ई-वाहन विक्रीला गती!

    09-Jul-2026   


India EV Sales
 
प. आशियातील संघर्ष आणि त्यामुळे होणारी इंधन दरवाढ अशी परिस्थिती असतानाही, जून महिन्यात वाहन खरेदीकडे भारतीयांचा कल दिसून आला. पहिल्यांदाच पर्यायी इंधन किंवा ‘हायब्रिड मॉडेल’ असलेल्या वाहनांचीही मागणी ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली. त्याविषयीचे हे आकलन...
 
देशातील खासगी वाहन क्षेत्राची स्थिती सध्या नाजूक असावी, असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तविण्यात येत होता. पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष, डॉलरची मजबुती, कच्च्या तेलाचे वाढते भाव याचा एकत्रित परिणाम हा अर्थव्यवस्थेवर दिसू लागेल, अशी चिंताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली. त्यामुळे साहजिकच वाहन खरेदीत घट होईल, पेट्रोल-डिझेलचे दर वाढू लागल्याने वाहतूक खर्चही वाढेल, अशी स्थिती होती. मात्र, जून महिन्यात वाहनखरेदीसंबंधी जाहीर झालेली आकडेवारी पाहता, भारतीय ग्राहक आता पारंपरिक इंधनाच्या पर्यायाच्या शोधात असल्याचेही स्पष्ट होते.
 
भारतातील प्रवासी वाहनांसाठी जून २०२६ हा महत्त्वाचा टप्पा ठरला. ई-वाहने किंवा पर्यायी इंधनाची सुविधा असलेल्या वाहनांची मागणी आता वाढू लागली आहे. ऐन दिवाळीला अवघे काही महिने शिल्लक असताना, अशाप्रकारचा अहवाल हा मोठ्या बदलांची चाहूल देणाराच म्हणावा लागेल. ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन’ने (एफएडीए) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ई-वाहनांच्या किरकोळ विक्रीत एकूण १२ टक्के वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. ई-वाहन क्षेत्रातील दुचाकींची वाढती मागणी लक्षात घेता, प्रथमच ही आकडेवारी १०.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. अर्थात, ई-वाहन क्षेत्रावर ग्राहकांनी आता विश्वास ठेवण्यास सुरुवात केल्याचे हे संकेत म्हणावे लागतील.
 
एकूणच विचार करता, जून २०२६ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत ई-वाहन क्षेत्रात ६३ टक्क्यांनी वाढ दिसून आली. ‘एफएडीए’तर्फे जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वांत मोठी आकडेवारी मानली जाते. ई-वाहन ग्राहकोपयोगी आणि औद्योगिक वापरावरही ग्राहकांनी आता भर दिल्याचे दिसून येते; ज्यात अनुक्रमे ३१ हजार, ८२३ आणि ३ हजार, २१४ इतकी विक्री नोंदविण्यात आली आहे. हा आजवरचा सर्वांत मोठा आकडा मानला जात आहे.
 
‘टीव्हीएस’ मोटार कंपनीने जून महिन्यात एकूण ४७ हजार, ६४ ई-दुचाकी वाहनांची विक्री केली. कंपनीने आपला दबदबा बाजारात कायम ठेवल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत त्यांची या क्षेत्रात ७६.०५ टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. यानंतर ‘बजाज ऑटो’चा क्रमांक लागतो; ज्यात ४३ हजार, ३०६ वाहनांची विक्री करण्यात आली. त्यांच्या विक्रीत ही वाढ ८० टक्क्यांहून जास्त आहे. ‘एथर एनर्जी’ने आपली किरकोळ विक्री दुप्पट केली. त्यांनी एकूण ३१ हजार, २३० वाहनांची विक्री केल्याची आकडेवारी आहे, तर, सर्वांत जास्त वेगाने वाढणारी कंपनी म्हणून ‘हिरो मोटोकॉर्प’ने हा किताब मिळवला आहे. ई-वाहनांच्या विक्रीत एकूण १७५ टक्क्यांच्या वाढीसह या कंपनीने २१ हजार, ८२० इतकी विक्री केली. ‘ओला ईव्ही’ने २१.९७ टक्क्यांच्या घसरणीसह १६ हजार, १५० वाहनांची विक्री नोंदवली.
 
तसेच ‘सीएनजी’, ‘ईव्ही’ आणि ‘हायब्रिड’ वाहनांच्या एकूण विक्रीची नोंद ४० टक्क्यांवर पोहोचली आहे. पर्यायी इंधन म्हणून अद्याप ‘सीएनजी’ने विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. एकूण ‘सीएनजी’ वाहनांची विक्री २५ टक्के इतकी झाली आहे. त्यांपैकी ‘हायब्रिड’ वाहने आठ टक्के; तर ई-वाहने आठ टक्के अशी विक्री नोंदविण्यात आली. जून महिन्यातील ही वाढ सर्वाधिक मानली गेली; ज्यात एकूण वाहनांची विक्री चार लाख, दहा हजार, ८५३ इतकी झाली. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा २८ टक्क्यांहून अधिक आहे. ग्राहकांना कंपन्यांकडून मिळणारी सेवा, वाहनांचा सुधारलेला पुरवठा यासाठी कारणीभूत ठरला आहे. वाहनांच्या किमती जरी वाढल्या असतील, तरीही ग्राहकांच्या मागणीवर फारसा परिणाम दिसल्याचे जाणवले नाही.
 
देशभरात विस्तारणारे रस्त्यांचे जाळे हे याला प्रमुख एक कारण मानले जाऊ शकते. या विक्रीच्या आकडेवारीचा विचार केल्यास, ग्रामीण भागातील वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ दिसून आली. गतवर्षीच्या तुलनेत ३५.१ टक्के वाढ ही ग्रामीण भागात नोंदवण्यात आली, तर शहरी भागात गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २४.७ टक्के इतकी होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारांनी आपल्या ई-वाहनांच्या अनुदानात कपात करण्यास सुरुवात केली आहे. अनुदानात घट झाल्यानंतरही ई-वाहनांची वाढती मागणी हा बाजारासाठी चांगला प्रतिसाद मानला जात आहे.
 
ग्राहकांच्या कलात आता होत असलेल्या बदलाची यानिमित्ताने चर्चा होऊ लागली आहे. ग्राहक वाहनांच्या किमतीचा विचार करण्याऐवजी आता दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू लागले आहे. पेट्रोल-डिझेलची वाढती मागणी, नेहमी अस्थिर राहणार्‍या इंधनाच्या किमती, देशभरात विस्तारणारे पर्यायी इंधनाचे जाळे, कार्बन उत्सर्जनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी, ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन्स’ची वाढती मागणी आणि त्याअनुषंगाने होत असलेली सुधारणा, याचा एकत्रित परिणाम यात दिसून आला. इराण-अमेरिका युद्धानंतर जलवाहतुकीला बसलेला फटका आणि विमा कंपन्यांनी वाढवलेले दर, यामुळे वाहनांच्या किमतींत वाढ दिसून आली. तरीही, ग्राहकांच्या मागणीत फरक जाणवलेला दिसत नाही.
 
ऑटोमोबाईल कंपन्यांच्या मते, ग्राहकांच्या याच बदलत्या सवयींचा विचार भविष्यात होणार्‍या उत्पादनानिमित्त केला जाऊ शकतो. ग्राहकांच्या मागणीनुसार वाहन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडू शकतात. येत्या काही महिन्यांत सणासुदीनिमित्त होणार्‍या वाहन खरेदीवर या बदलाचा सकारात्मक परिणाम जाणवू शकतो, अशी शक्यताही कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
 
यात आलिशान वाहनविक्रेत्या कंपन्यांनीही हार मानलेली नाही. ‘मर्सिडीझ बेन्झ’ या वाहन कंपनीला भारताकडून यावर्षी खूप अपेक्षा आहेत. ग्राहकांची मागणी ही समाधानकारकच आहे. त्यामुळे वाहनांच्या या मागणीचा चलनातील चढ-उतारांमुळे होणारा तोटा मोडीत निघू शकतो, अशी शाश्वती कंपनीला आहे. या कंपनीने जानेवारी ते जून २०२६ पर्यंत एकूण ९ हजार, ७६८ वाहनांची विक्री केली. गतवर्षीच्या तुलनेत यात नऊ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. दुसर्‍या तिमाहीत एकूण ४ हजार, ६३७ इतकी विक्री नोंदविण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी झेप घेत, यंदाच्या तिमाहीतील ही सर्वांत मोठी कामगिरी मानली जात आहे. देशभरात विविधमार्गे विस्तारणार्‍या बाजारपेठांसाठी ही आकडेवारी सकारात्मक अशीच!




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर