गौताळ्याच्या अरण्यातील आदिशक्ती - पाटणादेवी

    02-Aug-2026

Patnadevi Shaktipeeth
 
 
सह्याद्रीच्या रांगांमध्ये अशी अनेक ठिकाणे दडलेली आहेत, जिथे निसर्ग आणि इतिहास यांच्यातील सीमा धूसर होते. दाट जंगलातून वाहणारे ओढे, उंच कातळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याच निसर्गाच्या कुशीत उभे असलेले हजार वर्षांचे मंदिर, अशी अनुभूती महाराष्ट्रात फार थोड्या ठिकाणी मिळते. जळगाव जिल्ह्यातील गौताळा अभयारण्याच्या हिरव्यागार अरण्यात वसलेले पाटणादेवी हे असेच एक अद्वितीय तीर्थक्षेत्र. अनेक भाविकांसाठी हे आदिशक्तीचे जागृत स्थान आहे; तर इतिहास संशोधकांसाठी हा परिसर मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा एक महत्त्वाचा पुरावा आहे. येथे येताना जाणवते की, काही देवळे गावात उभी असतात, काही शहरात; पण काही देवळे स्वतः निसर्गाच्याच हृदयात वसलेली असतात.
 
जचे पाटणादेवी हे चाळीसगावपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेले शांत तीर्थक्षेत्र आहे. परंतु, मध्ययुगात हा परिसर ‘पाटण’ किंवा ‘विज्जलवीड’ या नावाने ओळखला जाणारा समृद्ध नगरप्रदेश होता. सातमाळा पर्वतरांगांतील घाटमार्गांवर नियंत्रण असल्यामुळे व्यापार, प्रशासन आणि संस्कृतीच्या दृष्टीने या प्रदेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. यादवांच्या अधिपत्याखालील निकुंभ (छळर्ज्ञीालहर) सरदारांनी येथे अनेक मंदिरे, मठ आणि शैक्षणिक केंद्रे उभारल्याचे शिलालेखांमधून स्पष्ट होते. पाटण येथे इ.स. ११५३ आणि १२०५ मधील शिलालेख निकुंभ घराण्याचा, तसेच मंदिरनिर्मितीचा उल्लेख करतात. अशा अनेक अपरिचित राजांनी, राजघराण्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.
 
या भूमीचे महत्त्व केवळ राजकीय नव्हते, तर भारतीय गणिताच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व भास्कराचार्य यांची कर्मभूमी म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. त्यांचा नातू चांगदेव यांनी येथे गणित आणि खगोलशास्त्राच्या अध्ययनासाठी मठाची स्थापना केल्याचा उल्लेख शिलालेखांत आढळतो. ज्ञान, साधना, शक्ती आणि स्थापत्य या चारही परंपरा एका प्रदेशात एकवटलेल्या दिसतात, ही पाटणादेवी परिसराची सर्वांत मोठी वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
 
या समृद्ध सांस्कृतिक भूमीच्या केंद्रस्थानी विराजमान आहे आदिशक्ती चंडिकादेवी, ज्यांना लोकपरंपरेत प्रेमाने ‘पाटणादेवी’ म्हणून ओळखले जाते. स्थानिक श्रद्धेनुसार ही खान्देशची कुलदेवी मानली जाते. देवीभागवत परंपरेनुसार येथे सतीचा वरदहस्त पडला आणि त्यामुळे हे स्थान ‘शक्तिपीठ’ म्हणून पूजले जाते, अशी लोकमान्यता आहे. ‘चंड’ आणि ‘मुंड’ या असुरांचा संहार केल्यानंतर देवीला ‘चंडिका’ हे नाव प्राप्त झाले, अशी पुराणपरंपराही या मंदिराशी जोडली जाते. आजही नवरात्रोत्सवात हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
 
मंदिराकडे जाणारा रस्ता हा स्वतःमध्ये एक अनुभव आहे. गौताळा अभयारण्यातील दाट वृक्षराजी, डोंगरातून उतरणारे लहान प्रवाह आणि पावसाळ्यात धुयाने झाकलेली पर्वतरांग पाहताना आपण एखाद्या प्राचीन यात्रेचा भाग झाल्यासारखे वाटते. भारतीय मंदिर स्थापत्यात स्थाननिवडीला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. नदी, पर्वत, जलाशय आणि अरण्य यांच्या सान्निध्यात उभारलेली मंदिरे केवळ उपासनेची केंद्रे नव्हती; ती निसर्गाशी एकरूप झालेली आध्यात्मिक स्थाने होती. पाटणादेवी हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
 
सध्याचे मंदिर साधारण अकराव्या ते तेराव्या शतकादरम्यान विकसित झाले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. काळ्या दगडात उभारलेल्या या मंदिरात गर्भगृह, सभामंडप आणि पुढील मंडप अशी पारंपरिक योजना दिसते. मंदिरासमोर उभ्या असलेल्या दोन भव्य दीपमाळा भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाह्यभागावर आज अनेक शिल्पांची झीज झाली असली, तरी उरलेल्या नक्षीकामातून तत्कालीन शिल्पकारांचे कौशल्य स्पष्ट जाणवते. मध्ययुगात झालेल्या मुस्लीम आक्रमकांच्या दुष्टपणातून हे मंदिरदेखील सुटले नाही.
 
मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम जाणवते ते त्याचे गूढ वातावरण. विशाल दगडी खांब, शांत प्रकाश आणि गर्भगृहातील देवीची प्रभावी मूर्ती, यांमुळे संपूर्ण परिसरात एक विलक्षण आध्यात्मिक ऊर्जा अनुभवास येते. परंपरेनुसार देवीची मूर्ती सुमारे सात फूट उंच असून, ती १८ भुजांनी अलंकृत आहे. प्रत्येक आयुध देवीच्या विविध शक्तींचे प्रतीक मानले जाते. तिच्या मुखावरील करुणा आणि तेज यांचा संगम ही या मूर्तीची सर्वांत प्रभावी वैशिष्ट्ये आहेत.
 
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा व्यापक सांस्कृतिक परिसर. पाटणादेवीला भेट देताना केवळ देवीचे दर्शन घेऊन परत जाणे म्हणजे या प्रदेशाशी अन्यायच होईल. अवघ्या काही अंतरावर असलेले महेश्वर मंदिर आपल्या अप्रतिम स्तंभरचना आणि शिल्पांमुळे यादवकालीन स्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. जवळच असलेली पितळखोरा लेणी ही भारतातील सर्वांत प्राचीन बौद्ध लेणींपैकी एक असून, इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकापासूनचा इतिहास सांगतात. कान्हेरगड आणि भास्कराचार्यांशी संबंधित स्थळे या संपूर्ण प्रदेशाला एका जिवंत वारसा-परिसराचे स्वरूप देतात.
 
भारतीय वारशाकडे पाहताना आपण अनेकदा एका मंदिरापुरतेच मर्यादित राहतो. परंतु, पाटणादेवी आपल्याला वेगळा दृष्टिकोन देते. येथे शक्तिपूजा आहे, शैवपरंपरा आहे, बौद्ध वारसा आहे, गणिताचा इतिहास आहे आणि निसर्गसंवर्धनही आहे. म्हणूनच, हा परिसर केवळ धार्मिक स्थळ नसून ‘सॅक्रेड लॅण्डस्केप’ अर्थात, ‘पवित्र सांस्कृतिक भूभाग’ म्हणून समजून घेणे अधिक योग्य ठरेल. अशा ठिकाणी प्रत्येक मंदिर, प्रत्येक डोंगर आणि प्रत्येक ओढा इतिहासाच्या एका मोठ्या कथानकाचा भाग बनतो.
 
आज पर्यटनाच्या वाढत्या प्रवाहात अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे गर्दीने भरून गेली आहेत. पण, पाटणादेवी अजूनही आपल्या शांत, नैसर्गिक आणि आध्यात्मिक स्वरूपात उभी आहे. येथे येणारा प्रवासी केवळ देवीचे दर्शन घेत नाही; तो सह्याद्रीच्या कुशीत जपलेला हजार वर्षांचा इतिहास अनुभवतो. पक्ष्यांच्या आवाजात, दगडी मंदिरांच्या सावलीत आणि जंगलातून वाहणार्‍या वार्‍यात महाराष्ट्राच्या मध्ययुगीन वैभवाचे प्रतिध्वनी आजही ऐकू येतात.
 
पाटणादेवीला भेट देताना केवळ देवदर्शन करून परत जाऊ नका. मंदिराच्या प्रांगणात काही क्षण शांत उभे राहा, सभोवतालच्या डोंगरांकडे पाहा, महेश्वर मंदिरापर्यंत पायी जा, पितळखोरा लेणींचा इतिहास अनुभवा आणि भास्कराचार्यांच्या भूमीचा विचार करा. तेव्हा जाणवेल की, पाटणादेवी ही केवळ एका देवीची उपासना नाही; ती निसर्ग, इतिहास, विज्ञान, स्थापत्य आणि श्रद्धा यांचा हजार वर्षांचा अखंड संवाद आहे.




संबंधित मजकूर