२०१४ साठी पुन्हा शुभेच्छा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018   
Total Views |



मोदींनी मुलाखत द्यावी म्हणून वाहिन्यांचे संपादक वाडगा घेऊन फिरत होते. त्यांना मुलाखत देताना मोदींनी बहुतेक संपादकांना अंगठा दाखवित दुय्यम पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. त्यातून अशा नामवंत संपादक पत्रकारांची प्रतिष्ठा लयास गेली. मात्र, त्यासाठी मोदींना दोषी मानता येणार नाही. या प्रत्येकाने आपल्याच हाताने व प्रयत्नांनी ही दुर्दशा ओढवून आणलेली होती. त्यांना फक्त शुभेच्छाच देणे शक्य होते.


मी कधीच कोणाला कसल्या शुभेच्छा देत नाही, हे आजवर अनेकदा सांगून झाले आहे. पण, जेव्हा आपण एखाद्याला इच्छा असूनही कसली मदत करू शकत नाही आणि त्याचा सत्यानाश उघड्या डोळ्यांनी बघण्याची पाळी येते; तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा अधिक काही आपल्या हाती उरलेले नसते. कारण, अशी व्यक्ती स्वत:च विनाशाकडे धावत सुटलेली असते. साक्षात ईश्वरही त्याला त्या विनाशापासून वाचवू शकत नसतो. म्हणूनच, २०१४च्या आरंभी किंवा २०१३च्या अखेरीस एका लेखातून मी तेव्हाचे उदयोन्मुख राजकीय नेते अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. कारण, हा होतकरू नेता आपलाच कपाळमोक्ष करून घ्यायला धावत सुटलेला होता. त्याला प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या वारेमाप पोरकट प्रसिद्धीचा इतका मोह झालेला होता की, त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर लाथ मारलीच; पण त्याच्याकडे ‘भावी नेता’ म्हणून बघणार्‍यांची पुरती निराशा करून टाकलेली होती. १९७७ सालचा जनता पक्षाचा प्रयोग नक्कीच फसला होता. पण, आणीबाणीविरुद्धच्या त्या लढाईत जे अनेक युवक उदयास आले, त्यातून पुढल्या तीन-चार दशकात समाजाच्या विविध घटकांना नेतृत्व देऊ शकतील, असे नेते उदयास आलेले होते. लालू यादव, मुलायमसिंह यादव, रामविलास पासवान, देवेगौडा वा प्रमोद महाजन अशी ती पिढी होती. लोकपाल आंदोलनाने पुन्हा एकदा वैफल्यग्रस्त समाजातील तरुण पिढी आपली अलिप्तता सोडून राजकीय घडामोडीकडे वळली होती आणि त्यातून नवे नेतृत्व उदयास येण्याची पूर्ण शक्यता होती. पण, तिला आकार येण्यापूर्वीच केजरीवाल यांनी नसत्या उठाठेवी करून त्या आंदोलनाचा व त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचा चुराडा करून टाकला. म्हणूनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्या केजरीवालपुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या तरुणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून सार्वजनिक जीवनात येऊ बघणाऱ्या नव्या पिढीची भ्रूणहत्या करणाऱ्या संपादक विचारवंतांसाठीही होत्या. कारण, त्यातून त्यापैकी अनेकांची इतिश्री होताना मला दिसत होती.

 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीचे वेध पाच राज्यांच्या विधानसभा मतदानातून लागलेले होते. त्यात तीन विधानसभा भाजपने जिंकल्या आणि लोकपाल आंदोलनाचा प्रवर्तक असलेल्या केजरीवाल यांचा प्रभाव असल्याने राजधानी दिल्लीत भाजपचे बहुमत हुकलेले होते. त्याचा वारेमाप गाजावाजा माध्यमातील पत्रकारांनी केला व भाजपच्या अन्य तीन राज्यांतील यशाला झाकोळून टाकण्याचे डाव खेळले. तिथपर्यंत ठिक होते. पण, पुढल्या सहा महिन्यांत या माध्यमांत दबा धरून बसलेल्या काही मान्यवरांनी जणू मोदीविरोधात आघाडीच उघडली होती. त्यात केजरीवालना मोदींचे आव्हान म्हणून पुढे आणले गेले. त्या अर्ध्या हळकुंडाने केजरीवाल पिवळे झाले तर समजू शकते. पण, असल्या पोरखेळात बुडणाऱ्या काँग्रेससहित आपली पत्रकारी प्रतिष्ठा व माध्यमांची विश्वासार्हता धुळीस मिळेल, याचेही भान या दिग्गजांना राहिले नाही. त्याच्या परिणामी नरेंद्र मोदी जिंकले व काँग्रेस निवडणुकीत सफाचट झाली. हा एक भाग होता. पण, त्यात परस्पर अनेक संपादक मान्यवर पत्रकार कुठल्या कुठे बेपत्ता होऊन गेले ना? तेव्हाचे नामवंत प्रणय रॉय, बरखा दत्त, विनोद दुआ, राजदीप सरदेसाई, अनेक वाहिन्या व वर्तमानपत्रे आज नावापुरते उरले आहेत. त्यांना ती प्रतिष्ठा राहिलेली नाही, त्यांना कोणी संपवावे लागले नाही, त्यांनीच आपला आत्मघात ओढवून आणला होता. ‘विश्वनाथन’ नावाच्या सामाजिक मानसशास्त्रज्ञाने त्याचे विश्लेषण ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकात करताना आपल्या नाकर्तेपणाची कबुलीही दिलेली होती. मोदींनी काँग्रेसला नव्हे, तर माझ्यासारख्या उदारमतवाद्याला कसे पराभूत केले, अशा आशयाचा लेख त्याने लिहिला होता. तो त्याच्यापुरता मर्यदित नव्हता तर एकूणच देशातील बुद्धिवादी वर्गासाठी होता. मग तेव्हा जर कुठल्याही निवडणुका न लढता असा वर्ग पराभूत झाला असेल, तर त्यापासून तो काही धडा शिकला की नाही?

 

आजकाल राफेलच्या नावाने जो शिमगा नित्यनेमाने चालू आहे, त्याचवेळी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतला दलाल सीबीआयच्या तावडीत असतानाही त्यावर माध्यमांनी टाकलेला पडदा बघितल्यावर २०१४चा काळ आठवतो. युपीएने वाजवलेले दिवाळे झाकून मोदींवरचे दंगलीचे आरोप किंवा त्यांच्या कुठल्या क्षुल्लक शब्द वा कृतीवरून वादळे उठवली जात होती, त्याकडे ढुंकूनही न बघता मोदींनी आपली प्रचार मोहीम चालवली व थेट बहुमतापर्यंत मजल मारली. त्यात काँग्रेससहित सगळा बुद्धिवादी वर्ग गारद होऊन गेला. मधल्यामध्ये कारण नसताना केजरीवालही खच्ची होऊन गेले. आता पुन्हा लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर त्याच वर्गाची झोप उडाली आहे आणि तितक्याच हिरीरीने पुन्हा हे सगळे लोक कामाला लागलेले आहेत. तेवढ्याच तावातावाने मोदींना बहुमत मिळवता येणार नाही आणि बहुमत हुकले की दुसरा कोणी पंतप्रधान निवडावा लागेल; असे नवे तर्क रंगविण्याची शर्यत सुरू झाली आहे. तेव्हा केजरीवाल यांच्या कुठल्याही खुळेपणाला अपरंपार प्रसिद्धी दिली जात होती आणि त्यावरच चर्चा चाललेल्या होत्या. पण, मोदींच्या होणाऱ्या मोठमोठ्या सभा किंवा त्याला मिळणारा प्रतिसाद झाकून ठेवला जात होता, पण समाजमाध्यमातून मोदी लोकांपर्यंत पोहोचू लागले आणि टीआरपी घसरू लागला, तेव्हा मोदींच्या प्रत्येक सभेला मग नित्यनेमाने प्रसिद्धी देण्याची अगतिकता आलेली होती. अखेरच्या टप्प्यात तर माध्यमांना इतकी लाचारी आली की, मोदींनी मुलाखत द्यावी म्हणून वाहिन्यांचे संपादक वाडगा घेऊन फिरत होते. त्यांना मुलाखत देताना मोदींनी बहुतेक संपादकांना अंगठा दाखवित दुय्यम पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. त्यातून अशा नामवंत संपादक पत्रकारांची प्रतिष्ठा लयास गेली. मात्र, त्यासाठी मोदींना दोषी मानता येणार नाही. या प्रत्येकाने आपल्याच हाताने व प्रयत्नांनी ही दुर्दशा ओढवून आणलेली होती. त्यांना फक्त शुभेच्छाच देणे शक्य होते.

 

आज पाच वर्षे उलटून गेल्यावर त्याच आत्मघातकी मार्गाने माध्यमे व त्यातले दिवाळखोर आत्मघाताला सिद्ध झाले आहेत; अन्यथा त्यांनी राहुल गांधींच्या कुठल्याही खुळचटपणाला इतकी प्रसिद्धी देऊन काहूर माजवले नसते. राफेल किंवा अन्य जे काही आरोप राहुल गांधी नित्यनेमाने करीत असतात, त्यात पाच वर्षांपूर्वीच्या केजरीवाल यांच्या बेताल आरोपांपेक्षा किंचितही फरक नाही. अशा बिनबुडाच्या आरोपांनी मोदींना तेव्हा लगाम लावता आला नाही की, मतदारही बहकला नाही. मग आज त्याच बोथट हत्याराने मोदींवर वार होऊ शकेल काय? तो झाला नाही आणि मोदी पुन्हा सुखरूप बहुमताचा पल्ला गाठून गेले, तर काय होईल? पुन्हा एक संपादकांची व नाव कमावलेल्या पत्रकार विचारवंतांची पिढी गारद होऊन जाईल. कारण विचारवंत पत्रकार किंवा अभ्यासकांचे अस्तित्व त्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. ती कमी झाली वा रसातळाला गेली, मग त्यांच्याकडे लोक ढुंकून बघायला तयार नसतात. कारण निवडणुका लोकमताने जिंकल्या हरल्या जातात आणि प्रसारमाध्यमांत त्याच्याच सत्यतेला छेद देणाऱ्या गोष्टींवर भर असला, मग त्यांची विश्वासार्हता लयाला जात असते. मोदी सरकारवर कुठलाही भ्रष्टाचार वा गैरकारभाराचा ठाम आरोप कोणी करू शकत नसेल आणि कुठलाही पुरावा समोर आणलेला नसेल; तर आरोपकर्त्याच्या बरोबरच त्याला प्रसिद्धी देणार्‍यांची विश्वासार्हता संपत असते, केजरीवालच्या बाबतीत तेच झाले होते. आता राहुलच्या आतषबाजीने त्याचीच पुनरावृत्ती चालली आहे. त्याची मतदानातली किंमत राहुल वा काँग्रेस मोजतीलच. पण त्यामध्ये हकनाक बळी जायला पुढे सरसावलेल्यांना आपण काय मदत करू शकतो? त्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही. हवा आणि वातावरण २०१४ सारखे साकार होऊ लागले आहे, त्यात कोणाचे बळी जातात, ते पाच महिन्यांनी समोर येईलच. अशा सर्वांना नववर्षाच्या आणि त्यांच्या आत्मघातकी मोहिमेसाठी शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@