बुद्ध, मार्क्स आणि डॉ. आंबेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018   
Total Views |



‘बुद्ध की कार्लमार्क्स’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला एक अप्रकाशित निबंध आहे. एक धर्म आणि साम्यवाद एक राज्यव्यवस्था अशा दोन भिन्न गोष्टी असताना बुद्ध की कार्ल मार्क्स यांची तुलना बाबासाहेबांना का करावीशी वाटली, हे समजून घेतल्याशिवाय त्यांच्या विचारांचा अर्थबोध होणार नाही. बाबासाहेबांसमोर समाजकारणी म्हणून कोणते प्रश्न होते आणि उत्तरांचे कोणते विकल्प होते हे कळलं की त्यांच्या विचारांच्या तत्त्वापर्यंत जाता येतं.

तुलना का ?


स्वातंत्र्य मिळालं होतं आणि राष्ट्राच्या पुनर्रचनेची धुरा संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावर होती. भारत आपलं स्वातंत्र्य राखू शकेल की नाही, इतिहासाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, समाजाला लागलेली अंतर्गत कलहांची कीड कशी संपणार, जाती, धर्म, भाषा यांवर आधारित वर्गवारी ही देशाला पुन्हा कोणत्या संकटात नेणार अशासारखे अनेक प्रश्न तेव्हा भारतासमोर होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणांमधून ते वेळोवेळी मांडले आहेत. समाजामध्ये न्याय आणि समता प्रस्थापित करणं, हे तेव्हा समाजासमोरचं एक मोठं आव्हान होतं, जे त्यांनी संविधानाचा मसुदा करताना पेललंच होतं. पण समाजात त्यासाठी विशेष प्रयत्न करणंही गरजेचं आहे असे ते मानत होते. साम्यवाद आणि बुद्धाला जोडणारा विचार हा ‘समता’ होता, ‘दुःख निर्मुलन’ होता आणि त्यासाठीच ही तुलना त्यांना गरजेची वाटली असावी.

साम्यवादाला अपेक्षित असलेली समता ही आर्थिक होती. कार्ल मार्क्सने भांडवलदारांना कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचा उपाय सुचवला. तो बळाचा मार्ग होता. या बळाचा वापर करून निर्माण झालेली कामगारांची हुकुमशाही कधी संपेल आणि तिची जागा काय घेईल, तिच्याऐवजी कोणते शासन असेल याचं उत्तर साम्यवादाकडे नव्हतं आणि ते बुद्धाकडे होतं, ते म्हणजे प्रजासत्ताक शासनपद्धती. याचाच अर्थ साम्यवाद जिथे उत्तर देऊ शकत नाही, तिथे धर्म उत्तर देतो कारण धर्म हा जीवनमार्ग दाखवतो. बाबासाहेबांच्यां समतेची संकल्पना अशी वरवरची नव्हती तर त्याच्या तत्त्वाप्रमाणे ते पोहोचले होते. माणसाचे मन, स्वभाव हा नैतिकतेने बदलण्याचा, दुःख निर्मूलनाचा आणि सामाजिक समतेचा मार्ग म्हणून ते धर्माकडे – बौद्ध धर्माकडे बघत होते.

तत्त्वप्रणाली

बाबासाहेब, बौद्ध आणि कार्ल मार्क्सच्या तत्त्वप्रणालीचा ऊहापोह करतात. बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानानुसार माणूस व नीति धर्माचे केंद्र आहे, सर्व समान आहेत, माणसाचे मूल्यमापन त्याच्या कर्तृत्वाने व्हायला पाहिजे, कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही, प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षणास पात्र आहे, कोणतीही गोष्ट अंतिम नाही, कोणतीही गोष्ट बदलास पात्र आहे, खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते, दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे, सर्व मानव समान आहेत. वर्ग कलह सोडवण्याचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय.

मार्क्सच्या सिद्धांतानुसार मालक व कामगार या दोन वर्गांमध्ये विभागणी झाली आहे, त्यामध्ये वर्ग कलह चालू आहे, पिळवणूक चालू आहे आणि ही पिळवणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयीकारण करून म्हणजे खाजगी संपत्ती नष्ट करून संपुष्टात आणता येईल, कामगार संख्येने जास्त असल्यामुळे ते हुकुमशाही प्रस्थापित करू शकतील.

बाबासाहेब आपल्या लेखनात यातल्या ‘खाजगी मालकी’ या शब्दाची तुलना करतात. बुद्ध आणि साम्यवाद यांची खाजगी मालकी आणि समतेची भाषा तीच असली तरी त्याच्या वैचारिक अधिष्ठानात जमीन आसमानाचा फरक आहे. भगवान बुद्ध आध्यात्मिक पातळीवर ‘आसक्ती’ विषयी बोलतात. बुद्धांनी सांगितले की, “जिथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल – मग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो – तेथे मालकी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची हाव दिसून येणार नाही.” बुद्धाचे खाजगी मालकीचे नियम हे शासनप्रणाली विषयक नाहीत तर तात्त्विक अंगाने जाणारे आहेत.

साधनमार्ग

बाबासाहेब सामाजिक समता निर्माण होण्यासाठी दोघांकडून वापरल्या जाणाऱ्या साधनांविषयी लिहितात आणि तिथे या दोघांतला फरक हा अजूनच अधोरेखित होतो. गौतम बुद्धांनी यासाठी पंचशील मार्ग जसे की चोरी, पशुहत्या, असत्य, कामवासना आणि मादक पेयांपासून अलिप्त राहणे असे सांगितले आहे. असमानतेमुळे निर्माण झालेलं दुःख हे, ‘अष्टांग मार्ग’ ज्यामध्ये शांततापूर्ण, प्रामाणिक आचरण, उच्च संकल्प, अंधश्राद्धांपासून मुक्ती, करुणेची आणि सत्याची भाषा अशासारख्या साधनांच्या वापरानेच दूर होऊ शकतं. बुद्ध हे मार्ग ओळखण्याच्या अडचणींचा म्हणजे निब्बानाचा सिद्धांतही मांडतात. दहा आसव (आश्राव) स्वार्थ, धार्मिक विधींचे स्तोम, दुष्ट भावना, शारीरिक वासना, अहंकार, हट्टाग्रह अशासारख्या अडचणी यामध्ये येऊ शकतात. आपल्या ‘परमितांच्या सिद्धांतामध्ये’ बुद्धाने पुढे अडचणींवर मात करून माणसाने दहा सद्गुण जसे की प्रज्ञा, शील, ऐहिक सुखांचा त्याग, दान, प्रयत्न, शांति, सत्य, अधिष्ठान, मैत्र आणि अलिप्तता यांचा अंगीकार करून दुःख, पिळवणूक दूर होऊन समता प्रस्थापित होऊ शकते हेच सांगितले आहे.

शाश्वत मार्ग

साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने ही झटपट अंमलात येणारी आहेत ती म्हणजे हिंसा आणि कामगारांची हुकुमशाही. बाबासाहेब अशा प्रकारे त्यातलं साम्य आणि भेद दाखवून देतात. आणि कामगारांची हुकुमशाही संपविण्यासाठी साम्यवादाकडे उत्तर नाही हे नमूद करतात. तसंच कामगारांची का असेना पण हुकुमशाहीत केवळ पालन करणे एवढेच कर्तव्य असते, पण तिच्यावर टीका करण्याचा हक्क साम्यवाद देत नाही. समता साध्य करण्यासाठी साम्यवादी तर इतर मौल्यवान साध्यांचा नाश, हिंसा, लोकांच्या कत्तली हे मार्ग अनुसरतात ज्या मार्गांनी ती नाहीच साध्य झाली तर त्यावर काही उपाय नाही. मात्र धर्माच्या मार्गाने ती जरी पुन्हा पुन्हा अयशस्वी ठरली, तरी त्यावर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे हा उपाय असू शकतो. अशा अर्थाने तो शाश्वत मार्ग असतो.

धर्माची आवश्यकता

धर्माची आवश्यकता बाबासाहेबांना अतिशय प्रकर्षाने वाटत होती. कारण भारतीय समाजाची नस त्यांना माहित होती. हुकुमशाहीने आपले साध्य मिळवल्यानंतर कशा स्वरूपाचे शासन असेल यावर साम्यवादाकडे उत्तर नाही. बळाशिवाय असणारे राज्य म्हणजे अराजक असेल. परंतु बळ काढून घेतल्यावर राज्य कायम राखू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म असे बाबासाहेबांना वाटत होते. मात्र साम्यवादी धर्म मानायला तयार नाहीत. साम्यवाद्यांचे धर्मविषयक दोन आक्षेप म्हणजे, ते लोकांना परलोकात नेतात आणि इहलोकात गरिबी भोगायला लावतात आणि दुसरा म्हणजे, ‘धर्म ही लोकांसाठी अफू आहे.’ कारण धर्म गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. परंतु हे दोन्ही आक्षेप ख्रिस्ती धर्मावरून करण्यात आलेले असल्याने बाबासाहेबांनी ते मानले नाहीतच, उलट जीवनाच्या तथ्यांशी, माणूस आणि नीतीशी नातं सांगणाऱ्या धर्माची आवश्यकता त्यांनी कायमच मानली.

धर्म आणि इहवाद


बाबासाहेबांचा इहवादी दृष्टिकोन संविधानातील तरतुदींमध्येही दिसून येतो. संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द न लिहूनही आणि नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देऊनही बाबासाहेब संविधानाची इहवादी मांडणी करण्यात यशस्वी झाले. निरनिराळ्या धर्मांमधील निरनिराळा उपासनेचा हक्क नागरिकांना घोषित करताना त्यांनी सर्व इहवादी म्हणजे या भूतलावरील बाबींवर जसे की विवाह, प्रार्थनास्थळे व्यवस्थापन, त्यांच्या मिळकती व्यवस्थापन या सर्व बाबींवर शासनाचे नियंत्रण ठेवले. याचाच अर्थ त्याला इहवादी ठेवले. आणि बुद्धाचा इहवाद मान्य करूनही किंवा बुद्धाची खाजगी मालकीविषयक वा आसक्तीविरहित अवस्था आदर्श मानूनही ते म्हणतात, “बहुसामर्थ्याने प्राप्त केलेली व स्वकष्टाने मिळविलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय्य मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धीच आहे. तोच गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी बनवितो व पूर्ण समाधानी होतो. तसेच त्याचे आई वडील, पत्नी, मुले, सेवक व मजूर, मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवितो व त्यांनादेखील समाधान देतो.”

दोषविरहित मार्ग

साम्यवादाच्या हिंसक आणि तात्पुरत्या मार्गाचा समता प्रस्थापनासाठी ते असा धिक्कार करतात. समता प्रस्थापित करताना समाजाला सहभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही, साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो. समता, सहभाव व स्वातंत्र्य या सर्व गोष्टी देऊ शकत नाही. हे बाबासाहेब अंतिमतः निक्षून सांगतात. बरोबरीनेच बौद्धमार्गाने जाताना न्याय्य मार्गाने संपत्ती कमविणे, मालकी प्रस्थापित करणे गैर मानत नाहीत आणि प्रजासत्ताक शासनप्रणालीच योग्य असल्याचे सांगतात. आपल्या नीरक्षीर विवेकाने ते समता, स्वातंत्र्य आणि सहभाव मूल्ये असलेल्या हिंदू धर्मातील त्याकाळी प्रकर्षाने असलेल्या जातीभेद आणि धार्मिक विधी स्तोम असे दोष वगळल्यानंतर उरणाऱ्या, इथल्या मातीतल्या आणि हिंदू धर्माला जवळच्या असलेल्या बौद्धमार्गाला निवडतात.

- विभावरी बिडवे
@@AUTHORINFO_V1@@