दृष्टी आड सृष्टी नसते!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2018   
Total Views |



भाजपवरची नाराजी अन्य पक्षाला मत देण्यातून व्यक्त होते किंवा कुठल्याही पक्षाला मत न देण्यातूनही व्यक्त होते. ती फ़क्त ‘नोटा’तूनच व्यक्त होत नाही. शिवाय आपले मत परिस्थिती व अनुभवानुसार बदलणे हा मतदाराचा अधिकार आहे. तो ‘नोटा’तून व्यक्त होऊ शकतो, त्यापेक्षा अधिक घातक परिणाम दुसऱ्या पक्षाला मत देण्यातून होतो. साहजिकच ‘नोटा’ दाबणाऱ्यांनीच भाजपला पाडले, असला दावा मतदाराचा आणि लोकशाहीचाही अपमान करणारा आहे. काँग्रेसची मते वाढली वा भाजपची कमी झाली, म्हणजेच काही हजार मतदारांनी यावेळी भाजपकडे पाठ फिरवली आहे. ती फिरवताना त्यांनी अन्य पक्षांना कौल दिला असेल, तर त्याला गुन्हेगार समजणे लोकशाहीला घातक असते. किंबहुना आपलीच फसवणूक करून घेणे असते.


 

“You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality.”

- Ayn Rand

 

सत्य नाकारले किंवा त्याकडे पाठ फिरवली म्हणून ते संपत नाही की, त्याचे परिणाम भोगण्यातून सुटका नसते. हेच सतत काँग्रेस करत आली आणि त्यावर पडदा घालण्यासाठी माध्यमांसहीत बुद्धिमंतांचा उपयोग काँग्रेसने केला, म्हणून त्या पक्षाची दुर्दशा झालेली आहे. ताज्या निवडणुकीतून तो पक्ष सावरत असताना भाजपने तीन राज्ये गमावली आहेत. पण त्याकडे डोळेझाक करून काँग्रेसचे समर्थक आपल्याला तीन राज्यांत निर्णायक सत्ता मिळाल्याचा आनंदोत्सव करण्यात गर्क आहेत. निदान आरंभीचे दोन-तीन दिवस त्यांना त्यातून सवलत द्यावी लागेल. कारण, विजयाचा आनंद घेताना त्यांनी दु:खाचा सोहळा साजरा करावा, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. पण त्यांच्याकडून भाजपचे अनेकजण काही धडा शिकलेले दिसत नाहीत. कारण, आजवर आपल्या अपयश वा पराभवावर काँग्रेस जशी पांघरूण घालत राहिली, तसाच काहीसा प्रकार मंगळवारच्या निकालानंतर भाजपच्याही समर्थकांकडून होत आहे. तुम्ही तीन राज्यांतली सत्ता गमावली हे व्यवहारी सत्य आहे आणि ‘नोटा’ वा तत्सम काही कारणे दाखवून विजय हुकल्याचे दावे निरर्थक आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेसचे समर्थक हेच करत बसले आणि एकामागून एक राज्ये काँग्रेसला गमावण्याची पाळी आली. कधी ईव्हीएम वा कधी धनशक्तीचे आरोप करून काँग्रेसने आपल्या पराभवावर पांघरूण घातलेले होते. त्यातून युक्तीवाद जरूर साधला गेला. पण येणारे पराभव टाळता आले नाहीत. आता असले युक्तीवाद बाजूला ठेवून तीन राज्यांमधील भाजपच्या विरोधातला किरकोळ असंतोष संघटित केला, म्हणून त्यांच्या हाती निसटती सत्ता लागलेली आहे आणि तोच अशा बाबतीतला धडा असतो. पण समाजमाध्यमे वा अन्यत्र भाजपचे समर्थक तो धडा शिकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. अन्यथा ‘नोटा’मुळे मध्यप्रदेश व राजस्थानात सत्ता कशी गेली, त्याचे युक्तीवाद ऐकायला मिळाले नसते.

 

काँग्रेसच्या समर्थकांनी ईव्हीएमवर शंका घेऊन मागली दीड-दोन वर्षे काहुर माजवले होते. म्हणून मतदान यंत्रे बदलली गेली नाहीत, किंवा कर्नाटक वा गुजरातमध्ये काँग्रेसला यश संपादन करता आलेले नव्हते. असे आरोप वा युक्तीवाद लोकांचे मनोरंजन करायला लाभदायक नक्की असतात. पण त्यामुळे सामान्य मतदाराचे मन जिंकता येत नाही. त्यानेच तर मतदान केलेले व बदल घडवलेले असतात. म्हणूनच त्या आरोपाचा वा काहूर माजवण्याचा राजकीय लाभ काँग्रेसला मिळू शकला नव्हता. त्याचप्रमाणे त्यांची टवाळी करण्यात कालापव्यय करणाऱ्या भाजप समर्थकांना आपल्या पक्षाला चार मते मिळवून देणेही शक्य झालेले नाही. तसे असते तर तीन राज्यांत भाजपला सत्ता गमावण्याची पाळी आलीच नसती. ती आली कारण यंत्रातील ‘नोटा’ असे बटण नसून पक्षात आलेली मरगळ किंवा खोटा आत्मविश्वास त्याला जबाबदार आहे. कोणीतरी मध्य प्रदेशच्या ११ मतदारसंघातले आकडे दिलेले आहेत आणि तिथे ‘नोटा’ दाबलेल्यांनीच भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, असा दावा केलेला आहे. ‘नोटा’ म्हणजे जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी कुणालाही पसंती नसल्याचा कौल असतो. म्हणजे मतदार मत द्यायला येतो आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारून जातो. साहजिकच त्याचे मत गणतीमध्ये येत नाही. त्याने आपली एकूण उमेदवार किंवा सर्वच राजकीय पक्षांविषयी नाराजी नोंदवलेली असते. तो आपले मत वाया घालवतो, असा त्यातला दावा आहे. ते बटण जर सर्वांना नाकारणारे असेल, तर ते भाजपच्या बाजूचे होते आणि गणतीत नसल्याने आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे गृहीत, आपलीच फसगत करणारे आहे. कारण, मतदाराला आपली नापसंतीच व्यक्त करायची होती आणि त्याने ते काम केले आहे. जर त्याने तेच मत भाजपविषयी नाराजी म्हणून काँग्रेस वा अन्य कुणाला दिले असते, तर निकालात फरक पडणार होता काएकूण मतदानाची टक्केवारी बघितली व त्यातली पक्षनिहाय टक्केवारी बघितली तरी, भाजपची मते पूर्वीच्या तुलनेत काहीशी घटलेली आहेत. म्हणजेच पूर्वी भाजपलाच आपले मत देणाऱ्या अनेकांनी काँग्रेस वा भाजप सोडून अन्य कोणाला तरी मत दिलेले आहे.

 

भाजपवरची नाराजी अन्य पक्षाला मत देण्यातून व्यक्त होते किंवा कुठल्याही पक्षाला मत न देण्यातूनही व्यक्त होते. ती फ़क्त ‘नोटा’तूनच व्यक्त होत नाही. शिवाय आपले मत परिस्थिती व अनुभवानुसार बदलणे हा मतदाराचा अधिकार आहे. तो ‘नोटा’तून व्यक्त होऊ शकतो, त्यापेक्षा अधिक घातक परिणाम दुसऱ्या पक्षाला मत देण्यातून होतो. साहजिकच ‘नोटा’ दाबणाऱ्यांनीच भाजपला पाडले, असला दावा मतदाराचा आणि लोकशाहीचाही अपमान करणारा आहे. काँग्रेसची मते वाढली वा भाजपची कमी झाली, म्हणजेच काही हजार मतदारांनी यावेळी भाजपकडे पाठ फिरवली आहे. ती फिरवताना त्यांनी अन्य पक्षांना कौल दिला असेल, तर त्याला गुन्हेगार समजणे लोकशाहीला घातक असते. किंबहुना आपलीच फसवणूक करून घेणे असते. मोदींच्या थापा किंवा मार्केटिंग व प्रचाराला मतदार भुलला, असे २०१४ पासून काँग्रेसवाले म्हणत आलेले आहेत. कारण, त्यांची मते कमालीची घटली आणि पैकी काही मते भाजपच्या पारड्यात येऊन पडलेली होती. पण ते सत्य काँग्रेस समर्थकांना वा त्यांच्या प्रचारक संपादकांना लपवायचे होते. पण ते लपवल्यामुळे काँग्रेसचेच लोक गाफील राहिले आणि त्यांनी जनतेमध्ये जाऊन मतदाराला चुचकारण्यात आळस केला. म्हणून मते आणखी कमी होत गेली आणि एकामागून एक राज्ये हातून निसटली. त्यातून आता काँग्रेसला जाग आलेली दिसते. म्हणूनच त्यांनी जनतेत जाऊन मतदाराला प्रभावित करण्याचा मार्ग चोखाळला. त्याचा लाभ त्यांना थोडासा मिळाला आहे. अजून भाजपविषयी जनमत तितके विरुद्ध गेलेले नाही. पण असल्या ‘नोटा’ विरोधातल्या भूमिकेने समर्थकच भाजपचे अधिक नुकसान करतील.

 

राजस्थान वा मध्य प्रदेशात काँग्रेसला लोकांनी भरभरून मते दिलेली नाहीत किंवा भाजपला निर्णायक रितीने नाकारलेले नाही. २०१३ सालात जसे प्रचंड मताधिक्याने काँग्रेसला नाकारलेले होते, तसे आज भाजपला त्याही राज्यात लोकांनी झिडकारलेले नाही. दोन्ही पक्षांची मते व टक्केवारी तुल्यबळ आहे, अशाच मतदाराची भाजपला पुन्हा लोकसभेतही मते हवी आहेत; तर दुरावलेल्या मतदाराला चुचकारून परत आणण्याला प्राधान्य असायला हवे. त्यापेक्षा आपल्या पराभवाचे खापर ‘नोटा’सारख्या बटण वा मतदारावर फ़ोडणे आत्मघातकी आहे. मग भाजप आणि काँग्रेस यांच्यात फरक काय उरला, असेच लोक म्हणतील ना? जितके असे लोक नाराज होतील तितका मग त्याचा मतदानावर अधिक परिणाम होऊ शकतो. कारण ‘नोटा’ दाबल्याने भाजपचा उमेदवार पडलेला नसतो किंवा काँग्रेसचाही विजयी झालेला नसतो. आज काँग्रेसला ईव्हीएम यंत्राविषयी शंका नाही आणि पराभवाच्या वेळीच असायची. तोही यंत्राचा नव्हे, तर मतदाराचाच अवमान होता. कारण, दृष्टीआड सृष्टी म्हणतात तसा व्यवहार नसतो. व्यवहारात सामान्य माणूस समोर दिसणारे सत्य सहज स्वीकारत असतो. त्याला सत्य स्वीकारण्यासाठी कुठल्या युक्तीवादाची गरज नसते. ‘नोटा’ दाबणारे मतदानालाच आले नसते, तर भाजपच्या मतात वाढ किंवा घट होणार नव्हती. मग उगाच त्यांच्याविषयी आगपाखड कामाची नाही आणि तसेच करायचे असेल, तर काँग्रेसपेक्षा भाजप वेगळा कुठे उरतो? असाही विचार सामान्य लोकांच्या मनात येणारच. आज जितका आपला विजय काँग्रेस डंका पिटून मोठा करून दाखवते आहे वा त्यांचे समर्थक दाखवित आहेत, तितका तो निर्णायक विजय नक्कीच नाही. पण त्यासाठी भाजपवालेही अशाच बिनबुडाच्या युक्तीवादाच्या आहारी गेले, तर लोकांची नाराजी त्यांना आणखीनच गाळात घेऊन जाऊ शकते. कारण, सत्य समोर असते. आणि दृष्टी आड सृष्टी म्हणून सत्याकडे पाठ फिरवता येत नसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@