नवी दिल्ली : आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तेलगु देशम पक्षाच्या नेत्यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आदेश दिल्यानंतर देशात आता एका नवीन राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. नायडू यांच्या निर्देशानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि टीडीपीचे नेते वाय.एस. चौधरी यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, तर केंद्रीय विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी यावर बोलणे टाळत, आज राज्यसभेत आणि लोकसभेत आपण आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे टीडीपी आणि बीजेपी यांच्या युतीचे पुढे काय ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नायडू यांनी आपल्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये युती तोडण्याविषयी कसलाही ठोस निर्णय अद्याप घेण्यातला नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु तरी देखील सरकारमधून नेत्यांना बाहेर पडण्याचे आदेश दिल्यामुळे देशात अनेक उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे. त्यामुळे भाजपने या विषयी टीडीपीशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. नायडू यांनी घेतलेल्या या निर्णयावर दोन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील असे भाजपने म्हटले आहे. तसेच भाजप सरकार आंध्र आणि त्यातील जनतेसाठी आवश्यक ती सर्व मदत आणि प्रयत्न करत असल्याचे देखील भाजपने सांगितले आहे. वाय.एस. चौधरी यांनी पक्षाचा आदेश हा सर्वोच्च असून आपण आपल्या पदाचा त्याग करण्यासाठी तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे. तसेच आंध्र बरोबर कधीही अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या उलट गजपती यांनी राजीनाम्यासंबंधी बोलणे टाळत, पत्रकरांचे प्रश्नच उधळून लावले. भाजप-टीडीपी युती आणि आपला राजीनामा या दोन्हीही विषयांवर दोन्ही सभागृहात आज आपली बाजू मांडू असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गजपती नायडू यांच्या निर्णयावर काय ? भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या सगळ्यांचा आपल्याशी काडीमात्र देखील संबंध नसलेल्या शिवसेनेने मात्र या वादात उडी घेत भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप पहिल्यापासूनच आपल्या जोडीदारांचा विश्वासघात करत आला आहे. त्यामुळे भविष्यात हे असे होणार हे आम्हाला अगोदरपासूनच माहित होते. त्यामुळे भाजपने नीट वर्तन न केल्यास येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव निश्चित आहे. तसेच विष्यात सर्व घटक पक्ष देखील रालोआमधून बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेनी दिली आहे.