काँग्रेसचे बंड, मविआ थंड!

    27-Mar-2024
Total Views |
MVA split


'उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशीच आजच्या ठाकरे गटाची अवस्था. मविआत मोठा भाऊ आपणच, हे सिद्ध करण्याच्या नादात ठाकरेंनी मित्रपक्षांना विचारात न घेता, परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पायावर धोंडा मारून घेतला. सकाळी ९ वाजता ठाकरेंची घोषणा होण्याची फुरसत, तिकडे काँग्रेसच्या संजय निरूपम, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरातांनी म्यान केलेली शस्त्रे बाहेर काढली आणि ते ठाकरेंवर तुटून पडले. निरूपम यांनी तर उमेदवार बदला; अथवा महागात पडेल, असा इशारा देत बंडाचे निशाण फडकावले. मात्र, इतके दिवस ठाकरेंना कुरवाळणार्‍या नेत्यांनी तडकाफडकी ’टपली’ मारावी, असे का घडले? याचा मागोवा घेतला असता, त्याचे धागेदोरे थेट मोठ्या पवारांपर्यंत पोहोचतात. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असला, तरी गेल्या अनेक वर्षांपासून पवारांचा त्यावर डोळा आहे. जयंत पाटलांच्या चिरंजीवांसाठी ही जागा भविष्यात आपल्याकडे घेण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. अशावेळी मविआच्या माध्यमातून यंदा ठाकरेंचा उमेदवार पराभूत झाल्यास, पुढील निवडणुकीत काँग्रेसऐवजी आपला दावा प्रबळ होईल, या उद्देशाने पवारांनी मविआच्या बैठकीत ठाकरे गटाला ही जागा सोडण्याचा सल्ला दिला. कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरेंना सांगली द्यावी, असे मत जयंत पाटील यांनीही व्यक्त केले. सुरुवातीला काँग्रेसचे विदर्भातील नेते त्यास राजी झाले. परंतु, स्थानिक आमदार आणि पदाधिकार्‍यांनी तीव्र रोष व्यक्त केल्यानंतर त्यांना खडबडून जाग आली. सांगली कदापि देणार नाही, असा सूर प्रदेशाध्यक्षांसह अन्य नेत्यांनी आळवला. मात्र, त्यांचे न ऐकता, ठाकरेंनी परस्पर उमेदवाराची घोषणा केली. दक्षिण-मध्य आणि उत्तर-पश्चिम मुंबईची स्थिती याहून वेगळी नाही. अनुक्रमे वर्षा गायकवाड आणि संजय निरूपम येथून लढण्यास इच्छुक आहेत. भाजपची साथ नसल्यास, या संमिश्र लोकवस्तीच्या मतदारसंघांत ठाकरेंचा पराभव अटळ आहे, हे पक्षश्रेष्ठींना त्यांनी पटवून दिले. हायकमांडने त्याची दखल घेत, प्रदेश स्तरावर वाटाघाटी करण्याबाबत कळवले. त्यानुसार, ठाकरे गटासोबत बोलणी सुरू असताना, अचानक दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर झाल्याने, त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे ’धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी ठाकरे गटाची स्थिती!


एक डाव धोबीपछाड...


अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांना ’तेल लावलेला पहिलवान’ अशी उपमा देत, सुप्रिया सुळेंनी ’अकेला देवेंद्र क्या करेगा?’ अशा शब्दांत फडणवीसांना हिणवले होते. पण, राजकीय आखाड्यात दिग्गजांना लोळवलेल्या फडणवीसांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता, मौन बाळगणे पसंत केले. पण, डिवचल्यानंतरही शांत राहतील, ते फडणवीस कसले? त्यांनी परवा असा एक डाव टाकला की, पवारांसह महाविकास आघाडी चितपट झाली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना त्यांनी महाविकास आघाडीच्या दारातून परत आणले. त्यामुळे केवळ बारामतीच नव्हे, तर माढा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघ बळकट झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी ४ लाख, ५१ हजार मते घेऊन, सुप्रिया सुळे यांना घाम फोडला होता. जानकर भाजपच्या तिकिटावर लढले असते, तर विजय निश्चित होता, असा निष्कर्ष त्यावेळेस काढण्यात आला. यंदाच्या निवडणुकीत पवारांच्या लेकीपुढे बंधू अजित पवार यांनीच मोठे आव्हान उभे केले आहे. परिणामी, बालेकिल्ल्यात पराभवाची छाया दिसू लागल्याने, पवारांनी थेट जानकरांना सोबत घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले. खुद्द जानकर यांना माढ्यातून तिकीट, विधानसभेला राष्ट्रीय समाज पक्षाला किमान २० जागांचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जानकरांनीही महाविकास आघाडीसोबत जाण्याचे निश्चित केले होते. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्यनीतीचा अवलंब करीत जानकरांना गळाला लावले आणि पवारांना धोबीपछाड दिला. माढा लोकसभा मतदारसंघातही स्थानिक नेत्यांमधील कुरबुरींना खतपाणी घालत, पवारांनी महायुतीमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फडणवीसांनी निंबाळकर आणि मोहिते पाटलांची समजूत काढून, विजयाचा मार्ग सुकर केला. त्यात जानकर सोबत आल्यामुळे, महायुतीचे पारडे आणखी जड झाले. रामटेक आणि परभणीमधील तिढ्यावरही उतारा शोधण्यात फडणवीसांना यश मिळाले. रामटेक शिवसेनेला सोडताना, त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळवून दिला, तर परभणीत जानकरांच्या रुपाने मित्रपक्षाला बळ दिले. त्यामुळे ’अकेला देवेंद्र क्या करेगा?’ याचा अंदाज पुनश्च पवारांना आला असेलच!



-सुहास शेलार