एटीएसचे प्रशिक्षक ते एटीएसचा बळी

Total Views |
 

 
 
२००८ ते २०१७ अशी नऊ वर्षं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगवास भोगल्यानंतर २१ ऑगस्टला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या नऊ वर्षांत कर्नल पुरोहित यांच्यावर एकही आरोपपत्र महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक दाखल करू शकले नाही.
 
प्रसाद श्रीकांत पुरोहित. पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा. वडील बँकेत नोकरी करणारे. पुण्याच्या अभिनव विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या पुरोहितांनी बी.कॉम.चे शिक्षण बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयात पूर्ण केले आणि पुढे हॉटेल मॅनेजमेंटचे त्यांनी धडे घेतले. शाळा- कॉलेजमध्ये असतानाच पुरोहित एनसीसीमध्येही सहभागी होते.
 
कर्नल चितळे यांच्या प्रेरणेने पुरोहितांनी लष्करात प्रवेश केला. १९९४ साली चेन्नईमधील प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होऊन ते लष्करात रूजू झाले. पुढे ले. कर्नल पुरोहित यांची निवड गुप्तचर विभागासाठी करण्यात आली. संपूर्ण भारतातून ४४ अधिकारी यासाठी निवडले जातात. त्यात कर्नल पुरोहित यांचा समावेश होता. २००२ ते २००५ ही तीन वर्षं कर्नल पुरोहित यांची जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक करण्यात आली होती, जिथे त्यांच्यावर दहशतवादविरोधी कारवाया करणार्‍या पथकाच्या प्रमुख पदाची जबाबदारी होते. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना कडवी झुंज दिली.
 
कर्नल पुरोहित यांच्या सर्व कामगिरीसाठी भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून त्यांचा वेळोवेळी गौरवही करण्यात आला. कर्नल पुरोहित यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला ‘आयएसआय’ विरुद्ध कारवाई करण्याचे प्रशिक्षणही दिले होते. पुढे याच एटीएसने ’अभिनव भारत’ या संघटनेच्या बैठकींना कर्नल पुरोहित यांच्या उपस्थितीच्या धाग्याने त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवले.
 
महू (मध्य प्रदेश) मध्ये असताना एक महाराष्ट्रीयन म्हणून पुरोहितांना थोरले बाजीराव यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांना असे लक्षात आले की, आपल्याला इतिहास एका विशिष्ट चौकटीत माहिती असतो. त्यामुळे मग पुढे त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचाही सखोल अभ्यास केला.
 
 
२००८ साली कर्नल पुरोहितांना मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित म्हणून अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर ‘मोक्का’ लावण्यात आला. त्यामुळे कर्नल पुरोहित यांना जामीन मिळणे निव्वळ अशक्य होते. या प्रकरणात पुरोहित यांना पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. पण या नऊ वर्षांत कर्नल पुरोहितांवर एकही आरोपपत्र दाखल करण्यास एटीएस असमर्थ ठरले. २०१५ साली कर्नल पुरोहित यांच्यावरचा ‘मोक्का’ हटविण्यात आला आणि त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. २१ ऑगस्ट २०१७ ला कर्नल पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यात न्यायालयाने म्हटले आहे की, ‘‘अभिनव भारतच्या बैठकीत सहभागी होणे हा पुरोहित यांच्या नोकरीचा भाग होता. कारण, या बैठकींबद्दलची माहिती पुरोहित यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना वेळोवेळी दिली होती.’’
 
यानुसार एकही आरोपपत्र नसलेल्या आणि तरीही नऊ वर्षं तुरुंंगात खितपत पडलेल्या कर्नल पुरोहितांची जामिनावर सुटका झाली आणि ३० ऑगस्टला कर्नल पुरोहित देशसेवेसाठी पुन्हा एकदा मुंबईतील गुप्तचर विभागात रूजू झाले.
 
आपल्याकडे शिष्यांनी गुरूला हरविणं, हा गुरूचा सर्वोच्च सन्मान मानला जातो, मात्र एकेकाळी महाराष्ट्र एटीएसला प्रशिक्षण देताना कर्नल पुरोहितांना हे जाणवलंही नसेल की, पुढे कधीतरी गुरूची विद्या गुरूलाच अशाप्रकारे अनुभवायला मिळेल.
 
- पद्माक्षी घैसास