगनमोहन नको असेल, तर भाजप हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिलेला आहे. मागल्या तीन दशकात भाजप ज्या राज्यात फोफावला, तिथे अशाच बिगरकाँग्रेसी राजकारण करणाऱ्या अन्य पक्षांच्या काँग्रेस चुंबाचुंबीने मोकळी केलेली जागा भाजपने व्यापलेली दिसेल. ती संधी चंद्राबाबूंनी भाजपला आपल्या कर्माने निर्माण करून दिलेली आहे.

 

गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश वा हरियाणा इत्यादी राज्यात पारंपरिक काँग्रेस विरोधी पक्षांनी भाजप वा संघाचा बागुलबुवा करून सेक्युलर नाटकात काँग्रेसला साथ दिली आणि असे लहानसहान प्रादेशिक व सेक्युलर पक्ष नामशेष होऊन गेले. त्यांच्या सेक्युलर सतिव्रताच्या वाणानेच त्यांचा घात केला आणि काँग्रेसला जीवदान देऊन त्यांचा अवतार संपुष्टात आलेला दिसेल. महाराष्ट्रात शेकाप, जनता दल, रिपब्लिकन असेच पक्ष नामशेष झाले. कर्नाटक व गुजरातमध्ये परंपरेने समाजवादी गट प्रभावी बिगरकाँग्रेस पक्ष होता. जनता पक्ष वा जनता दल म्हणून त्याचे रुपांतर झाले. पण, पुढल्या काळात त्यांनी काँग्रेसशी चुंबाचुंबी केली आणि काँग्रेस विरोधातील मतदारांना जणू भाजपकडे पिटाळून लावलेले आहे. आंध्रामध्येही वेगळे काही घडलेले नाही. तिथला बिगरकाँग्रेसी मतदार डावे पक्ष सोडून तेलुगू देसमकडे झुकला आणि आता तेच चंद्राबाबू पक्षाला काँग्रेसच्या गोटात घेऊन जाणार असतील, तर रामारावांच्या निष्ठावंतांनी जायचे कुठे? ते जगनमोहनकडे जाऊ शकत नाहीत, अशा मतदाराला अगतिक होऊन भाजपच्या गोटात शिरावे लागणार ना? त्यामुळे भाजप पुढल्या निवडणुकीत आंध्रामध्ये मोठा पक्ष वगैरे होणार नाही. पण, त्याचा भक्कम पाया घातला जाईल. काँग्रेस तिथे आधीच जगनने गिळंकृत केलेली आहे. म्हणजे, काँग्रेस सोबत जाण्याचा कुठलाही लाभ चंद्राबाबूंना मिळणे दुरापास्त आहे. एकूण काय, तर पुढल्या निवडणुका होतील, त्यात मोठा दणका चंद्राबाबूंना बसणार आहे. भाजपचे काडीमात्र नुकसान होऊ शकत नाही, उलट लाभच होईल. कारण, भाजप तिथे आधीच दुबळा पक्ष आहे. खरा लाभ जगनमोहनचा होईल आणि नुकसान चंद्राबाबूचे. आगामी लोकसभा विधानसभा कशा असतील ठाऊक नाही. बाकीच्या पक्षांचे फायदे-तोटे आता सांगता येणात नाहीत. पण, चंद्राबाबू आजच दिवाळखोरीत गेलेले आहेत. ती दिवाळखोरी जाहीर व्हायला आणखी दहा महिने लागणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@