मुंबई (अक्षय मांडवकर) - बोर व्याघ्र प्रकल्पात गव्यांचे स्थानांतरण करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे (indian gaur translocation). यापुढे शहरी भागात भरकटून येणारे किंवा संरक्षित वनक्षेत्राबाहेर पडल्यामुळे मानवी वस्तीजवळ आलेल्या गव्यांना रेस्क्यू करुन अथवा विशेष प्रकल्पाअंतर्गत कोण्या एका संरक्षित वनक्षेत्रामधून बोरमध्ये गव्यांचे स्थानांतरण करण्याचा विचार वन विभाग करत आहे. महाराष्ट्रात मात्र आतापर्यंत गव्यांचे स्थानांतरण प्रामुख्याने बचाव आणि पुनर्वसनापुरतेच मर्यादित राहिले आहे (indian gaur translocation). आता बोरमधील प्रस्तावित असणाऱ्या या विशेष प्रकल्पामुळे या प्रक्रियेला अधिक संघटित आणि दीर्घकालीन स्वरूप मिळण्याची शक्यता आहे (indian gaur translocation). मात्र, गव्यांचे स्थानांतरण वैज्ञानिक पद्धतीने पार पडणेही गरजेचे आहे. (indian gaur translocation)
सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर परिसरात जलवाहिनीच्या दोन पाइपच्या मधोमध अडकलेल्या प्रौढ नर गव्याचा वन विभागाने रेस्क्यू बचाव पथकांच्या मदतीने यशस्वी बचाव केला. आरोग्य तपासणीनंतर हा गवा वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे सोडण्यात आला. या कारवाईनंतर अशाच प्रकारे बचाव करण्यात आलेल्या गव्यांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प कायमस्वरूपी पुनर्वसन केंद्र म्हणून विकसित करण्याची संकल्पना पुढे आली आहे. गवे नसलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात गव्यांचे स्थानांतरण करण्यासाठी वन विभागाचा वन्यजीव विभाग यापुढे प्रयत्नशील असणार आहे. वर्धा जिल्ह्यातील हा व्याघ्र प्रकल्प २०१४ मध्ये देशाचा ४७वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. सुमारे १३८ चौ. किमी. कोअर आणि ६७८ चौ. किमी. बफर क्षेत्र असलेल्या या प्रकल्पात सद्यपरिस्थितीत साधारण ११ वाघ आहेत. मात्र, गव्यांचा अधिवास याठिकाणी नाही. चार ते पाच वर्षांपूर्वी असलेली गव्याची एक जोडी देखील आता दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे वाघांसाठीही गवा हे महत्त्वाचे नैसर्गिक भक्ष्य असल्याने याठिकाणी गवे स्थानांतरित करण्याच्या प्रयत्नात वन्यजीव विभाग आहे.
भारतात गवा स्थानांतरणाचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारचे मोजकचे उपक्रम झाले आहेत. २०११ ते २०१२ दरम्यान मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातून ५० गव्यांचे बांधवगड व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले होते. भारतातील हा पहिला मोठ्या प्रमाणावरचा वैज्ञानिक गवा पुनर्स्थापना प्रकल्प मानला जातो. बांधवगडमध्ये आता गव्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. मध्य प्रदेशात संजय दुबरी व्याघ्र प्रकल्पासाठीही गव्यांच्या पुनर्स्थापनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. तसेच बांधवगडमध्ये जनुकीय वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी सातपुडा व्याघ्र प्रकल्पातूनही गव्यांचे स्थानांतरण करण्यात आले. महाराष्ट्रात मात्र आतापर्यंत गव्यांचे स्थानांतरण प्रामुख्याने बचाव आणि पुनर्वसनापुरतेच मर्यादित राहिले आहे. आता प्रस्तावित विशेष प्रकल्पामुळे या प्रक्रियेला अधिक संघटित आणि दीर्घकालीन स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
गव्यांच्या स्थानांतरणासाठी सकारात्मक सद्यपरिस्थितीत बोर व्याघ्र प्रकल्पात गव्यांचा अधिवास नाही. मात्र, याठिकाणी वाघांचा अधिवास आहे. अशा परिस्थितीत या व्याघ्र प्रकल्पात गव्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्यातील इतरत्र भागामधून गव्यांचे स्थानांतरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. - श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)