॥ गीतासार भाग २१ ॥

    09-Jul-2026

Bhagavad Gita Self Upliftment
 
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्|
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः॥अ.६,श्लो.५॥
मानव आपल्या उन्नत सत्कर्मांद्वारेच आपला उद्धार करू शकतो, कोणत्याही प्रेषिताद्वारे नव्हे. प्रेषित किंवा गुरू मार्गदर्शन करतील, उद्धार नव्हे. यासाठीच गोस्वामी तुलसीदास म्हणतात, "नर करनी करे तो नर का नारायण होत,” वैदिक परंपरेची हीच शास्त्रीयता आणि विशालता आहे की, जी मानवाला परमेश्वर अवस्थेप्रत पोहोचविण्याचा मार्ग खुला करते. मानवास पापी अथवा अपूर्ण मानणे, हे अशास्त्रीय आणि अधार्मिकच आहे.
 
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्|
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥अ.१८,श्लो.४७॥
 
चांगले आचरण केलेल्या दुसर्‍याच्या धर्मापेक्षा कमी गुणाचा स्वधर्म श्रेष्ठ आहे. कारण, स्वभावाने नियत केलेली स्वधर्मरूप कर्म करणारी व्यक्ती, पापास पात्र होत नाही. वानर मानवासारखा व्यवहार व काही कर्मे करीलही; परंतु मानवासारखे ते बोलू शकणार नाही. कारण, त्या प्रकारे उत्तम वाणी आपल्या मुखाद्वारे काढण्यासाठी त्याच्या तोंडातील दात, जीभ, ओठ यांची रचना मानवाच्या तोंडासारखी असत नाही. त्या वानरास पूर्ण मानव बनण्यासाठी आपल्या नियत वानर शरीराचा त्याग करून, उन्नत मानव शरीर धारण करावे लागेल. मग ते उत्क्रांतीद्वारे अथवा पुनर्जन्माद्वारेच मानव बनू शकेल. प्राकृतिक अवस्था बदलण्याचीसुद्धा एक मर्यादा असते, ज्याचे मानवालाही उल्लंघन करता येत नाही. स्वभाव किंवा प्राकृतिक अवस्थेला घेऊनच कर्म करून उन्नत झाले पाहिजे.
 
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज|
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः॥अ.१८,श्लो.६६॥
 
"सर्व धर्मांचा अर्थात् सर्व प्राप्त कर्मांचा त्याग करून तू केवळ एक सर्वशक्तिमान, सर्वाधार परमेश्वरास शरण जा. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू शोक करू नकोस.”
 
येथे हे ध्यानात घेतले पाहिजे की, ‘अहं’ म्हणजे परमावस्था असून, कोणी श्रीकृष्ण नावाचा प्रेषित नव्हे की ज्याने आत्मोद्धाराचा ठेका घेतला आहे. त्या परमावस्थेमध्ये स्वतःला विलीन केल्याने सर्व पापांचे हरण होऊन, म्हणजेच असंस्कृत संस्काराची कर्म नष्ट होऊन मानव आपोआप उन्नत अवस्था प्राप्त करू शकतो. यालाच वेदव्यास ‘श्रीकृष्ण’ अर्थात ‘परमेश्वर’ म्हणतात. अन्य सांप्रदायिक श्रद्धांमध्ये मानवास जन्मतः पापी मानले आहे. यातून मुक्त होण्यासाठी, त्याला कोण्या एका प्रेषिताची वाट पहावी लागेल. परंतु, ही कल्पना आणि श्रद्धा अशास्त्रीय आणि प्रत्यक्ष परमेश्वरावर श्रद्धा न ठेवणारी आहे. उन्नत अवस्था प्राप्त करताना आपले जे संस्कार अडचणी उत्पन्न करतात, त्यांना ‘पाप’ म्हणू शकतो. परंतु, त्या संस्काररूपी अडचणी प्रयत्नाने दूर करून मानव उन्नत होऊ शकतो, जसे आपण परिश्रमाने सायकल शिकतो.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥अ.४,श्लो.७॥
 
हे भारता! जेव्हा जेव्हा धर्मास हानी पोहोचते आणि अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा, मी स्वतःस प्रकट करून, समाजाची सुयोग्य धारणा करतो. येथे ‘मी’ म्हणजे कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसून, ती परमावस्था आहे, जेथून सार्‍या विश्वाची उत्पत्ती झाली आहे. प्रकृतीच्या एका अवस्थेमध्ये विघटन झाल्यावर, आजूबाजूचे प्राकृतिक घटक ती विकृत अवस्था नष्ट करण्याचा आपोआप प्रयत्न करतात. कोणत्याही भूप्रदेशावर सूर्याची प्रखर किरणे पडल्यावर, तेथील हवा विरळ होऊन आकाशात उंच जाते. तेथील हवेची पोकळी भरून काढण्यासाठी, आजूबाजूची हवा त्या स्थानी वाहात येऊन वातावरणाची घनता कायम राखली जाते. बरीच आजूबाजूची हवा सागरावरून आल्यामुळे, त्या हवेत बाष्पता असते व त्यामुळे त्या तप्त भूखंडावर पावसाचा शिडकावा होऊन तेथील हवेतील उष्णता कमी होते. त्यानंतर वर्षावामुळे भूमी सुजला-सुफला होते. प्राकृतिक संतुलन प्रक्रियेद्वारेच हे सर्व होते. कोणत्याही ईश्वरास तेथे आणण्याची आवश्यकता नाही.
 
शरीरावर कोठेही एक फोड उठला, तर त्या फोडातील अशुद्ध रक्त व पू तेथून दूर करण्यासाठी आजूबाजूचे रक्त त्या फोडाच्या चारही बाजूला जमते. त्यानंतर असे रक्त फोडात जोरात वाहून, तेथील अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु, बर्‍याच वेळा या प्राकृतिक अवस्थेवर अवलंबून राहून चालत नाही. त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी कोण्या एका जाणकार वैद्याकडून औषधोपचार करवून घ्यावे लागतात, अथवा डॉक्टरांकडून शल्यचिकित्सा करवून घ्यावी लागते. ते करण्यासाठी त्या वैद्य अथवा डॉक्टरला आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते. रोगी बरा झाल्यावर त्या वैद्यास अथवा डॉक्टरास ईश्वर मानतो. काय हे सर्व काम ईश्वर करतो? की प्रकृती अथवा उच्च बुद्धी करते? भावूक जन त्या संतुलित प्राकृतिक प्रक्रियेला ईश्वराचा अवतार मानून, स्वतःलाच त्या जीवनपटावरून दूर ठेवून निष्क्रिय बनू पाहतात. याच निष्क्रिय भावुकतेमुळे, भारतामध्ये परकीयांचे राज्य राहिले.
 
आजसुद्धा हीच भावना भारतीयांमध्ये प्रबळ आहे. "God helps those who help themselves' ही इंग्रजी म्हण सत्य आहे. अशा तर्‍हेने असंस्कृत संस्कारांची कर्मे नष्ट करून, मानव समाजास उन्नतीकडे नेण्याचे महत्कार्य वेळोवेळी समाजातील काही व्यक्तींकडून घडत असते.
 
समाजधारणेसाठी असे महात्मे उन्नत कर्मे अविरत करतात. त्यांचे हे कार्य परमेश्वरीच असल्यामुळे, अशांच्या जीवनाला गीता ‘सम्भवामि युगे युगे’ असे म्हणते. आपण प्रत्यक्ष परमेश्वर अवस्था मानतो, तसला परमेश्वर जन्म घेत नसतो. परमेश्वर तर सर्वत्रच भरला आहे. मग पुन्हा नव्याने जन्म घेण्याची परमेश्वराला काय आवश्यकता? तो आपल्या प्रकृतीद्वारे क्षणाक्षणाला जन्म घेऊन, प्रकृतीचे बरे-वाईट रहाटगाडगे चालू ठेवतो. त्याला आणखी नव्याने जन्म घेण्याची आवश्यकताच काय? सद्वर्तनी लोकांना समाजातील वाईट लोकांकडून सदा त्रास होतो. तसा त्रास सहन करून, ते महापुरुष आपले जीवनचक्र त्याच ध्येयाने चालू ठेवतात. पण तसे करताना त्यांना आपल्या उराशी एक भावना सदा कवटाळावी लागते आणि ती म्हणजे, परमेश्वर माझ्या पाठीशी उभा आहे! असल्या महापुरुषांचे त्यागमय आदर्श जीवन म्हणजेच परमेश्वराचा जन्म होय. म्हणून गीता

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत|
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
 
असे अभिवचन देते. असले आदर्श महापुरुष झाले आहेत आणि होतील.
 
 
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७




संबंधित मजकूर