खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी भाजपने कंबर कसली, घड्याळ सुरूच!

    03-Nov-2017
Total Views |


 

महाराष्ट्र : गेले दोन दिवस महाराष्ट्रातील रस्त्यांवर अनेक खड्डे पडल्याचा शोध महाराष्ट्रातील विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला अलीकडेच लागल्याचे दिसत आहे. किंवा त्यांनी फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याचा दिवस जाणूनबुजून घेऊन शासनाच्या कार्यशीलतेवर प्रश्नचिह्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या सेल्फी विथ खड्डे आंदोलनात सुप्रिया सुळे यांनी सुरुवात करून महाराष्ट्रातील जनतेला दैनंदिन जीवनात रोज जाणवणाऱ्या धक्क्यांनाच हात घातला. त्यामुळे अल्पावधीत शेकडो फोटो ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियावर पोस्ट होण्यास सुरुवात झाली.

 

 

 

सुप्रिया सुळे यांनी रस्तोरस्ती असलेल्या खड्ड्यांसोबत फोटो काढून ही मोहीम महाराष्ट्रातील सर्व नेटकऱ्यांपर्यंत पोहचण्यास ३१ ऑक्टोबरला सुरुवात केली. फडणवीस सरकारला तीन वर्ष यशस्वी शासन केल्याबद्दल ही विरोधकांची आगळीवेगळी भेट राज्य शासनाने स्वीकारली. या फोटो भेटीवरून सर्वांत जलद तक्रारींचे निवारण फक्त भाजप सरकार करत आहे असे वातावरण बनवण्याची संधी भाजपच्या सरकारमधील मंत्र्यांनीही सोडली नाही. या खड्डायुक्त ते खड्डामुक्त फोटोयुद्धावरून सोशल मीडियाद्वारेच जनतेच्या तक्रारींचे निवारण होऊ शकेल असा धडा महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतल्याचे दिसून येत आहे.

 

 

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि अनेक समस्याग्रस्त नागरिकांनीही भाग घेतला. यालाच उत्तर म्हणून महाराष्ट्र भाजपा या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने ट्वीटर अकाउंटवर आज (३ नोव्हेंबर, २०१७) रोजी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी एक व्हीडिओ प्रसारित केला. यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवरील माहिती प्रसिद्ध केली आहे. विरोधकांनी जरी खड्डेमय महाराष्ट्राचे चित्र समाजासमोर ठेवले असले तरी भाजपच्या सरकारने गावोगावी रस्ता विकसित करून विकास गावोगावी पोहचवल्याची माहिती देण्यात आली.

 

 

यामध्ये नेहमीच आकडेवारी घेऊन तयार असलेल्या भाजपने तीन वर्षांच्या काळात अनेक कामे केल्याचा दावा केला आहे.

 

 

या व्हीडिओतील माहिती पुढीलप्रमाणे -

  • तीन वर्षांत ५ वर्षांत ३० हजार किमी रस्ते सुधारण्यात आले. त्यातील तीन वर्षे भाजपचे सरकार होते.
  • पुढच्या दोन वर्षांच्या काळात ७३० किमी रस्त्यांच्या जोडणीचे लक्ष्य राज्य सरकारने निश्चित केले आहे.
  • ७ हजार ३०० किमी रस्त्यांचे काम प्रगती पथावर आहे.
  • १ हजार शंभर किमी रस्त्यांच्या सुधारणेचे काम पूर्ण झाले आहे.

 

 

 

तसेच सर्व तक्रारींवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदार संघापासून खड्डेमुक्त महाराष्ट्रच्या कामाला वेगाने सुरुवात केली. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे की, मी बोपदेव घाटात रस्त्यावरचे खड्डे घेऊन सेल्फी अपलोड केल्यावर ‘#Selfiewithpotholes’ सह राज्यभरातून नागरिकांनी खराब रस्त्यांचे फोटो पाठवले. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन खड्डे बुजविण्यात येतील असे सांगितले. बोपदेव घाटातले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. परंतु प्रत्यक्ष स्थिती बघता फक्त मातीचा भराव टाकून खड्डे भरण्यात येत आहे. ही तात्पुरती डागडुजी झाली. डांबर वापरून पक्की दुरुस्ती न करता माती टाकून खड्डे बुजविणे म्हणजे खोल जखमेवर वरवरची मलमपट्टी करण्यासारखे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी या बाबत लक्ष घालून खड्डे कायमस्वरूपी बुजविण्यात येतील अशी तजवीज करावी.

 

 

पण ‘घड्याळाचे गणित’ बघितल्यास चंद्रकांत पाटील यांनी काम सुरू केल्याचे ट्वीट ६ वाजून ७ मिनिटांनी केले आणि त्यावर उत्तरादाखल सुप्रिया सुळेंनी ६ वाजून ५१ मिनिटांनी अजूनही माती टाकून खड्डे बुजवण्याची तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे कोणाच्या आकड्यांचे गणित अधिक चांगले व विकास कामांनी जरी वेग घेतली तरी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील राजकारणात अनेक दशके चांगली पकड असलेल्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत अनेक विकासकामे करण्यास वाव असल्याचेच चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले. काम करण्यातून अप्रत्यक्ष टिकेचे चिमटे काढण्याची ही खास कोल्हापूरी पद्धत चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिली आहे.