प्रांबानन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारताचा ऐतिहासिक पुढाकार; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते मंदिर संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन
मुंबई (Prambanan Temple Restoration Project) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ प्रांबानन मंदिर संकुलाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. हा प्रकल्प भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात असून, भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाअंतर्गत सुमारे एक हजार वर्षे जुन्या या हिंदू मंदिर संकुलाच्या पुनर्स्थापनेसाठी भारताने दिलेल्या वचनबद्धतेचा तो भाग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवव्या शतकात उभारण्यात आलेले प्रांबानन मंदिर संकुल हे इंडोनेशियातील त्रिमूर्ती-भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित असलेले सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल आहे. हे मंदिर भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सामायिक सांस्कृतिक आणि सभ्यतागत वारशाचे चिरंतन प्रतीक मानले जाते. २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेनुसार, प्रांबानन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी भारताची मदत घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली होती. त्याच अनुषंगाने हा संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. (Prambanan Temple Restoration Project)
या उद्घाटनाच्या एक दिवस आधी भारत आणि इंडोनेशिया यांनी भारताच्या सहकार्याने जीर्णोद्धार कार्य सुरू करण्यासाठी 'लेटर ऑफ इंटेंट' ची देवाणघेवाण केली होती. या उपक्रमाचा उद्देश आग्नेय आशियातील सर्वात महत्त्वाच्या हिंदू वारसा स्थळांपैकी एका स्थळाचे जतन करणे हा आहे. आग्नेय आशियातील अनेक जागतिक वारसा स्थळांच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारामध्ये भारताने यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने इंडोनेशियातील बोरोबुदूर मंदिर संकुलाचे विस्तृत दस्तऐवजीकरणही यापूर्वी केले आहे. (Prambanan Temple Restoration Project)
या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रांबानन मंदिरात जाऊन भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा या त्रिमूर्तींचे दर्शन घेत पूजन केले. त्यांनी मंदिर परिसरातील अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. मंदिरात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या आयुष्यभर त्यांना भगवान शिवांशी एक विशेष आध्यात्मिक नाते असल्याची अनुभूती झाली आहे. ते म्हणाले की, त्यांचा जन्म गुजरातमधील वडनगर येथे झाला, जिथे हाटकेश्वर महादेव मंदिर आहे. गुजरातमध्येच पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ असून त्याच्या विकासाची जबाबदारी सांभाळण्याचे भाग्य त्यांना लाभले. तसेच, ते काशी विश्वनाथ महादेवांचे स्थान असलेल्या वाराणसीचे प्रतिनिधित्व करतात आणि केदारनाथ तसेच उज्जैन महाकाल मंदिरांच्या पुनर्विकासात योगदान देण्याची संधीही त्यांना मिळाली. (Prambanan Temple Restoration Project)
भारत-इंडोनेशियाला जोडणारा सांस्कृतिक वारसा
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी प्रांबानन मंदिराचा वैभवशाली वारसा शतकानुशतके जतन केल्याबद्दल इंडोनेशियातील जनतेचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक नाते आजही दोन्ही देशांतील जनतेला अधिक जवळ आणत आहे. ते म्हणाले की, इंडोनेशियातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांना नेहमीच समान संस्कृतीचा सुगंध जाणवतो आणि तोच सांस्कृतिक वारसा भारतातही खोलवर रुजलेला आहे. हा समान वारसा भौगोलिक सीमा ओलांडून दोन्ही देशांतील जनतेला जोडतो. सुमारे १,२०० वर्षांपासून प्रांबानन मंदिर संकुलाचे श्रद्धेने संरक्षण आणि जतन केल्याबद्दल त्यांनी इंडोनेशियातील जनतेचे तसेच पूर्वीच्या शासकांचेही विशेष आभार मानले. (Prambanan Temple Restoration Project)
अधिक भारतीय पर्यटक येण्याची अपेक्षा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मंदिरात महामृत्युंजय मंत्र आणि "ॐ नमः शिवाय" या मंत्रांचा निनाद ऐकून ते अत्यंत भावूक झाले. युनेस्को जागतिक वारसा स्थळावरील संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू झाल्यानंतर आगामी काळात अधिकाधिक भारतीय पर्यटक प्रांबानन मंदिराला भेट देतील, असा त्यांना विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. प्रांबानन मंदिर हे इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल असून ते देशातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. भारत-इंडोनेशियाचा हा संयुक्त संवर्धन प्रकल्प दोन्ही देशांतील दीर्घकालीन सांस्कृतिक आणि सभ्यतागत संबंध आणखी दृढ करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. (Prambanan Temple Restoration Project)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक