"सिक्का" ठरला खोटा...  

Total Views |


 

विशाल सिक्का हे नाव चर्चेत आलं ते २०१४ ला. सिक्का यांनी इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्विकारला तेव्हा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दुसरी मोठी कंपनी अशी ओळख असलेल्या या कंपनीच्या एवढ्या मोठ्यापदावर काम करण्याची संधी सिक्का यांना मिळाली होती. पण, काल अचानक सिक्का यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. याचा परिणाम असा झाला की, कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण झाली. कोण आहेत विशाल सिक्का पाहुयात..

विशाल यांचा जन्म शाजपूर, मध्य प्रदेश येथे झाला. त्यांचे वडिल हे रेल्वेत अधिकारी होते तर आई शिक्षिका. वयाच्या ६ व्या वर्षी सिक्का कुटुंबीय वडोदरा येथे स्थायिक झाले. महाराज सयाजीराव विद्यापीठ, बडोदा मध्ये सिक्का हे कॉम्पुटर सायन्स विभागात पद्युत्तर अभ्यास करत असताना त्यांना न्यूयॉर्क मधील विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पुढे सिक्का यांनी स़्टॅन्फर्ड विद्यापीठातून आपली पी.एच.डी पूर्ण केली.

२००२ ते मे २०१४ ही बारा वर्ष विशाल सिक्का हे सॅप कंपनीच्या विश्वस्त मंडळावर काम करत होते. मे २०१४ मध्ये त्यांनी सॅप सोडल्यानंतर ५५ टक्के पगारवाढ देऊन इन्फोसिसच्या मंडळानी सिक्का यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

२०१४ ला इन्फोसिस कंपनीच्या काहीश्या वाईटकाळात सिक्का यांनी पदभार स्विकारला होता. जो पूर्वपदावर आणण्यासाठी सिक्का यांनी कंपनीमध्ये हळुहळु बदल केले. ज्याचा परिणाम पुढे कंपनीच्या नफ्यात दिसत गेला. सिक्का यांनी सूत्र हाती गेतली तेव्हा इन्फोसिसचा शेअर ८३५ रूपये एवढा होता. तर काल शेअरबाजार बंद होताना त्याच शेअरची किंमत १०२० एवढी होती. या तीन वर्षांत इन्फोसिस कंपनीने विप्रो, टीसीएस यासारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकत आपली वाटचाल सुरू ठेवली होती.

मात्र आज अचानक झालेल्या या घटनेनंतर पुन्हा एकदा अनेक वादातीत मुद्दे चर्चिले जात आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये नव्या पिढीकडे सूत्र सोपविणारी इन्फोसिस ही पहिली कंपनी नव्हती. पण, यावरून या दोन पिढ्यामधील कामाची पध्दत, विचार करण्याची पध्दत या मिळतजुळत नसल्यामुळे याचा परिणाम कंपन्यांवर होताना दिसत आहे. 

 

- पद्माक्षी घैसास