भारतातील हे टॉप ५ 'स्कॅम' तुम्हाला माहिती आहेत का?

भारतातील विचित्र आणि थक्क करणारे स्कॅम

भारतामध्ये काही घोटाळे केवळ मोठेच नव्हते, तर त्यांची पद्धत इतकी अजब होती की त्यांनी लोकांना आणि प्रशासनालाही चक्रावून सोडले आहे. त्यातील काही सर्वात प्रसिद्ध आणि अजब घटना...

तेलगी स्टॅम्प पेपर स्कॅम (१९९०-२०००)

अब्दुल करीम तेलगी याने बनावट स्टॅम्प पेपर आणि कोर्ट फी स्टॅम्प छापण्याचे एक महाप्रचंड जाळे उभे केले होते. त्याने सरकारी छापखान्यातील जुनी मशिनरी खरेदी करून हुबेहूब बनावट स्टॅम्प तयार केले. हा घोटाळा तब्बल ३०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता. सर्वात विचित्र बाब म्हणजे, त्याने हे बनावट स्टॅम्पस् थेट सरकारी तिजोरीत आणि बँकांमध्ये अत्यंत सफाईदारपणे खपवले होते.

नटवरलाल 'ताजमहाल' विक्री स्कॅम (१९५०-१९८०)

मिथलेश कुमार श्रीवास्तव उर्फ 'नटवरलाल' हा भारताचा सर्वात प्रसिद्ध आणि विचित्र ठग होता. तो इतका हुशार होता की, त्याने अनेकदा श्रीमंत उद्योगपतींना गंडा तर घातलाच, पण त्यासोबतच चक्क ताजमहाल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन ही ऐतिहासिक स्थळ परदेशी पर्यटकांना विकल्याचे भासवून करोडो रुपयांना फसवणूक केली होती.

हर्षद मेहता स्कॅम (१९९२)

भारतीय शेअर बाजार हादरवून हर्षद मेहता स्कॅम. 'बिग बुल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहताने बँक सिस्टीममधील त्रुटींचा वापर करून सुमारे ₹५,००० कोटींपेक्षा (काही अंदाजानुसार ₹३०,००० कोटी) अधिक रकमेचा गैरव्यवहार केला होता. यामुळे शेअर बाजारात प्रचंड तेजी आली आणि नंतर बाजार कोसळला.

जामतारा सायबर स्कॅम (२०१०- आतापर्यंत)

झारखंडमधील जामतारा गाव हे ' भारताची फिशिंग राजधानी ' म्हणून ओळखले जाते. गुन्हेगार बँक अधिकारी असल्याचे भासवून लोकांना OTP, PIN किंवा कार्ड माहिती काढून फसवत. सध्या मोबाईल कॉलवरून यांनी अनेक लोकांची बँक खाती रिकामी केली.

सत्यम कॉर्पोरेट स्कॅम (२००९)

रामलिंग राजू यांनी कंपनीच्या ताळेबंदात फेरफार करून नफा, रोख शिल्लक आणि इतर आर्थिक आकडे कागदावर जास्त दाखवले. हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट आणि अकाउंटिंग फसवणूक घोटाळा होता. 'सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस' या आघाडीच्या आयटी कंपनीकडून, ताळेबंदात अस्तित्वात नसलेला नफा, बनावट बँक खाती आणि ७,५६१ बनावट पावत्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची खोटी विक्री दाखवण्यात आली होती. सत्यमचे शेअर्स गहाण ठेवून जमा केलेले पैसे रामलिंगा राजू यांनी रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवले होते.