देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांत भाजप सरकारने लोकहिताच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनाही यशस्वीरित्या राबविल्या. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या अशाच जनहिताच्या कित्येक योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी, त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अगदी मंत्रिमंडळापासून कार्यकर्त्यांचाही तितकाच हातभार लागला. या लोकहितैषी कामांच्या पूर्ततेसाठी एक व्यक्ती अव्याहतपणे मोदींच्या पाठीमागे पूर्ण विश्वासाने उभी होती, ती म्हणजे व्यंकय्या नायडू, ज्यांची उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रालोआचे उमेदवार म्हणून परवा अधिकृत घोषणा करण्यात आली.
व्यंकय्या नायडू हे तसे खूप अनुभवी आणि मुरलेले राजकारणी. जनसंघापासूनच्या काळापासून भाजपशी त्यांची एकनिष्ठता. त्याचप्रमाणे देशातील महत्त्वाच्या सत्ताबदलांचेही ते साक्षीदार राहिले आहेत. १९७५च्या आणीबाणीच्या काळात नायडूंनी तुरुंगवासही भोगला. व्यंकय्या नायडू यांचा जन्म १ जुलै १९४९ रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात झाला. अनेक वर्षे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पुढे त्यांनी महाविद्यालयात अभाविपचे सदस्यत्व स्वीकारले. १९७२ सालच्या ‘जय आंध्र’ चळवळीतून त्यांचे नेतृत्व पुढे आले आणि त्यानंतर काही वर्षांतच (१९७८) ते राज्यस्तरीय राजकारणातही सक्रिय झाले. उदयगिरी या नेल्लोरमधील मतदारसंघातून ते १९७८ आणि १९८३ असे दोनवेळा आंध्र विधाससभेवर आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे अल्पावधीतच जनमानसाच्या मनातही त्यांनी आपले विशेष स्थान निर्माण केले. राज्यामध्ये भाजपच्या महत्त्वपूर्ण जबाबदार्या पार पाडल्यानंतर व्यंकय्या नायडू १९९८ साली कर्नाटकातून सर्वप्रथमराज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर २००४ आणि २०१० सालीही ते राज्यसभेत निवडून आले. १९९६ ते २००० अशी चार वर्षे त्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून भूमिका बजावली. व्यंकय्या नायडू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्रालयाचीही जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि २०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. तेव्हा, १९९८ ते २०१७ हा जवळ जवळ २० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे कधीही कुठल्या राजकीय पदाची अपेक्षा न करता व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या पक्षनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य दिले. व्यंकय्या नायडू हे राजकारणातल्या दोन पिढ्यांचे साक्षीदार आहेत. शिवाय, विरोधी पक्षांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे राजकारणातल्या त्यांच्या या कार्याला दाद म्हणूनच की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी व्यंकय्या नायडू यांची निवड केली. गेली तीन वर्षे त्यांनी अत्यंत शिताफीने नगरविकास खात्याची धुरा सांभाळली. त्यामुळे रालोआकडे केंद्रात असलेल्या बहुमताचा आकडा पाहता, ५ ऑगस्टला होणार्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय तसा निश्चित मानला जातोय.
व्यंकय्या नायडू हे तसे अत्यंत सौम्य स्वभावाचे... संसदेत प्रत्येकाशी त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय असे दोन्ही पातळीवर अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षांबरोबर वादावादी झाली तरी तिथून बाहेर पडताना चेहर्यावर स्मितहास्य ठेवत सर्वांशी आपुलकीने बोलणारे, वागणारे असे व्यंकय्या नायडू...
आज दळणवळणाअभावी मुख्य प्रवाहापासून काहीशी वंचित राहिलेली गावेही रस्त्यांनी शहरांना, तालुक्याच्या ठिकाणांना जोडली गेली. यामागे नितीन गडकरींबरोबरच व्यंकय्या नायडू यांचाही मोलाचा वाटा आहे. २००० साली ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी गावांना शहरांशी जोडण्याची योजना जाहीर केली होती. तसेच, मोदी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना प्रत्यक्षात आणलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेमुळे अनेक शहरांचा चेहरामोहराच बदलला. कित्येक मेट्रोसिटींचे रूपडे पालटले. हा दार्शनिक बदलांचा विचार देशातल्या भावी पिढीला रूचतोय आणि हे सर्वस्वी सरकारचे यश म्हणावे लागेल.
जीएसटी असो वा अन्य महत्त्वपूर्ण विधेयके, विरोधकांशी चर्चा करण्यासाठी मोदी सरकारतर्फे व्यंकय्या नायडू आघाडीवर होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यानही सर्वसहमतीचा उमेदवार असावा म्हणून त्यांनी सोनिया गांधींचीही भेट घेतली होती. तेव्हा नायडू हे भाजपचे संकटमोचक होते. तेव्हा, अशाच एक भाजपच्या नि:स्पृह कार्यकर्त्याची, संकटमोचकाची कमी भाजपला जाणवल्याशिवाय राहणार नाही...
- पद्माक्षी घैसास