संगीतातलं पहिलं भारतरत्न

Total Views |
 

 
एम. एस. सुब्बलक्ष्मी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येते ती प्रतिमा म्हणजे एक वयस्कर तरीही सुरेख दिसणारी ज्येष्ठ गायिका. ज्यांच्या डोळ्यातून त्यांच्या संगीतसाधनेचं तेज परावर्तित होतं असं व्यक्तिमत्त्व. ठसठशीत कुंकू, नाकात पारंपरिक चमकी आणि गळ्यात नितांत सुंदर गोडवा... आपल्या स्वरांनी समोरच्या चेतना आणि आनंद जागविण्याचं त्यांचं कसब लाजवाब होतं.
 
महाराष्ट्र आणि उत्तर भारतात गायल्या जाणार्‍या शैलीपेक्षा वेगळ्या अशा कर्नाटकी संगीतातील एम. एस. सुब्बलक्ष्मी हे नाव सर्वदूर कीर्ति मिळालेलं नाव आहे. संस्कृत भाषेतली असंख्य भजनं आपण हल्ली आपल्या मोबाईलवर सहजतेने ऐकतो. ती खूप मोठ्या प्रमाणात एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली आहेत. या अशा महान गायिकेची आज जयंती.
 
मदुरै षण्मुखवडिवु सुब्बलक्ष्मी या तपस्विनीचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ साली मद्रासमध्ये झाला. त्यांच्या आजी अक्काम्मल यांच्याकडून त्यांना संगीताचा वारसा मिळाला होता. देवदासी परंपरेत एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा जन्मझाला होता. आपल्या लहान भावंडांसोबत संगीताच्या तालमीतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आपला पहिला अल्बमवयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी प्रसिद्ध केला, तर वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी आपलं नाव चेन्नई संगीत अॅकॅडमीच्या प्रसिद्ध गायिकांच्या पंगतीत रूजू केलं होतं. कन्नड व्यतिरिक्त त्यांनी तामिळ, मल्याळी, तेलगू, हिंदी, संस्कृत, बंगाली आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
 
 
 
वैयक्तिक जीवनात सुब्बलक्ष्मी यांनी स्वातंत्र्यसैनिक असलेले सदाशिव यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांच्या साथीने सुब्बलक्ष्मी यांचा पुढील सांगितीक प्रवास अधिकच बहरला. सर्वसामान्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजाच्या चाहत्या होत्या. यात अनेक संगीत क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच पंडित नेहरू, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू यांसारख्या दिग्गजांचाही समावेश होता. सुब्बलक्ष्मी यांना अनेक प्रसिद्ध पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. ज्यात देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ’भारतरत्न’चा (१९९८) समावेश आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे या सन्मानाने गौरविण्यात आले होते. तसंच, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
 
असा हा संगीतातला आठवा सूर ११ डिसेंबर २००४ साली वयाच्या ८८व्या वर्षी अनंतात विलीन झाला. अशा या महान गायिकेला महा एमटीबी तर्फे आदरांजली...
 
 
एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या काही प्रसिध्द रचना - 
 
 
 
 
 
- पद्माक्षी घैसास