कोवळ्या जीवाला न्याय?

    09-Jul-2026   


Rajasthan Minor Rape Case
 
खरेतर लिहितानाही हात थरथरत आहेत... राजस्थानमधल्या १३ वर्षांच्या त्या अबोध, अजाण बालिकेवर अत्याचार करणारे ते ३२ नराधम! त्यांनीही कुणा स्त्रीच्या पोटीच जन्म घेतला. पण, तरीही एका निष्पाप बालिकेच्या देहाची चाळण करताना या नराधमांच्या मनात कसलाच किंतु दाटला नाही? बालिकेने काय अत्याचार सहन केले असतील, हे जगातल्या कुठच्याच भाषेत, कधीच व्यक्त होऊ शकत नाहीत. मानवतेच्या या गुन्हेगारांना जगातील सर्वांत क्रूर यातना देऊन तडफडत मरायला ठेवायला हवे.
 
१२-१३ वर्षांचे कोमल वय. या वयात सगळ्याच मुलींच्या मनात आणि डोळ्यांत स्वप्न असतात. फुलपाखरू झालेले मन भविष्य रंगवत असते. दुसरीकडे लहानपणापासून एक मुलगी म्हणून ती तिचे शरीर जपत असते. एक व्रण पडू नये म्हणून कसोशीने प्रयत्न केलेला असतो. ‘दुधावरची साय’ की, ‘वेलीवरची कोमल कळी’ अशा या बालिका... या बालिकांना लैंगिक व्यवहार माहिती नसतात. पालकांच्या कुशीत सुरक्षितपणे जगणार्‍या या बालिकेवर जेव्हा नराधम वाईट नजर टाकतात, तेव्हा खरेतर तिला जाणीवही नसेल की, जगात असेही काही असते. राजस्थानच्या घटनेतील त्या बालिकेचेही असेच असणार. मात्र, त्या निष्पाप बालिकेवर न संपणारे लैंगिक अत्याचार करून तिचे मानसिक-लैंगिक शोषण करणार्‍या गुन्हेगारांनी कोवळी कळी क्रूरपणे चिरडली. मानवी हक्क, स्त्री-जाणिवा आणि मानवी शाश्वत मूल्यांची त्या नराधमांनी चिरफाड केली. अपरिमित अत्याचाराने ती बालिका मृत पावली. हा खून आहे. हा खून त्या गुन्हेगारांनी तर केला आहेच. पण, तिला हॉटेलमध्ये नेणारा वाहनचालक? तिला ज्या हॉटेलमध्ये नेले, तिथे बालिकेसोबत होत असलेल्या अत्याचाराबाबत कुणालाही जराही शंका आली नाही? समोर काय घडतेय, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारे लोकही गुन्हेगार आहेत. सर्वांत महत्त्वाचे या नराधमांची मानसिकता. त्यांनी क्रूर-सराईतपणे अत्याचार केला. याचाच अर्थ, त्यांच्यासाठी हे नवीन नव्हते. यापूर्वीही अशा घटना घडल्यात का? विचार करून मन सुन्न होते. या गुन्हेगारांना फाशीसारखा सोपा मृत्यू नको. यांना कठोरातली कठोर यातनामय शिक्षा व्हावी. जे काय होईल, ते कायद्याने होईल हे वाक्य आणि त्यानुसार त्यांना मिळालेली सजा त्या कोवळ्या जीवाला न्याय मिळवून देईल का?
 
बलात्कार म्हणजे खूनच!
 
प. बंगालमध्येही अशाच एका ११ वर्षांच्या बालिकेवर चारजणांनी अत्याचार केला. त्यांपैकी एक नराधम पोलीस एन्काऊंटरमध्ये मेला. घटनास्थळी तपासणी करत असताना त्याने पोलिसांची रायफल हिसकावली आणि हल्ला करणार इतक्यात पोलिसांनीच त्याला नरकात पाठवले. शाब्बास! कोर्ट-कचेर्‍या आणि ‘तारीख पे तारीख’ची झंझट त्या चार अत्याचार्‍यांपैकी एकाच्या बाबतीत तरी संपली म्हणायची! या घटनेत एका संशयिताला तर प. बंगालच्या जनतेने जागेवरच सामुदायिकरीत्या मारहाण केली आणि त्याचाही मृत्यू झाला. बलात्कार-अत्याचार याबाबत आता खरेच कायदा आणि तरतुदी बदलण्याची वेळ आली आहे.
 
‘पोक्सो’ कायदा कडक आहे. पण, तरीही दुष्ट अत्याचार्‍यांना जरब बसत नाही, भीती वाटत नाही. शासन कुणाचेही असो, घाणेरड्या राक्षसी प्रवृत्तीचे बलात्कारी कधीच बदलत नाहीत. संवेदनशीलता, माणुसकी, दया-माया वगैरे वगैरे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नसतात. हे गुन्हेगार कधी पुराव्याअभावी सुटतात, तर कधी सजा भोगून सुटतात. सजा भोगली म्हणून त्यांच्या मनातली घाण संपलेली नसते. कधीकधी असेही होते की, खोट्या गुन्ह्यात एखाद्याला अडकवले जाते. तो विषय वेगळा. पण, वारंवार बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्यांचा कायद्याने वेगळा विचार करायलाच हवा. ‘पोक्सो’ कायद्यानुसार, गुन्हेगारांना जन्मठेप किंवा फाशीची सजा होते. त्याची ती तडफड, वेदना (जी त्याने केलेल्या गुन्ह्याइतकी मोठी नसते) समाजासमोर ‘लाईव्ह’ यायला हवी, तरच होऊ घातलेल्या गुन्हेगाराला समजेल की, आपण गुन्हा केल्यावर आपल्यासोबत काय होऊ शकेल. अर्थात, आपल्या कायद्यात हे शक्य नाही, असेच उत्तर येणार. पण, कायदा समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे. ‘इंडियन पीनल कोड’चे रूपांतरण ‘भारतीय न्याय संहिते’मध्ये झाले आहे. या ‘भारतीय न्याय संहिते’मध्ये आणखी एक नवा अध्याय सुरू व्हावा, ज्यात बलात्कार हा गुन्हा ‘खून’ म्हणूनच अधोरेखित केला जावा. सबळ पुरावा असलेल्या बलात्कारकाडांतील गुन्हेगारांना खुनीच घोषित केले जावे. कारण, बलात्काराच्या गुन्ह्यात केवळ पीडितेवर शारीरिक अत्याचार होत नाहीत; तर पीडितेच्या भावनांचा, स्वप्नांचा खून झालेला असतो.
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर