येवढेच आठवते मला…

    31-Oct-2016   
Total Views |

आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला अभिवादन. बांगलादेश निर्मिती, आर्यभट्ट चे उड्डाण, पहिल्या भारतीय अंतराळ वीराचे अवकाश उड्डाण, पहिला अणुस्फोट, सिक्कीम चा भारतात समावेश वगैरे त्यांच्या कारकिर्दीतील लगेच लक्षात येणारे टप्पे. १९८४ मध्ये, त्यांची हत्त्या झाल्याची धक्कादायक बातमी कळली तेव्हा मी Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), मुंबई मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. ३१ ऑक्टोबर १९८४ च्या त्या संध्याकाळी एक कविता मी लिहिली "३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी एवढेच आठवते मला..." ह्या शीर्षकाची. माझा सहकारी आणि मित्र Vilas Bhagwat त्या कवितेच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. त्यावेळच्या दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये ती छापूनही आली होती.

येवढेच आठवते मला…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी येवढेच आठवते मला

आठवते…

मन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय

अन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा

आठवते…

वागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण

आठवते…

रेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट

आठवते…

पाहताक्षणीच चेहऱ्यावर दिसणारी

लपवता न येणारी

एक प्रचंड महत्वाकांक्षा

 

आठवते…

फिल्म डिव्हिजनच्या

कुठल्यातरी डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलेली

फुरसतीच्या क्षणी मुला-माणसांत नातवंडात

रमणारी एक लेकुरवाळी आजी

अन् दिवसातले उरलेले सोळा-अठरा तास व्यापणारा

एक असामान्य झंझावात.

 

आठवते…

एका खंडप्राय देशावर, षंढप्राय राजकारण्यांवर

एक-दीड दशक गाजवलेला

एक विलक्षण पुरुषार्थ.

नष्टासी नष्ट योजावा

हुंब्यासी हुंबा लावून द्यावा”

ह्या दासबोधोक्ती न वाचता देखिल

सही सही व्यवहारात आणणारा

एक लोकविलक्षण मुत्सद्दी.

आयुष्याच्या उत्तरार्धानंतरही

पुत्रवियोगाचा चटका आणि

सत्तेच्या राजकारणातील

लाजीरवाणा पराभव पचवून

उण्यापुऱ्या दोन वर्षांत

फिनिक्स पक्षाप्रमाणे

उभारी घेतलेले एक चैतन्य

अन् पुनर्विजयाच्या दिशेने सुटलेला

एक झंझावाती अश्वमेध.

----

कदाचित

३१ ऑक्टोबर नंतर

सवडीने…सावकाश

सारासार विचार करता…

किंवा कसोट्यांचे दगड लावता…

आठवतील कदाचित

काही वेगळ्या गोष्टी

काही अस्वस्थ करणारे उध्वस्त तपशील

उलट-सुलट विचारांची आवर्तने

कदाचित मनाला

वेगळ्याच निष्कर्षाप्रत नेतील.

तरीदेखील…

३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी

येवढेच आठवते मला

-शरदमणी मराठे

३१ ऑक्टोबर १९८४

 

शरदमणी मराठे

इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक