नवी दिल्ली : कुमारस्वामी हे सामन्य जनतेचे 'चीफ मिनिस्टर' नसून ते कॉंग्रेस पक्षाचे 'चीफ मॅनेजर' आहेत, अशी जोरदार टीका भाजप नेते संबित पात्रा यांनी आज केली. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतेच कॉंग्रेस संबंधी केलेल्या वक्तव्यावरून पात्रा यांनी जेडीएस आणि कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली.
'कॉंग्रेस पक्ष हा आजपर्यंत कर्नाटकाला फक्त एका एटीएम मशीन प्रमाणे पहात होता. ज्यातून आपल्याला आवश्यक असलेल्या आणि फायद्याच्या सर्व वस्तू जमा करायच्या. परंतु जनतेनी त्यांच्या याच कृत्यासाठी जेव्हा त्यांना सत्तेतून बाहेर काढले, त्यावेळी आपली ही मशीन हातातून जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने कुमारस्वामी यांच्या रूपाने एक नवीन मॅनेजर आपल्या या मशीनवर नियुक्त केला आहे. त्यामुळे कुमारस्वामी हे जनतेचे प्रतिनिधी नसून कॉंग्रेस पक्षाचे कर्मचारी बनले आहे, अशी टीका पात्रा यांनी यावेळी केली.
याचबरोबर कुमारस्वामी यांनी आपल्या वक्तव्यामधून लोकशाहीचा घोर अपमान केला असून लोकशाहीची मूळ व्याख्याच त्यांनी बदलली आहे. खरे पाहता सरकार हे 'जनमता'च्या आधारवर चालले पाहिजे, परंतु कर्नाटकचे सरकार हे '१० जनपथ'च्या आदेशावर चालत असल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कुमारस्वामी यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत असल्याचे पात्रा यांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काल एका कार्यक्रमामध्ये आपल्या मुख्यमंत्री पदावरून एक अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. 'आपल्याला मुख्यमंत्री बनविण्यामध्ये कर्नाटकच्या जनतेचा हातभार नसून कॉंग्रेसच्या सहकार्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो आहोत, त्यामुळे आपण जनतेचे नसून कॉंग्रेस पक्षाचे आभारी आहोत' असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले होते. कुमारस्वामी यांच्या याच वक्तव्यामुळे कर्नाटकमधील जनता आणि विरोधकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.