|| कालिदासाची रामकथा ||

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018   
Total Views |


सुवर्णमृग. पट्टचित्र शैली.

कालिदास

संस्कृत काव्याला पडलेलं एक रम्य स्वप्न म्हणजे कालिदास. कालिदासाचे काव्य सरल, सुंदर आहे. त्यामध्ये क्लिष्टता नाही. त्याच्या उपमांना तोड नाही!
पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठीका अधिष्ठित कालिदासा |
अद्यापि तत्तुल्य कवे: अभावात् अनामिका सा अर्थवती बभूव ||

कवींची गणना करायचा प्रसंग आला असता, करंगळी पासून मोजायला सुरुवात केली. पहिला कवी, करंगळी म्हणजे कालिदास! करंगळीच्या शेजारच्या बोटासाठी दुसरा तुल्यबळ कवी न मिळाल्याने ते बोट अनामिक राहिले! पूर्वी पासून आजपर्यंत ते बोट ‘अनामिका’ या नावाने जाणले जाते!

कालीदासाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक आहे - एकदा एक पंडित कालिदासाशी वाद घालायला त्याच्या गावी गेला. तो पंडित पालखीतून जात असतांना त्याने भोयाला विचारले – “अयम् आन्दोलिकदण्डः स्कन्धे बाधति किं तव​? अर्थात- पालखीच्या दांड्याने तुझा खांदा दुखतोय का?” भोई म्हणाला – “न तथा बाधते दण्डो यथा बाधति बाधते. तुमच्या वाक्यातला ‘बाधती’ हा चुकीचा शब्द जितका खुपला तितका काही पालखीचा दांडा खुपत नाही!” कालिदासाच्या गावाचा भोई सुध्दा व्याकरणातील चुका काढणारा निघाल्याने तो पंडित आला तसा निघून गेला!

कालिदासाच्या बद्दल सांगितली जाणारी अजून एक आख्यायिका आहे एका राजकन्येची. विद्योत्तमा नावाची राजकन्या होती. तिने विचारलेल्या प्रश्नांची जो बरोबर उत्तरे देईल त्याच्याशीच तिने लग्न करायचे ठरवले होते. कसलेसे वैर असलेल्या मंत्र्याने, एक भोळसट तरुण पढवून समोर आणून उभा केला. राजकन्येला म्हणाला, “याचे मौनव्रत आहे. तू त्याला प्रश्न विचार तो तुला खुणेने उत्तर देईल. मी त्याच्या खुणांचा अर्थ सांगेन.” राजकन्येने ते मान्य केले, व प्रश्न विचारू लागली. “पाच इंद्रियात श्रेष्ठ कोण?” हे विचारतांना हाताचा पंजा दाखवला. त्या भोळ्या तरुणाला वाटले, ती विचारतेय, “तुला चापरख मारली तर काय करशील?” त्याने मूठ दाखवली, “मी गुद्दा मरीन!” या अर्थाने. त्या चाणाक्ष मंत्र्याने मुठीचा अर्थ सांगितला, “पाच इंद्रियांना काबूत ठेवणारे मन सगळ्यात श्रेष्ठ आहे, असे तो सांगत आहे!” अशा प्रकारे राजकन्येने प्रश्न विचारावे, तरुणाने मनाला येईल तशा खुणा कराव्यात व मंत्र्याने त्याचे बरोबर उत्तर सांगावे! करत करत हा तरुण विद्योत्तमेच्या परीक्षेत पास झाला.

राजकन्येचा विवाह तिने निवडलेल्या या भोळ्या तरुणाशी राजाने लावून दिला. पण लवकरच खरा प्रकार तिच्या लक्षात आला. तेव्हा, “नाव कमवल्या शिवाय परत येऊ नकोस!” असे सांगून तिने नवऱ्याला घराबाहेर काढले. त्यावर त्या तरुणाने कालीमातेची उपासना केली. कालीमाता प्रसन्न झाली. तरुणाने ‘कालिदास’ नाव धारण केले. घरी परत आला तेव्हा बायकोने विचारले, “अस्ति कश्चित् वाग्विशेष:”, तू काय विशेष वाङगमय निर्मिती केलीस? त्यावर कालिदासाने या तीन शब्दांपासून सुरु होणारी तीन अजरामर काव्य लिहिली – कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश.

कालिदासाने स्वत: बद्दल काहीही लिहून ठेवले नाही. इतरांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली खरी, पण त्याच्या बद्दल काहीच ऐतिहासिक माहिती लिहिली नाही. तो कोण, त्याचे खरे नाव काय, कोणत्या गावचा, आई-वडील, बायको – मुले काहीच माहिती मिळत नाही.

कालिदासाने मालविकाग्नीमित्र या नाटकाच्या सुरुवातीला भासाचा उल्लेख केला आहे, “भासाची, सौमिलची प्रसिद्ध नाटके असतांना माझे नाटक कोणी वाचेल का?” असा त्याला प्रश्न पडला आहे. या वरून तो भासाच्या नंतर होता हे कळते. मालविकाग्नीमित्र मधला नायक – अग्निमित्र शुंग हा इस. पूर्व २ ऱ्या शतकात होऊन गेला. त्यामुळे कालिदास त्याच्या नंतरचा असणार. उज्जैनचे अतिशय सुंदर वर्णन करतो म्हणजे तो दीर्घकाळ उज्जैनला राहिला असणार. मेघदूतमध्ये रामटेकचे वर्णन येते, त्यामुळे तो तिथे काही काळ राहिला असणार.

त्याच्या काव्यामध्ये शंकराची स्तुती वारंवार येते. कुमारसंभव हे शंकर-पार्वतीवरच रचलेले काव्य आहे. तर, रघुवंश रामावर असून सुद्धा, त्याच्या सुरुवातीला शिवस्तुती आहे. यावरून तो शिवभक्त असावा असे वाटते. उज्जैनला वास्तव्य असलेल्या कालिदासाचे दैवत उज्जैनचा शिव असावा. येथील शिवाचे एक नाव आहे – कालिन्. या कालिन्चा दास म्हणून तो कालिदास, हे अधिक योग्य वाटते.

कालिदास विक्रमादित्यच्या दरबारातील राजकवी होता हे मान्य केले जाते. कालिदासाच्या ‘विक्रमोर्वषीय’ ह्या नाटकाच्या नावातील ‘विक्रम’ या राजासाठी आहे असे मत आहे.

पारंपारिक मतानुसार, कालिदास इ.स. पूर्व १ ल्या शतकातील उज्जैनचा विक्रमादित्यच्या दरबारात होता. या विक्रमादित्याने शकांचा पराभव केल्यावर, इ.स. पूर्व ५७ मध्ये विक्रम संवत् सुरु केले होते असे मानले जाते. हा राजा दोन प्रसिद्ध कथांचा नायक आहे – ‘विक्रम-वेताळ’ आणि ‘सिंहासन बत्तीशी’. त्याच्या दरबारात नऊ विद्वान मंत्री होते, जे "नवरत्न" म्हणून प्रसिद्ध होते. त्या नवरत्नांपैकी एक होता कवी कालिदास.

काहींच्या मते कालिदास हा इस. ४ थ्या शतकातील गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त II च्या दरबारातील राजकवी होता. सम्राट चंद्रगुप्तने माळवा येथील कार्दामक शकांचा पराभव करून ‘शकारी’ हे बिरूद मिरवले. त्याचे आणखी एक बिरूद होते - ‘विक्रमादित्य’. ‘रघुवंश’ मधील अज राजाच्या दिग्विजयाचे वर्णन चंद्रगुप्तचे वडील समुद्रगुप्तच्या दिग्विजयासारखे आहे. ‘कुमारसंभव’ हे नाटक चंद्रगुप्त पुत्र कुमारगुप्तच्या जन्मानंतरचे असावे असेही वाटते.

रघुवंश

कालिदासाची दोन महाकाव्ये रघुवंश व कुमारसंभाव, ही पंचमहाकाव्यांमध्ये गणली जातात. कालिदास रचित कैक नाटके, खंडकाव्ये व महाकाव्ये असून सुद्धा त्याची ओळख आहे – रघुकार! रामाचे चरित्र सांगणारा कवी!

कालिदासाचे रघुवंश, रघुकुलातील राजांचे चरित्र सांगणारे महाकाव्य आहे. याच्या १९ सर्गातून, रघुकुलातील २८ राजांचा इतिहास आला आहे. दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, आणि रामोत्तर राजे, अशी ही कथा आहे. कालिदासाने दिलेली वंशावळ आणि पुराणातील वंशावळीत थोडा फरक आहे.

रघुवंशची सुरुवात राजा दिलीप आणि सुदक्षणा राणीने पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या नंदिनीच्या सेवेने होते. त्या काळातील त्यांचे तपोमय जीवन, दिलीपची परीक्षा व त्यानंतर रघुच्या जन्माने होते. रघु या पराक्रमी राजावरून या कुळाला ‘रघुवंश’ म्हटले गेले. पुढे त्याने केलेला अश्वमेध यज्ञ, रघूच्या दिग्विजयाचे वर्णन, रघुचा राज्याभिषेक व कौत्सचा आशीर्वाद इत्यादी वर्णन केला आहे. त्यानंतर अजचा जन्म, अज – इंदुमती विवाह, दशरथाचा जन्म आणि इंदुमती व अजचा मृत्यू हा कथाभाग येतो.

रघुवंशमध्ये इंदुमतीचे सौंदर्य, इंदुमतीचे स्वयंवर, अजचे इंदुमती वरील प्रेम, इंदुमतीचा एकाएकी मृत्यू झाल्यामुळे अजचा विलाप आणि त्या दु:खात त्याने घेतलेली जलसमाधी हा भाग फार सुंदर रंगवला आहे. इंदुमती स्वयंवराचे वर्णन करतांना कालिदास म्हणतो -
संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।

इंदुमती वरमाला घेऊन एक एक राजपुत्र ओलांडून पुढे जात होती, तसे त्या त्या राजपुत्राचा चेहेरा, मशालधारी दालनातून निघून गेल्यावर दालनात जसा अंधार पसरतो, तसा काळवंडत होता!

अज नंतर दशरथाची कथा - श्रावणबाळापासून सुरु होते. दशरथाला पुत्रवियोगाचा शाप, त्याचा पुत्रकामेष्ठी यज्ञ, राम जन्म व परिचित रामकथा येते. रामाचा वनवास, सीताहरण, सुग्रीवाशी मैत्री, सेतू बंधन, राम-रावण युद्ध, रावणाचा पराभव आदी कथाभाग येतो. रावणवधानंतर पुष्पक विमानातून अयोध्येला परत जातांना, राम व सीतेचा संवाद कालिदासाने हळुवारपणे वर्णन केला आहे. दोघांची ताटातूट झाली असतांना जे जे घडले, ते राम सीतेला सांगत आहे. लंकेपर्यंत पोचण्यासाठी बांधलेला सेतू, राम अभिमानाने दाखवून म्हणतो –

वैदेहि पश्या मलयाद्विभक्तम् मत्सेतुना फेनिलमम्बुराशिम् |
छायापथेनेव शरत्प्रसन्नमाकाशमाविष्कृतचारूतारम् ||

सीते! शरद ऋतूतील निरभ्र व अंधेऱ्या रात्रीचे चांदण्यांनी मढलेले प्रसन्न आकाश, आकाशगंगा ज्याप्रमाणे विभागते, तसे मी बांधलेला सेतू या फेसाळ समुद्राचे विभाजन करतो! पहा तो दूर पर्यंत गेलेला सेतू! कालिदासाची प्रतिभा अशी की, ज्याने रात्री आकाशगंगेची शोभा पहिली आहे आणि विमानातून खाली दिसणारा समुद्र पहिला आहे, त्याला दोन्हीतील साम्य चटकन डोळ्यासमोर उभे राहील!

राम सीतेला त्याने तिचा कुठे कुठे शोध घेतला हे सांगतो. तू नसतांना माझी अवस्था कशी झाली होती, आणि लक्ष्मणाने मला त्या काळात कसे सावरले, हे सांगतो.

एतग्दिरेर्माल्यवत: पुरस्तादाविर्भवत्यम्बरलेखि श्रुंगम् |
नवं पयो यत्र घनैर्मया च त्वद्विप्रयोगाश्रू समं विसृष्टम् || 

सीते, तो पहा माल्यवान पर्वत! तुला शोधत मी वर्षा ऋतूच्या सुरुवातीला या परिसरात फिरत होतो. त्या गगनचुंबी पर्वतावर मेघांनी ढाळलेली पावसाची पहिली सर आणि तुझ्या विरहाने माझ्या नेत्रांनी ढाळलेली अश्रुंची सर, एकाच वेळी पडली होती.

तुला आठवते, या गुहेत एकदा मेघांच्या गडगडाटाला घाबरून तू मला आलिंगन दिले होतेस? त्याच गुहेत मी नंतर तुझ्या आठवणीत पावसातली रात्र कुस बदलत घालवली होती.

एकदा अशोकवृक्षाची फांदी, तूच आहेस असे समजून धरायला गेलो, तेंव्हा लक्ष्मणाने पाणावलेल्या डोळ्यांनी माझे सांत्वन केले होते.

अयोध्येच्या अलीकडे काही कोस पुष्पक विमान उतरते. भरत राम, सीता, लक्ष्मणाला अयोध्येला घेऊन जातो. नंतर रामराज्याभिषेक, सीतेचा त्याग, लव-कुशचा जन्म, लव-कुशाचे अयोध्येत रामायण गान, सीतेचा भूमीत प्रवेश आदि कथानक येते.

रामानंतर कुशकडे राज्य येते. शेवटच्या ३ सर्गात, कुशच्या नंतरच्या २२ राजाचे वर्णन येते. शेवटचा राजा अग्निवर्ण विलासी जीवन जगतो, प्रजेचा अवमान करतो आणि परिणामी रघुवंशचा अंत होतो.

संदर्भ –

१. संस्कृत साहित्याचा सोपप्तिक इतिहास – करंबळकर
२. रामकथा उत्पत्ती और विकास - फादर कमिल बुल्के
३. रघुवंश – चित्रशाळा प्रकाशन


- दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@