सह्याद्रीचा समर्पित ‘निसर्गदूत’

    09-Jul-2026   

Akash Tanaji Raut
 
वनस्पतिशास्त्राचा अभ्यास, वन्यजीव बचावातील अनुभव आणि लोकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे विज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी काम करणार्‍या आकाश तानाजी राऊत यांच्याविषयी...
 
वनस्पतिशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास, वन्यजीव बचावातील प्रत्यक्ष अनुभव आणि समाजाशी सहज संवाद साधण्याची क्षमता, यांचा दुर्मीळ संगम ज्यांच्यात पाहायला मिळतो, अशा आकाश तानाजी राऊत यांनी सह्याद्रीच्या कुशीत निसर्गसंवर्धनाची एक वेगळी वाट निर्माण केली आहे. वन्यजीवांचे रक्षण, वनस्पतींचा सखोल अभ्यास, दुर्गम डोंगरदर्‍यांतील भटकंती, जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण आणि विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न यांमुळे त्यांनी अभ्यासक आणि संवर्धन कार्यकर्ते अशी दुहेरी ओळख मिळवली आहे.
 
मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे असलेल्या आकाश यांचा जन्म दि. ११ मे १९९२ रोजी सातारा येथे झाला. शालेय शिक्षण सातार्‍यामधील रहिमतपूर, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. आज हजारो सर्पांचे रेस्यू करणार्‍या आकाश यांना बालपणी सापांची भीती वाटायची. मात्र, सातवीत शिकत असताना घडलेल्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याला कायमचे वेगळे वळण दिले. गावात आलेल्या एका धामण सापाला ठार मारण्यासाठी ग्रामस्थ जमले होते. त्या गर्दीत विजयराव माने काका यांनी पुढाकार घेत सापाचे प्राण वाचवले आणि आकाश यांनाही त्यात सहभागी करून घेतले. धामणला जंगलात सोडताना तिच्या डोळ्यांत दिसलेला असाहाय्यतेचा भाव आकाश यांच्या मनावर कोरला गेला. त्या एका क्षणाने भीतीचे रूपांतर कुतूहलात आणि कुतूहलाचे रूपांतर आयुष्यभराच्या ध्यासात झाले. सापांचे वर्तन, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व आणि वन्यजीव संरक्षण यांचा अभ्यास करण्याचा निर्धार त्यांनी याच घटनेनंतर केला.
 
या प्रवासात व्यंकटेश शेट्टी हे त्यांचे पहिले मार्गदर्शक ठरले. त्यांनी आकाशला सापांची ओळख करून दिली, सुरक्षितरीत्या हाताळण्याचे तंत्र शिकवले आणि वन्यजीवांकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची सवय लावली. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेल्यानंतर आकाशचा बराचसा वेळ कात्रज सर्प उद्यानात जाऊ लागला. तेथील अनुभवी सर्पमित्र राजन शिर्के यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. सुरुवातीला शिर्के यांनी नकार दिला; पण जवळपास तीन महिने सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर आकाश यांची जिद्द आणि शिकण्याची तळमळ पाहून त्यांनी प्रशिक्षण देण्यास संमती दिली. सुरुवातीला त्यांनी सर्पशास्त्रावरील पुस्तके वाचायला दिली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू झाले. जवळपास अडीच वर्षांच्या या प्रशिक्षणातून आकाश एक कुशल सर्प बचावकर्ता म्हणून तयार झाले.
 
विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात असताना आकाश यांची आवड प्रोफेसर डॉ. मधुकर पाताळे यांनी हेरली आणि त्यांची भेट वरिष्ठ विद्यार्थी शिवदीप डोंगरे यांच्याशी करून दिली. शिवदीप गड-किल्ल्यांवर जाऊन वनस्पतींच्या नोंदी करत असत. गड-दुर्गांच्या भटकंतीची आवड असलेल्या आकाश यांनी त्यांच्यासोबत भ्रमंती सुरू केली. याच काळात त्यांची कंदीलपुष्प अर्थात, ‘सिरोपेजिया’ या दुर्मीळ वनस्पतींशी ओळख झाली. या वनस्पतींच्या संवर्धनाचे महत्त्व समजल्यावर त्यांनी त्यांचे छायाचित्रण आणि नोंदी करण्यास सुरुवात केली. ही छायाचित्रे पाहून कंदीलपुष्पांचे अभ्यासक मयुरेश कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांची सह्याद्रीत जंगलभ्रमंती झाली आणि कंदीलपुष्पांच्या शोधाचा नवा अध्याय सुरू झाला. याच काळात वनस्पती अभ्यासक डॉ. सुहन मोहोळकर सातारा परिसरातील डोंगररांगांमध्ये ‘पीएचडी’ संशोधन करत होते. त्या अभ्यास दौर्‍यांमध्ये आकाश त्यांच्यासोबत सहभागी झाले. याकाळात त्यांना केवळ कंदीलपुष्पे किंवा ऑर्किडच नव्हे, तर असंख्य वनस्पतींच्या जगाशी परिचय झाला. सलग चार वर्षांच्या सहवासात डॉ. मोहोळकर हे त्यांचे गुरुवर्य बनले आणि वनस्पतिशास्त्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाली. सध्या आकाश ‘सह्याद्री टायगर रिझर्व’अंतर्गत राधानगरी वन्यजीव अभयारण्यात वनविभागासोबत कार्यरत आहेत. मात्र, हा प्रवास सहज नव्हता. अनेक चढ-उतार अनुभवत त्यांनी स्वतःला घडवले.
 
वन्यजीवांविषयीचे गैरसमज दूर करणे, विषारी आणि बिनविषारी सापांतील फरक समजावून सांगणे, वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी काय करावे याचे प्रशिक्षण देणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती करणे, हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे पैलू आहेत. शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा, उद्योगसंस्था आणि विविध सामाजिक व्यासपीठांवर त्यांनी शेकडो प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.अनेक संशोधन मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून, त्यांच्या संशोधन लेखांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशन झाले आहे. २०२० मध्ये ऋषिकेश उभे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ट्रान्स सह्याद्री’ मोहीमही आकाश यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
 
सह्याद्रीच्या पायवाटांवर सुरू झालेला त्यांचा हा प्रवास येत्या काळात जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आणखी व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर