भारतीय महिला संघाची तेंडुलकर...

Total Views |


 

मिताली राज.... भारताच्या महिला क्रिकेट विश्वातलं एक महत्वाचं नाव. नुकताचं भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकाच्या दौऱ्यावरून भारतात परतला आणि या रणरागिणींचा त्यांचा सर्व चाहत्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात मायदेशी स्वागत केलं. आपला महिला संघ अंतिम सामना जिंकू शकला नसला तरीसुध्दा त्यांनी मारलेली ही मजल नक्कीच देशातल्या प्रत्येक मुलीला महिलेला अभिमानच वाटावा अशी आहे. ज्यांनी तो अंतिम सामना पाहिला असेल त्यांना मितालीचा चेहेरा आठवल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसाधी व्हायरल झालेला तिचा मैदानवर पुस्तक वाचताना फोटो आणि या सामन्यातल्या अटीतटीच्यावेळी तिच्या चेहेऱ्यावर दिसणारा ताण हा विरोधाभास होता खरा पण त्या तणावाला सामोरी फक्त तीचं जाऊ शकत होती.

मधल्या फळीत खेळून आपल्या नावावर विक्रम नोदंविणाऱ्या मितालीचा जन्म ३ डिसेंबर १९८२ साली जोधपूरमध्ये झाला. तिचे वडिल भारतीय वायूदलात कामाला होते तर आई गृहिणी. मिताली क्रिकेटर व्हाव हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. जे तिने प्रचंड जिद्दीने आणि मेहेनतीने पूर्ण केलं आहे. मिताली १० वर्षाची असताना तिने क्रिकेट खेळायला सुरूवात केली आणि वयाच्या १७ व्या वर्षी एकदिवसीय भारतीय महिला संघात तिनं आपला स्थान पक्क केलं. तिनं पहिल्यांदा आर्यंलंड बरोबर आपला पहिला सामना खेळला ज्यात तिनी नाबाद ११४ धावा केल्या होत्या. मितालीच्या नावावर लोगोपाठ अर्धशतकी खेळी करणारी महिला क्रिकेटर हा विक्रम तर आहेच शिवाय आत्ताचं महिला विश्वचषकात ६००० धावा करणारी महिला खेळाडू हा विक्रमही मितालीनं आपल्या नावावर केला आहे. मितालीला २००३ साली क्रिडाप्रकारातील सर्वोत्तम अर्जुन पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे तसचं, २०१५ साली तिला पद्मश्री पुरस्कारानी गौरविण्यात आलं आहे.

१८ वर्ष क्रिकेटच्या मैदानावर पुरूषांना तोडीस तोड खेळ करणारी मिताली राज ही वयाच्या २१-२२ व्या वर्षी संघात एक महत्वाची खेळाडू म्हणून ओळखली जात होती. मितालीने लहान असल्यापासून भरतनाट्यमचे शिक्षण घेतलं आहे. भरतनाट्यम ही तिची आवड आहे ज्याचा उपयोग तिला क्रिकेटमध्ये फूटवर्क साठी होतो. तर क्रिकेटमध्ये तिची आवड खेळायला लागल्यानंतर जवळजवळ एका दशकानी तयार झाली. असं ती बिधास्तपणे सांगते.

मैदानावर संयमी असलेली मिताली अनेक वेळा भारतीय क्रिकेट संघातील पुरूष खेळाडूंवर बरसलेलीही आपण पाहिली आहे. कारण, भारतातील लोक क्रिडाप्रकारतही महिला आणि पुरूष असा भेदभाव करतात. खरंतर आत्ता झालेल्या स्पर्धेत मितालीच्या संंघातील अनेक जणींनी अनेकांच्या तोंडात मारेल अशी कामगिरी केलेली आपण पाहिली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाबरोबरचा अंतिम सामना हारल्यानंतर मिताली पत्रकारांशी बोलताना हताश वाटली खरी पण, तिचा हाच संघ लवकरच नव्या उत्साहाने आणि उमेदीनी पुन्हा मैदानावर उतरेल यात शंका नाही.  

भारतीय महिला क्रिकेट संघात एक अत्यंत महत्वाची आणि गुणी खेळाडू असलेल्या मितालीने भारतातील मुलींना क्रिकेटकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

- पद्माक्षी घैसास