डोंबिवली (SIR Voter Verification Drive) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभर विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर– स्पेशल इंटेसिव रिवीजन) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, या अभियाना अंतर्गत निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी व पडताळणी (मॅपिंग) करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. यावेळी मतदार हक्क अबाधित ठेवण्यासाठी एसआयआर अभियानाला सहकार्य करा असे आवाहन आमदार राजेश मोरे यांनी केले आहे .
या अभियानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मोरे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बीएलओ म्हणून नेमणूक केलेल्या शिक्षिका तन्वी बागवे व सचिन फाटक यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची एसआयआर प्रक्रियेअंतर्गत पडताळणी केली. त्यामध्ये त्यांची पत्नी, दोन मुली, मुलगा, बंधू तसेच परिवारातील सर्व सदस्यांचे आवश्यक अर्ज भरून संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. (SIR Voter Verification Drive)
"ज्या पद्धतीने निवडणूक विभागाचे अधिकारी आमच्या घरी येऊन एसआयआर प्रक्रियेची पूर्तता करून गेले, त्याचप्रमाणे ते आपल्या घरीही येतील. कृपया त्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन पूर्ण सहकार्य करा. ही प्रक्रिया आपल्या मतदार यादीतील नाव सुरक्षित आणि अद्ययावत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही आणि प्रत्येकाचा लोकशाहीतील मतदानाचा हक्क अधिक भक्कम होईल." (SIR Voter Verification Drive)
लोकशाहीची खरी ताकद ही प्रत्येक मतदारामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. आपला सहभाग म्हणजे आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण आणि सक्षम लोकशाहीच्या उभारणीत दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आहे असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. (SIR Voter Verification Drive)