Samuchit Enviro Tech ची उत्पादने पर्यावरणाचा विचार करून बनविलेली असतात. त्यासाठी समुचितच्या टीमचे सतत संशोधन व प्रयोग चालू असतात. या संशोधनातूनच समुचितने ट्रॅश फ्लॅशर भट्टी विकसित केली.
ही भट्टी म्हणजे एकात एक असे दोन बॉक्स आतून जोडलेले असून दोन बॉक्समध्ये हवा खेळती राहावी म्हणून जागा असते. आतल्या बॉक्स मध्ये पाला पाचोळा, भाताचा पेंढा, काडी कचरा ई. टाकला जातो. हा कचरा जाळला की कोळसा पावडर तयार होते.

ही कोळसा पावडर विविध प्रकारे वापरता येते. जसे यापासून कोळसे तयार करून शेगडीत वापरता येतात. इंधनाचा खर्च वाचतो. किंवा त्यापासून धूप कांडी करता येते किंवा organic de-oderizer म्हणून घरी वापरता येते. दुर्गंधी नाशकाची पुरचुंडी एक कोपऱ्यात ठेवली की खोलीतला घाण वास त्यातील कार्बन शोषून घेतो. टॉयलेट आणि बाथरूम्स मध्ये रासायनिक दुर्गंधीनाशक वापरण्यापेक्षा असे सेंद्रिय दुर्गंधी नाशक उत्तम!
समुचित केवळ ट्रॅश फ्लॅशर भट्टी देऊन थांबत नाही, तर कोळसा पावडरीचे विविध उत्पादने तयार करायचे प्रशिक्षण देते. आणि तयार केलेल्या उत्पादनाचे वितरण देखील करते.

डॉ. कर्वेनी सुचवलेला एक लघु उद्योग असा की – गृहसंकुलांबरोबर पालापाचोळ्याची विल्हेवाट लावण्यासाठी करार करायचा. गरजेप्रमाणे टेम्पो मधून कोळसा भट्टी घेऊन गृहसंकुलामध्ये जायचे. तिथला पाला पाचोळ्यापासून कोळसा पावडर तयार करायची. मग कचऱ्याचा volume कमी होतो, आणि टेम्पो भरून कोळसा पावडर नेता येते. अशी कोळसा पावडर वर्षभर साठवून ठेवली तरी चालते. या पासून विविध उत्पादने तयार करून विकायची. ज्या सोसायटी मधून पाला पाचोळा गोळा केला तिथे देखील वेळोवेळी ही उत्पादने विक्रीसाठी ठेवायची. सोसायटीचा कचरा उचलल्याचे देखील पैसे मिळवू शकतात. नीट नियोजन करून ही योजना अमलात आणली तर या मधून चांगले उत्पन्न आणि चार लोकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो.
पौडचे श्री. शशिकांत तोंडे यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ही संकल्पना राबवली आहे. त्याचे हे अनुभवाचे बोल ...
पौड गावाजवळ खेचरे-बेरी येथे राहणारे शशिकांत तोंडे, एक प्रयोगशील शेतकरी आहेत. यांची बागायती शेती असून ते बटाटा, कांदा, कारले, मेथी इ. भाज्यांचे पीक घेतात. थोड्या भागात सेंद्रिय शेती देखील करतात.
त्यांना इंटरनेट वरून कोळसा भट्टी बद्दल माहिती मिळाली. त्यांनी समुचितशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी केलेल्या चर्चेवरून त्यांच्या लक्षात आले की अशा कोळसा भट्टीसाठी त्यांच्याकडे भाताचा पेंढा उपलब्ध आहे. त्यांनी भाताचा पेंढा व इतर पाला पाचोळ्या पासून कोळसा पावडर तयार करायचे ठरवले.
समुचितने त्यांना कोळसा भट्टीचा वापर करण्याविषयी व त्यापासून विविध उत्पादने तयार करण्याचे २ दिवस प्रशिक्षण दिले. आता शशिकांत तोंडे कोळसा पावडर तयार करून दर रोज २ किलो धूप कांडी आणि २ किलो दुर्गंधी नाशक तयार करतात. कोळसा पावडर तयार करून साठवून ठेवता येत असल्यामुळे मागणी नुसार पुरवठा करता येतो. या कामी त्यांना त्यांच्या पत्नीचे सहकार्य लाभते. तयार केलेल्या धूप कांडी व दुर्गंधी नाशक यांचे वितरण समुचित द्वारे केले जाते. महिना १० ते १५ हजार रुपये इतके उत्पन्न याद्वारे मिळू शकते. हा व्यवसाय शेतीला पूरक आहे, असे शशिकांत तोंडे यांचे मत आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकरी शशिकांत तोंडे यांच्या कडून भट्टी विषयी माहिती घेत आहेत.
शेतीपासून गृहसंकुलांपर्यंत व बाग बागीच्यां पासून उद्यानांपर्यंत या भट्टीची माहिती जास्तीत जास्त पोहचण्याची गरज आहे. ज्यामुळे पालापाचोळ्याच्या कचऱ्याचे सोने होऊ शकते. या शिवाय कोळसा पावडरी तपासून तयार केलेल्या उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे.
पर्यावरण पूरक उत्पादने खरेदी करण्यासाठी संपर्क साधा –
Email: [email protected]
Web Site: www.samuchit.com
Phone: 020 2546 0138
- अनुजा जोगळेकर