चोराला हवी शाही बडदास्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018   
Total Views |

 

 
खरंच अजब देश आहे आपला. कायम गुलामगिरी अन्प्रजेच्या मानसिकतेत जगणार्या इथल्या जनतेला एखाद्याचे मोठेपण एकदा का मान्य झाले, की गुन्हेगाराच्या श्रेणीत उभा राहिला तरी त्याला कुर्निसात करण्यातच धन्यता वाटते लोकांना. तो चोर, लुटारू असला तरी त्याच्या बडदास्तीत कुठेही कमतरता राहू नये यासाठी धडपडणार्यांना अजून काय म्हणणार? लालूप्रसाद यादवांपासून तर सलमान खानपर्यंत अन्सहाराच्या सुब्रत रॉयपासून तर बँक लुटारू विजय मल्ल्यापर्यंत... सर्वांबाबत हीच स्थिती आहे. चोर्या करून शिरजोर झालेल्या या शहाण्यांना आपल्या कुकर्माची लाज वाटत नाही जराशी. चारा घोटाळा करून आपण कोट्यवधी रुपये गबन केल्याची थोडीशीही खंत लालूंच्या चेहर्यावर दिसत नाही. ज्यांनी मोठ्या विश्वासानं आपल्याला कायम सत्तेत ठेवले, त्या बिहारातील नागरिकांची लूट आपण केल्याचे उघड झाल्यावरही चेहर्यावरची रेषही हलत नाही यांच्या.
 

या निगरगट्टांना कारागृहातले मच्छरही चावलेले चालत नाही. तिथे पाहिजे तशी बडदास्त नाही म्हणून तक्रार असते त्यांची! सुब्रत रॉय यांची कहाणी तर अजून काही और आहे. त्यांनी तर, इथली कारागृहं त्यांच्यासारख्या लोकांच्यालायकीचीनसल्याने स्वत:ची पंचतारांकित व्यवस्था स्वतंत्रपणे उभारली आहे. कारागृहाचे फक्त नाव आहे. बाकी वातानुकूलित खोलीपासून तर खानपानापर्यंतच्या सार्या व्यवस्था त्यांच्या स्वत:च्या आहेत- पैसा मोजून उभारलेल्या. आता, विजय मल्ल्याचा वकील इंग्लंडमधल्या न्यायालयात तक्रारी करतोय्‌, भारतातील कारागृहांमधील व्यवस्था दर्जेदार नसल्यानेसाहेबांनाकुठे ठेवणार म्हणून! मग काय, भारतीय अधिकार्यांनीही मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमधील एका छानशा खोलीची छायाचित्रे पाठवली तिकडे. तिथल्या न्यायव्यवस्थेलाही ती छायाचित्रे भावली. त्यांनी मान्यता दिली. मल्ल्यासाहेबांनी तिथे राहायला हरकत नसल्याची ग्वाही दिली. मग स्वारी निरुत्तर झाली.

 

हो! बरोबर आहे. मल्ल्यासाहेब म्हणजे काय लहान हस्ती आहे? मोठ्ठे चोर ते! त्यांनी काय, चारदोन हजार रुपयांची लूट थोडीच केली आहे. एकूण किती शून्य लावावेत असा प्रश्न पडावा, अशा मोठमोठ्या आकड्यांचे कितीतरी बँकांचे कर्ज बुडवण्याचा विक्रम आहे त्यांच्या नावावर. कर्ज बुडवूनही या देशाचे सरकार आपले काहीही बिघडवू शकणार नाही, साधी कारवाईदेखील कुणी करू शकणार नाही, अशा पद्धतीने विदेशात पळून जाण्याची ताकद आहे त्यांची. चोरांमध्येही श्रेणीवरचीआहे त्यांची. अतिशय उच्च दर्जाचे लुटारू आहेत ते. त्यांनी इतर छोट्या-मोठ्या गुन्हेगारांच्या गराड्यात राहणे शोभणार आहे का सांगा बरं त्यांना? लज्जास्पद आणि अपमानजनक नाही का ते त्यांच्यासाठी? त्यांच्यासाठीची व्यवस्था तर खासच असली पाहिजे. बडदास्तही तशीच असली पाहिजे. उच्च पातळीची. खास अधिकारच नाही का तो त्यांचा. एरवी कारागृहातही मानवाधिकाराचे स्तोम माजवले जाताहे आताशा. टीव्हीपासून तर वर्तमानपत्रांपर्यंत सार्या व्यवस्थांचा आग्रह धरला जातो तिथल्यासाठी. मग लालू, सलमान, रॉय, मल्ल्यांसाठी स्वतंत्र, दर्जेदार व्यवस्थांचा आग्रह अग्राह्य कसा मानायचा?

 

आपण केलेले गुन्हे विसरून, बँकांची लूट आणि जनतेची फसवणूक विसरून स्वत:च्या श्रीमंतीचा माज कायम ठेवत विजय माल्याने, आपण एका पैशाचे कर्ज घेतले नसल्याचे, ते तर किंग फिशर नावाच्या आपल्या मालकीच्या कंपनीने घेतले असल्याचेतांत्रिककारण पुढे करून, आपण कसे साव आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करणे, यात नवल ते नाहीच. कधीकाळी या देशाच्या संसदेत मिरवलेल्या या माणसाने, स्वत:वरील कारवाई टाळण्यासाठी या देशातल्या कारागृहातील व्यवस्थांचे लंडनमधल्या न्यायालयात वाभाडे काढण्याचेही आश्चर्य नाहीच. आश्चर्य आहे ते या गोष्टीचे, की या देशातील जनतेलाही या चोरांचे हे नखरे मान्य आहेत. कोट्यवधीचा भ्रष्टाचार करूनही लालूप्रसाद यादवांना कारागृहात त्रास होत असल्याचा राग त्यांच्या चेल्याचपाट्यांना येतो. काळविटाची शिकार करून सलमानने भलेही कायद्याची ऐशीतैसी केली असेल, पण म्हणून त्याला शिक्षा वगैरे व्हावी हे काही सहन होत नाही त्याच्या चाहत्यांना. एवढ्या मोठ्या कलावंताला कारागृहात राहावे लागणे हे काही पचनी पडत नाही त्यांच्या. पैशाच्या जोरावर अन्तेवढ्याच एका निकषावर जेलमध्येही श्रीमंती थाट कुणाच्या वाट्याला येत असेल अन्या देशातल्या एकालाही त्यात काहीही वावगे वाटत नसेल, तर ही बाब दुर्दैवी अन्आश्चर्यजनकही ठरते.

 

कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन, ते बिनधास्त वापरून, कायदा पायदळी तुडवत कर्ज परत न करता देश सोडून पळून जाणार्या, विजय मल्ल्या नावाच्या एका माणसाला भारतातल्या कारागृहांची अवस्थाआपणराहण्याच्या लायकीची नसल्याचा कांगावा लंडनच्या न्यायासनासमोर करताना लाज वाटू नये थोडीशीही? असे कोणते तीर मारून पळून गेला होता हा शहाणा, की त्याच्यासाठी पंचतारांकित व्यवस्था उभारायच्या भारत सरकारने जेलमध्ये? तो काय स्वातंत्र्यसमरात लढलेला वीर आहे, की कुठल्याशा सामाजिक क्रांतीत अमूल्य योगदान आहे त्याचे? मग का म्हणून द्यायची त्याला ही सवलत?

 

एकूणच भारतीय समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब मल्ल्याच्या या माजोर्या वर्तणुकीतून उमटलेले दिसते. तर दुसरीकडे, गुलामगिरी स्वत:कडे राखत राजपद इतरांना बहाल करण्याच्या, लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्याची मल्ल्यांसारख्यांची तर्हाही त्यातून अधोरेखित होते ती वेगळीच. फारसा विचार न करता एखाद्याला देवत्व बहाल करून, त्याच्या तस्बिरी थेट देव्हार्यात ठेवून, त्याच्या आरत्या ओवाळण्याइतका हा समाज भाबडा असला, तरी लालू-मल्ल्यांच्या संदर्भातील त्याची भूमिका भाबडेपणा नसून सरळ सरळ मूर्खपणा ठरते. गुन्हेगाराला शिक्षा देण्याची पद्धतही अशी गरिबी-श्रीमंतीवर आधारित भेद करू लागली, तर मग कुठल्या गर्भश्रीमंताला दंड होईल भविष्यात? झालाच कधी चुकून तरी त्या मिळमिळीत दंडापायी भीती कुणाला वाटेल कायद्याची? पैसा फेकला की तमाशा उभा करता येतो, कायदे खुंटीवर टांगून ठेवता येऊ शकतात, शिक्षा होण्याची शक्यता असेल, तर सहज विदेशात पळून जाता येते, झालीच चुकून शिक्षा तर शिक्षा वाटू नये, इतक्या अलीशान तर्हेने ती भोगण्याची व्यवस्था इथल्या व्यवस्थेला तुकवून करता येऊ शकते, हा समज खिशात सतत पैसे खुळखुळणार्या वर्गात दृढ झाला, तर मग त्या वर्तुळात जो माज चढेल अन्उर्वरित समाजात त्याच्याबद्दलचा जो रोष निर्माण होईल, त्याच्या एकूणच परिणामांची जबाबदारी कोण स्वीकारणार?

 

म्हणूनच, आपण कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे धारक असल्याने, इथली व्यवस्था काय नि कायदे काय, काहीच आपल्याला लागू होत नसल्याच्या निष्कर्षाप्रत विजय माल्याने येणे वेगळे आणि दस्तुरखुद्द समाजाला त्याची ही मुजोरी मान्य असणे त्याहून वेगळे. ज्या वेळी समाजालाही, कायदा लागू करण्याबाबत असा भेद अंमलात येणेे तितकेसे चूक नसल्याचे वाटते, ते अधिक घातक आहे. ज्याचा अंदाजही बांधता येणार नाही, असा भविष्यातील विद्रोह एकतर त्यातून प्रतिध्वनित होतो किंवा मग एका षंढ समाजाच्या संथ वर्तणुकीची ग्वाही त्यातून मिळते. दोन्ही बाबी अयोग्य... तेवढ्याच धोकादायकही. जवळ असलेल्या पैशाच्या जोरावर चढलेली मल्ल्याची गुर्मी जितकी घातकी, त्याच्या गुन्हेगारीला सलाम करण्याची समाजाची वृत्तीही तितकीच दुर्दैवी.

 

नावाला लोकशाहीव्यवस्था अंमलात आणून प्रत्यक्षात स्वत:चा राजेशाही थाट जोपासण्याची, जनतेला स्वत:च्या तालावर नाचवण्याची जी परंपरा देशाच्या प्रथम पंतप्रधानांनी आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनीही जोपासली, लोकांच्या गळी तेवढ्याच बेमालूमपणे उतरविली, त्यातून त्यांची घराणेशाही तर टिकली, तो तोराही जपला गेला, पण लोकशाही मात्र दुर्बळ अन्निरर्थक ठरली. स्वत:चा मनमानी कारभार चालवण्यात आलेला अडथळा सहन न झाल्याने थेट आणिबाणी लागू करत लोकशाहीव्यवस्थेला तिलांजली देण्याची इंदिराजींची भूमिका काय नि स्वत:च्या प्रत्यार्पणाला विरोध दर्शविण्यासाठी प्रस्थापित भारतीय कायद्याच्या पेकाटात लाथ हाणत इथल्या व्यवस्थेविरुद्ध कांगावा करत चाललेला मल्ल्याचा थयथयाट काय, पद्धत काय ती बदलली. बाकी, दोघांचीही मुजोरीच त्यातून ध्वनित होते...

@@AUTHORINFO_V1@@