वारकऱ्यांच्या सेवेसाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय! पंढरपुरात उभारणार विठ्ठल-रुक्मिणी भवन

    09-Jul-2026   
 
Goa Vitthal-Rukmini Bhavan 
 
मुंबई (Goa Vitthal-Rukmini Bhavan) : पंढरपूर येथे गोव्याच्या वारकऱ्यांसाठी स्वतंत्र 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्यात येणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, येत्या आषाढी एकादशीपूर्वी बांधकाम पूर्ण करून ते वारकरी समुदायाला समर्पित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (Goa Vitthal-Rukmini Bhavan)
 
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या गोव्यातील वारकऱ्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक भावनांचा नेहमीच आदर केला असून, यापुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. दरवर्षी गोव्यातून हजारो वारकरी आणि भाविक भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी तसेच आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी पंढरपूरला जातात. अनेक वर्षांपासून पंढरपुरात गोव्याच्या वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी निवास आणि विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती, जेणेकरून दीर्घ प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. (Goa Vitthal-Rukmini Bhavan)
ही गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या वर्षी 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्याची घोषणा केली होती. आता त्या घोषणेला मूर्त स्वरूप देत या भवनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या भवनामुळे गोव्याच्या वारकऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज, स्वच्छ आणि सन्मानजनक निवासाची सुविधा मिळेल, ज्यामुळे त्यांची तीर्थयात्रा अधिक सुखकर आणि सोयीची होईल. (Goa Vitthal-Rukmini Bhavan)
 
 
 
पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत
 
राज्य सरकारने गोव्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांसाठी प्रवासासंदर्भात आर्थिक सहाय्य सुरू केले आहे. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत ३६ नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या संख्येनुसार १ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य थेट संबंधित नोंदणीकृत दिंड्यांना दिले जाणार आहे. या मदतीचा उद्देश वारकऱ्यांचा प्रवासखर्च कमी करणे आणि त्यांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर यात्रा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत किमान ४० वारकरी असलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना पंढरपूरहून गोव्याकडे परतीच्या बसप्रवासासाठीही आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय प्रवासादरम्यान आवश्यक इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. सरकारचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे नसून, वारकरी समुदायाची धार्मिक यात्रा अधिक नियोजनबद्ध, सुरक्षित आणि सन्मानजनक बनविणे हा असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. (Goa Vitthal-Rukmini Bhavan)

उपक्रमांतर्गत तीन हजार ५०० वारकऱ्यांची नोंदणी
 
या उपक्रमांतर्गत सुमारे तीन हजार ५०० वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त वारीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व नोंदणीकृत वारकऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पारंपरिक वारकरी वेशभूषा, आवश्यक औषधांनी सुसज्ज वैद्यकीय किट आणि वारी मार्गावरील निश्चित ठिकाणी वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे वारकऱ्यांची यात्रा अधिक सुरक्षित, आरोग्यदायी, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारणी आणि वारकरी दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यासारखे उपक्रम गोव्यातील वारकरी समुदायासाठी दीर्घकालीन लाभदायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Goa Vitthal-Rukmini Bhavan)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर