शंकरसिंह वाघेला... गुजरातमधील कॉंग्रेसची धुरा खांद्यावर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. नुकतचं त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात आपण कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहिर केले आणि गुजरातमधील राजकारणात एकच खळबळ उडाली. कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते असलेले वाघेलांच्या अश्या अचानक राजीनाम्यामुळे येऊ घातलेल्या गुजरात निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
तर जाणून घेऊयात आज वाघेला यांच्याबद्दल...

७७ वर्षीय शंकरसिह वाघेला उर्फ बापू यांचा जन्म २१ जुलै १९४० ला वासन या गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातल्या झाला. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा वाघेला ७ वर्षांचे होते. पुढे ते शाळेत असताना एकदा त्यांच्या मित्राबरोबर सेवा दलाच्या कॅम्पमध्ये गेले हा त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रमातला सहभाग होता. त्यानंतर महाविद्यालयाच असताना त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली आणि मग संघाच्या मुशीत वाघेला तयार झाले आणि यांचे काम सुरू झाले. पुढे ते भाजपाच्या कामात सहभागी झाले. १९७५ ते १९७७ मध्ये लागलेल्या आणीबाणीत जेलमध्ये गेलेले वाघेला १९७७ सालच्या निवडणूकीत पहिल्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर कपडवंज मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते.
वाघेला यांचा राजकीय दबदबा हा आजही त्यांच्या बोलण्यातूनही दिसून येतो. त्यांच्या भोवती असलेली त्यांची माणसं नेहेमीच त्यांनी जपली आहेत. पक्ष हा सर्वस्व नसतो तर आपले लोक हा लोकशाहीचा कणा असतात तसचं तुमचं काम चांगला की वाईट हे ठरवायला जनतेचा आरसा आहे असं ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या भाषणात म्हणाले होते. त्यावरूनच वाघेला यांनी जरी पक्ष पदलला, नवीन पक्ष सुरू केला, किंवा अपरिहार्य कारणस्तव विरोधी पक्षात त्यांनी प्रवेश केला तरीसुध्दा त्यांच्यामागे ठामपणे उभा असेलेला त्यांच्या जनतेचा पाठिंबा हेच यामागचं गमक आहे.
गुजरात भाजपाचे उपाध्यक्ष, अध्यक्ष असलेले वाघेला हे पक्षांतर्गत राजकारणाचे शिकार झाले आणि १९९६ साली राष्ट्रीय जनता पक्ष या नावाने त्यांनी आपला नवीन स्थापन केला. १९९५ गुजराथमध्ये भाजपच्या सुरेश मेहेता यांचे सरकार होते त्यातूनच वाघेला हे ४७ आमदार घेऊन बाहेर पडले आणि मेहेता यांच्या सरकारला हादरा बसला. आणि त्यानंतर काही काळ गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर लगेचच १९९६ सालच्या निवडणूकांत वाघेला कॉंग्रेसच्या मदतीने सत्ताधारी झाले ज्यात वाघेला यांनी गुजरातचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. हे सरकार फार काळ तग धरू शकलं नाही आणि एका वर्षातच त्यांना या पदावरून पायउतार व्हाव लागलं. या काळात वाघेला यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली त्यातला एक म्हणजे वाघेला सरकार असताना "राईट टू इन्फोरमेशन" हा अधिकार जनतेला देणार गुजरात पहिलं राज्य होतं.
१९९८ मध्ये वाघेला यांनी त्यांचा राष्ट्रीय जनता पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला आणि वाघेला पूर्णपणे कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर झालेल्या १९९९ च्या आणि २००४ च्या निवडणूकीत ते कॉंग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. २००४ च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आले ज्यात त्यांनी मूलभूत काम केल होतं. मात्र २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकांत त्यांना पराभवाला सोमोरे जावं लागलं.
यानंतर २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीला ते कपडवंज मतदार संघातून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा कार्यभार पाहिला. मात्र आत्ता झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत पक्षाशी त्यांनी प्रतारणा केली असे आरोप त्यांचावर चालू असताना त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते आता पुन्हा नव्या वळणावर उभे आहेत.
७७ वर्षीय शंकरसिंह वाघेला यांच्या पिढीतले अनेक नेते सध्या भारतीय राजकारणात सक्रिय आहेत. ज्यात महाराष्ट्रातले जेष्ठ नेते शरद पवार असतील, भाजपाचे मुरली मनोहर जोशी असतील, बिहारचे शरद यादव असतील किंवा तामिळनाडूचे एम. करूणनिधी असतील या सर्व नेत्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आणि त्यांची लोकप्रियता अफाट आहे आणि राहिलं. मात्र आता इथून पुढची त्यांची राजकीय कारकिर्द काय असेल ? असेल की नाही ? हे पाहणं आता औत्सुक्याचे आहे..
- पद्माक्षी घैसास