गायत्री मंत्रावरील आक्षेप नामंजूर; छत्तीसगड उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

    09-Jul-2026   
 
 
 
Chhattisgarh HC Gayatri Mantra
 
मुंबई (Chhattisgarh HC Gayatri Mantra) : छत्तीसगड उच्च न्यायालयाने सरकारी शाळांमधील सकाळच्या प्रार्थना सत्रात गायत्री मंत्र आणि इतर प्रार्थनांचा समावेश करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत राज्य सरकारला सरकारी शाळांमध्ये हिंदू प्रार्थना सक्तीने म्हणण्यास प्रतिबंध करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात राज्य सरकारचा आदेश रद्द करण्याची आवश्यकता नाही. संविधान नैतिक शिक्षण देण्यास प्रतिबंध करत नाही, मात्र त्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट धर्माच्या तत्त्वांचा प्रचार होता कामा नये, असे न्यायालयाने नमूद केले. (Chhattisgarh HC Gayatri Mantra)
 
राज्याच्या शिक्षण विभागाने सरकारी शाळांमधील सकाळच्या प्रार्थना सभेत गायत्री मंत्रासह काही अन्य प्रार्थनांचा समावेश करण्याचे निर्देश दिल्यानंतर हा वाद निर्माण झाला. विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका करत, शिक्षणाचे "भगवाकरण" करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. दि. १२ जून रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत हा आदेश भारतीय संविधानातील कलम १४, २१, २५, २८(१), २९ आणि ३० चे उल्लंघन करत असल्याचा दावा करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, सरकारी शाळांमध्ये एका विशिष्ट धर्माशी संबंधित प्रार्थना अनिवार्य केल्यास अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना अस्वस्थता वाटू शकते किंवा त्यांच्यावर मानसिक दबाव येऊ शकतो. (Chhattisgarh HC Gayatri Mantra)
 
 
 
राज्य सरकारतर्फे न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत ही याचिका राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचा दावा केला. सरकारने न्यायालयाला सांगितले की, या आदेशाचा उद्देश धार्मिक शिक्षण देणे किंवा कोणावरही धर्म लादणे नसून भारतीय संस्कृती आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करणे हा आहे. हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० शी सुसंगत असल्याचे सरकारने स्पष्ट केले. (Chhattisgarh HC Gayatri Mantra)
 
 
 
सरकारने पुढे स्पष्ट केले की, आदेशात वापरण्यात आलेले 'अनिवार्य' आणि 'सुनिश्चित करा' हे शब्द केवळ शाळांमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वापरण्यात आले आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला या प्रार्थना म्हणायच्या नसतील, तर त्याच्याविरोधात कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची किंवा कारवाईची तरतूद नाही. गायत्री मंत्र ज्ञान, बुद्धिमत्ता आणि सकारात्मक विचारांचा संदेश देतो. त्याचा उद्देश कोणत्याही धर्माचा प्रचार करणे नसून विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार, एकाग्रता आणि नैतिक मूल्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. (Chhattisgarh HC Gayatri Mantra)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर