|| भारताबाहेरील रामकथा ||

    23-Mar-2018   
Total Views | 256



रामकथेचा विस्तार


रामकथा दूरदूर पर्यंत पोचली. प्रत्येकाला ती आपली वाटली. त्यामुळे प्रत्येक भागात ती तिथले रूप घेऊन नटली. आज भारताबाहेरच्या रामकथा ...

|| अफगाणिस्तान, पाकिस्तान ||


दशरथाची भार्या कैकयी ही गंधारच्या उत्तरेला असलेल्या केकयची देशाच्या अश्वपती राजाची कन्या. गंधार म्हणजे आताचे अफगाणिस्तानातील ‘कंदाहर’ हे शहर. हा प्रांत म्हणजे भरताचे आजोळ. भरताची मुले – पुष्कल व तक्ष यांनी गंधार प्रांतात – पुष्कलावती आणि तक्षशीला नगरी वसवल्या. तर रामपुत्र लवने, लवपुरी नगरी वसवली असे म्हणतात. या नगरींची आताची नावे आहेत – पेशावर, तक्षीला आणि लाहोर.


अयोध्येहून येणारा उत्तरापथ हा महामार्ग थेट तक्षशीलेला पोचत असे. तसेच युरोप, इजिप्त, पर्शिया, रशिया आणि चीन यांना जोडणारा प्राचीन Silk Road तक्षशीले वरून जात असे. Egyptian glass, Persian carpets, Indian spices, Chienese silk इत्यादी व्यापाराचा हा राजमार्ग. या महामार्गावरून रामकथा आणि बौद्ध धर्म सुद्धा देशोदेशी पोचला.

गंधार प्रदेशात रामायणातील अनेक नावे आजही दिसतात. जसे - काबूल नदीचे एक नाव होते सीता नदी. हिंदुकुश पर्वताच्या नावातील ‘कुश’ रामपुत्र कुश वरून आले आहे असे काहीजण मानतात. हिंदूकुश पर्वतरांगां मधील एका शिखराचे नाव आहे सीताराम / सिकाराम.

|| तिबेट, चीन, मंगोलिया ||

तिबेट मधल्या एका रामायणात राम हनुमानाबरोबर सीतेला देण्यासाठी एक पत्र देतो आणि सीता हनुमानाबरोबर रामाला पत्रोत्तर पाठवते असा रंगवले आहे. तिबेटी रामायणाची काही जुनी हस्तलिखिते ब्रिटीश म्युझ्यियम मध्ये पाहायला मिळतात.

३ ऱ्या शतकात बौद्ध जातकातून रामकथा चीन मध्ये पोचली होती. रामकथेतील पात्रांनी इथे चीनी नावे धारण केली आहेत – लोमो (राम), लोमन (लक्ष्मण), नालोयेन (नारायण), पोलोरो (भरत)! इथे नवीन रचलेल्या हनुमानाच्या कथा लोकप्रिय आहेत. चीनमध्ये हनुमान प्रसिद्ध झाला तरी, जपानच्या रामायणात हनुमान नाही! जपानच्या रामायणाचे नाव आहे रामाएन्शो. कथेत बारीक बारीक बदल होत, मोंगोलिया मध्ये पोचलेल्या रामायणात असे दिसते की लक्ष्मणाच्या ऐवजी भरतच रामाबरोबर वनवासात गेला.

|| कम्बुजदेश ||


साधारण इ.स पूर्व १ ल्या शतकात कौंडिण्य नावाचा एक ब्राह्मण समुद्रमार्गाने भारतातून कंबोडियामध्ये पोचला. याने तेथील नाग राजकन्या ‘सोमा’ बरोबर विवाह केला. कौंडिण्यने तिथल्या लोकांना भारतीय भाषा शिकवली, लिपी शिकवली, संस्कृती शिकवली, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था शिकवली. कालांतराने भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व धार्मिक साहित्य या भागात रुजले.

४ थ्या शतकात आणखी एक कौंडिण्य कंबोडियामध्ये पोचला. या भारतीय राजाला दृष्टांत झाला की, तो कंबोडियाचा राजा होणार आहे. तेव्हा तो समुद्रमार्गे कंबोडियामध्ये पोचला. या शिवाय अनेक गुजराती, बंगाली व दक्षिण भारतीय व्यापारी, बौद्ध भिक्षू आग्नेय आशियामध्ये भारतीय संस्कृती घेऊन पोचले.


हळूहळू कंबोडियामध्ये ब्राह्मी लिपीतून तयार झालेल्या लिपी मधून संस्कृत भाषेतील शिलालेख दिसू लागले. दक्षिण भारतीय पद्धतीने बांधलेली शिव, विष्णू व बौद्ध मंदिरे दिसू लागली. मंदिरांवर पौराणिक कथांची शिल्पे दिसू लागली. भारतीय शालिवाहन शक वापरू लागले. भारताप्रमाणे – नवीन वर्ष, दिवाळी सारखे सण इथे आजही साजरे केले जातात.

पौराणिक साहित्या बरोबरच इथे रामायण, महाभारत सुद्धा कम्बुजमध्ये पोचले. जसे भारतात प्रत्येक भाषेत रामायण लिहिले गेले, तसेच इथे सुद्धा स्थानिक रामायणे लिहिली गेली. लाओस मधल्या रामकथेचे नाव आहे – “फ्रा लक फ्रा लाम”. हे लक्ष्मण व रामाचे चरित्र आहे. या कथेत राम गौतम बुद्धाचा पूर्व जन्म सांगितला आहे. “सेरी राम” हे मलेशिया मधले रामायण. तर “रामकेर्ती / रामाकीयन” हे कॅम्बोडिया मधील रामायण. ब्रह्मदेशातला राम “याम” आहे. रामकथा आणि रामराज्य यांची विलक्षण पकड दिसते ती “आयुथ्या” या राज्याच्या नावातून. १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत, थायलंडमध्ये आयुथ्या (अयोध्या) नावाचे राज्य भरभराटीस आले होते.


आणखी एक उल्लेख केला पाहिजे कोरियाचा. १ ल्या शतकात, अयोध्येची राजकन्या सुरीरत्ना हिने कोरियाच्या राजाशी विवाह केला होता. सुरीरत्ना बद्दल असलेल्या अत्यंत आदरामुळे, इथली सर्व मंडळी अयोध्येला आजोळ समजतात. दर वर्षी हजारो कोरियन अयोध्येला भेट देण्यासाठी भारतात येतात.

कालौघात आग्नेय आशियाशी भारताचा संपर्क तुटला. इथली भारतीय संस्कृती भारताच्या विस्मृतीत गेली. Colonization च्या काळात युरोपियन लोक जेंव्हा भारतात तसेच इंडोनेशिया, कंबोडिया आदि भागात गेले, तेंव्हा तेथील संस्कृतीचा अभ्यास करतांना भारतीय संस्कृती व आग्नेय आशियातील संस्कृती मधील साम्य लक्षात आले. यावेळी फ्रेंच व डच लोकांनी या भागाला ‘Greater India’ असे संबोधले.


इराण व अफगाणिस्तान मधील इस्लामच्या आक्रमणानंतर त्या भागातली आणि विभाजनानंतर पाकिस्तान मधली भारतीय संस्कृती हळूहळू विरळ होत गेली.

नुकतीच झालेली Indo – ASEAN Summit, अयोध्येमध्ये सुरीरत्ना राणीसाठी मोठ्या स्मारकाची बांधणी, इराण मधील चाबहार बंदर इत्यादी प्रकल्पांमधून या सर्व देशांशी नव्याने खोल संबंध प्रस्थापित होत आहेत, ही एक जमेची बाजू आहे.


टीप -

आग्नेय आशियातील देशांची नवीन व जुनी नावे आहेत -

कम्बुजदेश = Thailand + Cambodia + Laos

चंपा = Vietnam

सुवर्णभूमी, सुवर्णद्वीप = Malayasia + Indonesia

ब्रह्मदेश = Burma / Siam / Myanmar


- दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121