जातक कथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018   
Total Views |

लुम्बिनी, ई.स. पूर्व ६ वे शतक


राजा शुद्धोधन व राणी माया यांचा पुत्र सिद्धार्थ. सिद्धार्थच्या जन्मानंतर लवकरच मायादेवींचा मृत्यू झाला. त्याची मावशी महाप्रजापती गौतमीने त्याचा सांभाळ केला. रितीप्रमाणे सिद्धार्थने युद्धाचे व राजनीतीचे शिक्षण घेतले, यथावकाश त्याचे लग्न झाले, त्याला एक पुत्र झाला. सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळत होती. पण तरीही सिद्धार्थ काही आनंदी नव्हता. त्याच्या मनात सतत एकच चिंतन चाले - जीवनातील दु:ख दूर कसे करावे ? या तळमळीने, २९ वर्षांच्या सिद्धार्थने एका रात्री गृहत्याग केला.

सिद्धार्थ त्याचा प्रश्न घेऊन अनेक संन्यासी, भिक्षुंकडे गेला. आळारकलाम व उद्दक रामपुत्त यांच्याकडे त्याने साधना केली. त्यांच्याकडे सिद्धार्थ समाधी लावायला शिकला, पण समाधीतून बाहेर आल्यावर पुन्हा दु:ख आहेच! हे जाणल्यावर त्याने त्यांचा मार्ग सोडून दिला. नंतर सिद्धार्थ पुराणकस्सपकडे गेला. पुराणकस्सपचा कर्मफळ सिद्धांतावर विश्वास नव्हता, हे सिद्धार्थला पटले नाही. मग तो अजीवक पंथाच्या मख्खली गोशालकडे गेला. त्याचा नियतीवाद, “नशिबात जे आहे तेच होणार” हे सुद्धा सिद्धार्थला पटले नाही. त्यावर तो अजित केशकंबलीकडे गेला. याची क्लेशकारक साधना सिद्धार्थला पटली नाही. नंतर पखुदकच्चायनचा “जे दिसते ते सगळ शाश्वत आहे.” हे तत्त्वज्ञान सिद्धार्थला, ज्याला सगळेच अशाश्वत दिसत होतं, सहजच पटले नाही! त्याला संजय बेल्दुपुत्तचा संशयवाद सुद्धा पटला नाही. आणि महावीर जैनच्या पंथातील पराकोटीचा आत्मक्लेश सुद्धा गौतमला पटला नाही.

त्यावर गया येथे सिद्धार्थ स्वतः चिंतन करत बसला. एके दिवशी, पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थला जीवनाचा अर्थ सापडला. दु: खाचे कारण कळले. आणि दु: खातून बाहेर पडायचा मार्ग सापडला. ३५ वर्षीय सिद्धार्थ, बुद्ध झाला!

यानंतर आपल्याला मिळालेला मार्ग इतरांना दाखवण्यासाठी गौतम बुद्धाने ठिकठिकाणी प्रवचने केली. बुद्धाने सामान्य जनांच्या मागधी भाषेत प्रवचने केली. त्याची शिकवण अशी होती -


दु:खाचे ज्ञान होणे – अप्रिय गोष्टींची प्राप्ती व प्रिया गोष्टींचा वियोग झाल्याने दु:ख होते.


दु:खाचे कारण ओळखणे – अशाश्वातला शाश्वत समजणे या अज्ञानामुळे दु:ख होते.


दु:ख मुक्त होऊ शकतो हे कळणे - तृष्णेचा, हवे - नकोपणाचा, त्याग केल्याने दु:ख मुक्त होऊ शकतो हे कळणे.


दु:ख मुक्त होण्याचा मार्ग कळणे – सम्यक (balanced) जीवनचा आर्य अष्टांगी मार्ग बुद्धाने सांगितला.
जवळ जवळ ४५ वर्षे गौतम बुद्धाने सामान्य जनतेला बोध केला. वयाच्या ८० व्या वर्षी, कुशीनगर येथे बुद्धाने देह ठेवला.


राजगृह, मगध. ईस. पूर्व ५ वे शतक


बुद्धाच्या निर्वाणानंतर, मगध राजा अजातशत्रूने बुद्ध वचनांचे गायन आयोजित केले. या संगीतीमध्ये, बुद्धाच्या शिष्यांनी त्याची वचने गायली. बुद्धाची वचने विनय पिटकमध्ये व प्रवचने सुत्त पिटकमध्ये संकलित केली गेली.

सुत्त पिटकात निकाय नावाचे पाच भाग आहेत. त्यातील खुद्दक निकायमध्ये १५ लहान ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ आहे जातक कथा! यामध्ये गौतम बुद्धाच्या पूर्व जन्मांतील प्रसंगांवर गोष्टी लिहिल्या गेल्या. पूर्व जन्मात बुद्धाने केलेले पुण्यकाम, त्याचा त्याग आणि त्याच्या गुणांचे दर्शन जाताकांमधून होते. पाहू जातक कथांमधील काही कथा -

जातक कथा


जातकमध्ये ५५० गोष्टी आहेत. त्यामध्ये काही पंचतंत्र मधल्या ओळखीच्या गोष्टी भेटतात. जसे – बडबडणारे कासव. ती कथा जातक मध्ये अशी सांगितली आहे -

वाराणसी मध्ये एक ब्रह्मदत्त नावाचा राजा होता. त्याचा मंत्री होता बोधिसत्त. राजा ब्रह्मदत्त अतिशय बडबड्या होता. राजातील हा अवगुण बोधिसत्तला युक्तीने सांगायचा होता. त्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत होता.

तिथून जवळच एका तळ्यात एक कासव राहत होते. त्याची मैत्री झाली दोन सुपर्ण हंसांशी. एकदा ते हंस कासवाला म्हणाले, “तू आमच्या बरोबर हिमालयातील सरोवराकडे चल.” तेंव्हा कासव म्हणाले, “मला तर उडता येत नाही! मी कसा येणार तुमच्या बरोबर?” तेंव्हा हंसांनी युक्ती केली. दोघांनी मिळून चोचीत काठी धरली. कासवाला काठी पकडायला सांगून दोघे नवीन सरोवराकडे उडू लागले. उडणारे त्रिकुट पाहून मुले काहीबाही बोलू लागली, चिडवू लागली. ते ऐकून, “मी उडतो तर तुमचे काय जाते?” असे म्हणायला कासवाने तोंड उघडले, आणि काठी सुटल्याने ते खाली पडले. ते नेमके राजा ब्रह्मदत्त आणि बोधिसत्त फिरत होते तिथे पडून मेले.

ते दृश्य पाहून ब्रह्मदत्ताने विचारले, “मंत्री महाशय! ते कासव कशामुळे मेले ?”

बोधिसत्तला हवी ती संधी मिळाली! तो म्हणाला, “राजन्! ज्याला कुठे, कधी आणि किती बोलावे किंवा बोलू नये हे कळत नाही त्याच्यावर असे दुर्भाग्य कोसळते!”

त्यावरून राजा स्वतःची चूक उमगला!



भारतीय डाक खात्याने काढलेले, हंस व कासवाच्या गोष्टीचे तिकीट.


आणखी एक पंचतंत्रातील गोष्ट येते ती माकड आणि मगरीची -

मगर आणि माकड मित्र असतात. एकदा नदी पल्याड जाण्यासाठी, मगर माकडाला पाठीवर बसवून नदीतून घेऊन जाऊ लागते. तेंव्हा मगर सांगतो, “अरे! मी काही तुला फिरायला नेत नाहीये! माझ्या बायकोला तुझे काळीज खायचे आहे, म्हणून घेऊन जात आहे.” त्यावर बोधिसत्त असलेले माकड शांतपणे म्हणते, “आधी नाही का सांगायचे? आम्ही माकडे झाडावर काळीज ठेवत असतो. तुला काळीज हवे असेल तर मला झाडापाशी घेऊन जा, मी झाडावरून काळीज घेऊन येतो!” मगराला ते खरेच वाटते! तो माकडाला झाडापाशी घेऊन जातो, आणि बोधिसत्त माकड उडी मारून पळून जाते! बोधिसत्तचे धैर्य आणि चातुर्य हे गुण या गोष्टीतून दिसतात.

काही पुराणातल्या गोष्टी सुद्धा जातकात येतात. जशी ही महाभारताच्या वनपर्वातील शिबी राजाची गोष्ट –

शिबी नावाचा एक न्यायी राजा होता. एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याकरिता एक देव कबुतराच्या रूपात उडत उडत राजाच्या दरबारात आले. दुसरा देव, कबुतराच्या मागोमाग ससाणा होऊन आला. कबुतराने आपला जीव वाचवण्यासाठी राजाकडे आर्जव केला. शिबी राजाने कबुतराला आश्रय दिला. मग ससाणा म्हणाला, “मी जर आज ही कबुतराची शिकार केली नाही तर माझी मुले भुकेने मरून जातील. न्याय कर राजा!” त्यावर राजाने असा तोडगा काढला की. ”मी कबुतराचे जीव वाचवण्याचे वचन दिले आहे. कबुतराच्या बदल्यात मी तुला त्याच्या भारंभार माझे मास देतो.”

त्यावर शिबी राजाने एक तराजू आणवला. एका पारड्यात कबुतर ठेवले. दुसऱ्या पारड्यात आपले मास काढून घातले. पण कबुतराने आपले वजन वाढवले. आणखी मास घातले, तरी ते कबुतराच्या वजना इतके होईना. शेवटी राजा स्वत: पारड्यात बसायला निघाला. तेंव्हा दोन्ही देव त्याच्या न्यायी बुद्धीवर प्रसन्न झाले.

काबुताराचे प्राण वाचवणारा हा राजा, मागच्या जन्मातील बोधिसत्त होता.



दुसऱ्या शतकातील गंधार शैलीतील शिल्प. शिबी राजा ससाण्याला अपाले मास देत आहे. आता ब्रिटीश म्युझियममध्ये.


जातकामध्ये अशा ओळखीच्या काही गोष्टींशिवाय आणखीही अनेक गोष्टी आहेत. जशी ही षडदंत नावाच्या हत्तीची गोष्ट -

षडदंत नावाचा एक हत्ती होता. त्याला सहा सुळे होते. एकदा आकाशातून पडलेले एक दिव्य फूल त्याला मिळाले. षडदंतने ते फूल आपल्या दुसऱ्या बायकोला दिले. ‘आपल्याला फूल दिले नाही’ या विचाराने त्याच्या पहिल्या बायकोला अतिशय राग आला. याचा सूड उगवण्यासाठी तिने पुढचा जन्म घेतला बनारसच्या राणीचा. या राणीने राजाकडे षडदंतचे सुळे मागितले. राजाने षडदंतच्या मागे शिकारी पाठवले. षडदंतला सगळा प्रकार लक्षात आला. तेंव्हा त्याने आपले सहा सुळे उपटून राणीला बहाल केले!

स्वशरीराबाबतीत निर्दय व आत्यंतिक त्याग हे गुण अधोरेखित करणारी ही कथा.

अजिंठा, महाराष्ट्र. ईस. पूर्व २ रे शतक – इस. ५ वे शतक


या काळात अजिंठाच्या लेण्यांमध्ये बुद्ध कथेवर अनेक अप्रतिम चित्रे काढली गेली. एका पाठोपाठ एक घडणारे प्रसंग, एकाच भिंतीवर रंगवले आहेत. एखादे कॉमिकचे पुस्तक वाचावे, तशा या भिंती वाचता येतात. बुद्धाच्या जीवनातल्या कितीतरी कथांनी इथल्या भिंती भरून गेल्या आहेत. जातक कथांवर आधारित अनेक चित्रे इथे पाहायला मिळतात. त्यापैकी हे चित्र आहे षडदंतच्या कथेचे.



अजिंठा लेणी – षडदंत हत्ती आपले सुळे काढून देतांना.


प्रेम, न्याय, दया, क्षमा, त्याग आदि गुण शिकवणाऱ्या जातक कथा भारतात व भारताबाहेर देखील प्रसिद्ध होत्या. पंचतंत्रातील गोष्टींबरोबरच या गोष्टी सुद्धा लहान मुलांना आजही सांगितल्या जातात. काळाच्या ओघात बरेच बौद्ध साहित्य टिकले नाही. पण जातक कथा मात्र अमर झाल्या!

- दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@