हा खेळ सावल्यांचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018   
Total Views |

 
“आबा उद्याचे ग्रहण आपण एकत्र पाहू.”, हातातील binoculars नाचवत सुमित म्हणाला, “चंद्रावर पडणारी पृथ्वीची सावली पाहायला मजा येईल!”
 
“सावलीचे कसे आहे? ती सतत आपल्या सोबत असते. त्या सोबतीची आपल्याला इतकी सवय होते, की आपण सावलीला विसरून जातो! तसे पहिले तर आपण रोज रात्री पृथ्वीच्या सावलीत निजतो! आपले रोज रात्री पृथ्वीच्या सावलीत जाणे अन् सकाळी पुनश्च सूर्यप्रकाशात येणे, हा प्रवास इतका नित्याचे आहे, की त्या बद्दल काहीच अप्रूप वाटत नाही.
 
“पण जेंव्हा आकाशात चमकणारा, पांढराशुभ्र पौर्णिमेच्या चंद्राचा गोळा, अलगद त्या सावलीत हरवतो, तेंव्हा मात्र त्या महाकाय सावलीचे अस्तित्व आपल्याला जाणवते!
 
“या अथांग महावकाशात पृथ्वीची सावली लांबच लांब पसरली असते. पृथ्वीची सावली पृथ्वीच्या बरोबरीने चालते. पृथ्वीच्या मागे मागे धावते. पृथ्वीच्या गतीने पृथ्वीचा पाठलाग करत सूर्याभोवती फिरते. पृथ्वी तर प्रचंड आहेच, पण तिच्या पेक्षा तिची सावली फार मोठी आहे. अतिभव्य, अतिप्रचंड आहे! साधारण १२,७०० किलोमीटर व्यासाच्या पृथ्वीची सावली, अंतराळात १४ लाख किलोमीटर दूर पर्यंत पसरली असते.“, आबा म्हणाले.
 


 
 
“Wow! सूर्याबद्दल आपण बोलतो पण त्या प्रकाशाने पडणाऱ्या पृथ्वीच्या सावलीचा असा विचार केला नव्हता.”, सुमित म्हणाला.
 
 
“सुम्या! ३१ तारखेचे चंद्रग्रहण त्या भल्या मोठ्या सावलीचा खेळ आहे! चंद्र त्या सावलीतून प्रवास करता करता काही काळापुरता गायब होणार आहे! आसाम व पूर्वेच्या इतर राज्यात हे ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंत दिसेल. महाराष्ट्रात मात्र संध्याकाळी चंद्र उगवेल तोच मुळी पृथ्वीच्या सावलीत! चंद्रोदयापासून रात्री ९:४० पर्यंत चंद्र ग्रहण दिसेल. त्यानंतर चंद्र पृथ्वीच्या सावलीतून बाहेर पडेल. या चित्रामध्ये ग्रहणाच्या वेळा दिल्या आहेत त्या पुण्यासाठी आहेत.”

 
 
“चंद्राच्या या अवस्थांना – ग्रहण स्पर्श, सन्मीलन, मध्य, उन्मीलन आणि मोक्ष म्हणतात.”, आबा सांगत होते.
 
“ग्रहण काळात उपासना करायला सांगितली जाते. आणि या काळात दान देण्याचीसुद्धा प्रथा आहे. वर्षातून एकदा नाही तर, वर्षभर काही न काही कारण सांगून आपल्याकडे दान करायला सांगितले आहे. असो.”, दुर्गाबाई म्हणाल्या, “शंकरराव, हा अंधारातला चंद्र लालसर रंगात का दाखवला आहे?”, दुर्गाबाईंनी विचारले.
 
“काय होतं, पृथ्वीच्या वातावरणातून जेंव्हा सूर्यप्रकाश जातो, तेंव्हा त्याचे वक्रीभवन होते.”, सुमितच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून आबा म्हणाले, “म्हणजे तुमचे refraction! यामुळे लाल प्रकाश आणि निळा प्रकाश वेगळे होतात. असा लाल – केशरी रंगाचा प्रकाश रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण आकाशात पाहतो! तर जगभरतील प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्ताचा हा refracted लालसर प्रकाश पृथ्वीच्या सावलीत झिरपतो, आणि ग्रहण लागलेल्या चंद्रावर पडतो. त्यामुळे ग्रहण लागलेला चंद्र लालसर दिसतो.”, आबा म्हणाले.
 

“ओह! उद्याचा नीलचंद्र लाल रंगाचा होणार असे तुम्ही म्हणाला होता ते हे!”, सुमितला कोडं उलगडल्याचा आनंद झाला!
 
“उद्याचा चंद्र खरोखर विशेष आहे. महाचंद्र आहे, नीलचंद्र आहे, राहुने ग्रासलेला चंद्र आहे, रक्तवर्णी आहे! भरपूर करामती दाखवून आकाशदर्शकाचे लाड पुरवणार आहे!”, आबा म्हणाले.
 
“आबा, उद्या आपल्याला चंद्रावर पृथ्वीची सावली पडलेली दिसेल. हा पृथ्वीवरचा देखावा झाला. चंद्रावरून हे ग्रहण कसे दिसेल?”, सुमितने पुढे विचारले.
 
“वाह! झक्कास प्रश्न विचारलास मित्रा! चंद्रावरून असे दिसेल की, अमावस्येच्या पृथ्वीचे बिंब सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येत आहे. सूर्य हळूहळू पृथ्वीच्या मागे झाकला जाईल. सूर्य पूर्ण झाकला गेला की चंद्रावर अगदी गडद अंधार पडेल. कदाचित पृथ्वीच्या बिंबाच्या भोवती लाल - केशरी रंगाची किनार दिसेल. चंद्रावर लाल – केशरी रंगाची संध्याकाळ पसरेल. थोडक्यात काय, तर चंद्रावर सूर्य-ग्रहण दिसेल! पृथ्वी वरून जसे सूर्यग्रहण अनुभवतो, अगदी तसचं! 
 
“मात्र काही फरक आहेत. एक असे की – पृथ्वीच्या आकाशातील चंद्रापेक्षा, चंद्राच्या आकाशातील पृथ्वी जवळ जवळ चार पट मोठी आहे. त्यामुळे सूर्य पूर्ण झाकला जाऊन संपूर्ण चंद्रावर पृथ्वीची सावली पडेल. हे ग्रहण नाट्य जवळ जवळ पाच तास चालेल. हा पहा, कोणा चित्रकाराच्या कल्पनेतील चंद्रावरील सूर्यग्रहणाचा देखावा -
 

 
“तुला सांगतो सुम्या, हा सावलीचा खेळ आपण रात्री पाहणार, आपल्याला आकाशात चंद्र आणि चांदण्या दिसणार. पण चंद्रावर मात्र हा खेळ दिवसाढवळ्या रंगणार! पण चंद्रावर वातावरण नसल्याने तिथे दिवसा सुद्धा चांदण्या दिसतात. तिथल्या आकाशात पृथ्वी अमावस्येची असणार, त्यामुळे पृथ्वी दिसणार नाही! चंद्रावरील या सूर्यग्रहणात, दिवसाच्या गडद आकाशात, सूर्य आणि चांदण्या दिसणार! या ग्रहणा बद्दल चंद्रावरचा कवी लिहील –
 
 
दिवसाही खेळ चाले, हा गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा!
हा खेळ सावल्यांचा!”
 
संदर्भ -

1. https://www.timeanddate.com/eclipse/in/india/pune

2. Eclipses of the Sun & Moon - Prof. Richard Pogge

3. Five best things to see during a lunar eclipse, from the moon - 3. Deborah Byrd

4. कालनिर्णय २०१८
www.theweathernetwork.com

6. https://www.businessinsider.in/A-NASA-video-shows-what-a-total-lunar-eclipse-looks-like-from-the-moon-and-its-mind-blowing/articleshow/48963137.cms

7. “रात्रीस खेळ चाले” – सुधीर मोघे यांचे शब्द, पं. हृदयनाथ मंगेंशकरांचे संगीत व महेंद्र कपूर यांनी गायलेले “हा खेळ सावल्यांचा” या चित्रपटातील गीत.

8. रावणछाया, ओडिशाच्या Shadow Puppet Show मधील छायाचित्र.
 
- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@