॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३१॥

    09-Jul-2026
 
Adi Shankaracharya 
 
त्वयाहृत्वा वामं वपु-रपरितृप्तेन मनसा
शरीरार्धंशम्भो-रपरमपिशङ्केहृतमभूत्|
यदेतत्त्वद्रूपंसकलमरुणाभंत्रिनयनं
कुचाभ्यामानम्रं कुटिल-शशिचूडाल-मकुटम्॥२३॥

अन्वय : हे शम्भो, त्वया वामं वपुः हृत्वा अपरितृप्तेन मनसा (तव) शरीरार्धम् अपरम् अपि हृतम् अभूत् (इति) शङ्के| यत् एतत् सकलं त्वद्रूपं अरुणाभं त्रिनयनं कुचाभ्यां आनम्रं कुटिल-शशिचूडाल-मकुटं (दृश्यते, तेन एव मम एषा शङ्का दृढा भवति)|
 
शब्दार्थ : या श्लोकात आचार्य शंकर उत्प्रेक्षा अलंकाराचा अत्यंत मार्मिक वापर करून, देवी आणि शिव यांच्यातील अद्वैत तत्त्वाचे दर्शन घडवतात. वरवर पाहता हा श्लोक अर्धनारीश्वर मूर्तीचे वर्णन वाटतो, पण त्यातील गुह्य सिद्धान्त जाणणेही आवश्यक आहे.
 
पारंपरिक अर्धनारीश्वर संकल्पनेनुसार, शिव आणि शक्ती यांनी आपापले अर्धे अर्धे शरीर एकत्र करून एक संयुक्त रूप धारण केले. पण, शंकराचार्य इथे एक अत्यंत भावपूर्ण कल्पना मांडतात. देवीने शिवाचे केवळ डावे अंगच हरण केले असे नाही, तर तिचे मन इतके अतृप्त, इतके प्रेमासक्त होते की, तिने शिवाचे उरलेले उजवे अंगही व्यापून टाकले असावे, अशी शंका कवीला येते. या शंकेला पुष्टी देणारा पुरावा म्हणजे, देवी आणि शिव यांचे अस्तित्व परस्परात विरघळून गेले आहे आणि त्यांना भिन्न जाणणे अशक्य आहे. शिव हे अभ्रकाप्रमाणे शुभ्र आहेत आणि शक्ति रक्तवर्णी आहे. दोघे ऐयरूप झाल्यावर त्यांचा वर्ण अरुण झाला. अर्थात, या दोन्ही रंगाचे अनुपम मिश्रण झाला. शक्ति आणि शिव दोघेही त्रिनयन असून, दोघांच्याही मस्तकी चंद्रकोर आहे. या मिलनानंतर त्यांचे ऐयरूप तर एकत्वदर्शक आहेच, परंतु त्यानंतर शिव जरी श्वेतवर्णी दर्शवले गेले, तरी त्यांच्या भाळी चंद्रकोर आणि तृतीय नेत्र विद्यमान आहेच.
 
‘अपरितृप्तेन मनसा’ हा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वाचा. देवीचे प्रेम इतके अपरिमित, इतके अतृप्त आहे की शिवाचे अर्धे शरीर व्यापूनही तिचे समाधान झाले नाही. तिने संपूर्ण शिवतत्त्वच स्वतःत सामावून घेतले. ही केवळ शृंगारिक कल्पना नसून, प्रकृती आणि पुरुष यांच्या पूर्ण ऐक्याचे, शिव-शक्ती अद्वैताचे रूपक आहे. शाक्त दृष्टीने पाहता, शक्ती ही केवळ शिवाची अर्धांगिनी नसून, ती शिवतत्त्वालाच आपल्यात सामावणारी, प्रकाश आणि विमर्श या दोन्हींना एकवटणारी परा चेतना आहे. सैद्धांतिक पातळीवर विचार केल्यास, शिवतत्त्व हे परम सात्त्विक आणि शक्ति परम तामसी आहे. शिवाशी तादात्म्य पावल्यावर तिला या मिलनाचा कधीही शेवट होऊ नये, ही कामना आहे आणि त्यामुळे ती शिवाला सुप्त करून त्याच्यावर आरुढ होते आणि ती बहुप्रसवा होते, अर्थात ती या जगताचा अधिकाधिक विस्तार घडवते. यामुळे शिवस्वरूप अर्थात आत्मतत्त्व अधिकाधिक खंडित होईल आणि शिवाची निद्रा अधिक सघन होत जाईल. जीवांना शिवस्वरूप होण्याची कामना झाली आणि ते जर पुनश्च आत्मस्वरूपाला जाणून घेण्यास उद्युक्त झाले, तर ते शिवाशी एकरूप होतील आणि शिवतत्त्वाची निद्रिस्त अवस्था विरल होईल. हे घडू नये, म्हणून ती या जीवांवर मायापटल निर्माण करते आणि त्यांना जन्ममृत्यूच्या खेळात रममाण करते. आपण सगळे जीव मायेच्या या खेळात गुंतून पडतो.पण श्री ललिता देवीची उपासना सुरू केल्यावर, हीच जगदंबिका तुमची पावला पावलावर परीक्षा घेते आणि तुम्ही उत्तीर्ण झाल्यास, शिवस्वरूप होण्यासाठी साहाय्यसुद्धा करते.
 
काश्मीर शैव सिद्धांताच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर हा श्लोक विश्वाभास आणि विमर्श शक्तीच्या ऐय सुचवतो. शिव हा प्रकाश (शुद्ध चैतन्य) आणि देवी ही विमर्श (त्या चैतन्याची स्वतःला जाणण्याची शक्ती) या दोन्ही मुळात एकच तत्त्व आहेत. देवीने शिवाचे संपूर्ण रूप व्यापणे म्हणजेच, विमर्शानेच प्रकाशाला संपूर्णतः आत्मसात करणे होय. म्हणजेच शिव आणि शक्ती यांच्यात कोणताही भेद उरत नाही, हे प्रतीकात्मकरीत्या दर्शवणे आहे. वास्तव जीवनातसुद्धा विमर्श उपासक हे अधिक यशस्वी होतात. तर, प्रकाश स्वरूपाच्या उपासकांना मात्र सातत्याने स्वतःच्या सिद्धांतांप्रति असलेल्या निष्ठेची परीक्षा देत, तावून-सुलाखून आत्मउन्नतीचा मार्ग चालावा लागतो. परंतु, श्री ललितादेवीची उपासना साधकावर कृपावर्षाव करते आणि प्रकाश स्वरूप साधकालाही जगदंबा भोगमोक्षप्रदायिनी होऊन, त्याच्या आत्मउन्नतीचा मार्ग प्रशस्त करते.
 
यात आणखी अत्यंत गर्भितार्थ आहे की, देवीचे हे हरण कोणत्याही आक्रमणाचे किंवा स्पर्धेचे प्रतीक नाही. ते प्रेमाच्या पूर्णत्वाचे, समर्पणाच्या परिसीमेचे लक्षण आहे. मातृरूप देवीचे शिवावरील प्रेम इतके सर्वग्रासी आहे की, त्यात द्वैताला थारा नाही. हीच खरी सौंदर्यलहरीची मध्यवर्ती शिकवण. जिथे सौंदर्य केवळ रूपाचे नसून, तत्त्वतः दोन विरुद्ध ध्रुवांच्या, शिव आणि शक्तीच्या पूर्ण ऐयातून प्रकट होणारी अनुभूती आहे.
 
संत ज्ञानेश्वर माऊलीप्रणित ‘शिवशक्ती ऐय स्वरूप’ : ज्ञानेश्वर माऊलींनी ‘अमृतानुभव’मधील पहिलेच प्रकरण, शिव-शक्ति ऐयाला अर्पण केले आहे. शिव आणि शक्ती हे या अनंत विश्वाचे आई-बाप आहेत. परंतु, हे माता-पितृत्व कोणत्याही द्वैताच्या चौकटीत बसणारे नाही. तो एक असा अद्भुत प्रणय विलास आहे, जिथे प्रियकर आणि प्रियेमध्ये तिळाएवढाही भेद नाही. माऊली अतिशय रसाळ भाषेत सांगतात की, तो आदिपुरुष (शिव) स्वतःचाच आस्वाद घेण्यासाठी, स्वतःलाच लाडावून घेण्यासाठी, स्वानंदाच्या लहरीतून ‘शक्ती’ रूपाने नटला आहे. हे दोघे इतके एकरूप आहेत की, अर्धनारीनटेश्वराच्या रूपाप्रमाणे एकाच देहाचे दोन भाग वाटावेत; पण त्या देहाचा प्राण एकच आहे. एकाचा लोप झाला, तर दुसर्‍याचे अस्तित्वच उरत नाही, अशा अभेद्य प्रीतीचा हा दिव्य सोहळा आहे.
 
माऊली म्हणतात की, शिव आणि शक्तीचे नाते हे शब्द आणि त्याच्या कुशीत दडलेल्या अर्थासारखे आहे. अगदी तसेच, साखर आणि तिचे मधुर गोडी, कापूर आणि त्याचा सुगंधी सुवास किंवा सूर्य आणि त्याची लखलखती प्रभा यांच्यात जे अद्वैत आहे, तेच शिव-शक्तीचे मूळ स्वरूप आहे. समुद्राच्या पाठीवर उठणारी लहर जशी पाण्यापेक्षा वेगळी नसते, सुवर्णापासून घडवलेला अलंकार जसा सोन्याहून भिन्न नसतो, तशीच ही अनंत सृष्टी म्हणजे त्या चिन्मय शिवाच्या अंगावरचे शक्तीचे लेणे आहे.
 
या दिव्य दाम्पत्याच्या प्रणयक्रीडेचे वर्णन करताना, माऊलींची भाषा अधिकच रसपूर्ण होते. ते म्हणतात, हा देव आणि ही देवी एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले आहेत की, ते एकमेकांना गिळू पाहतात, पण तरीही दोघे उरतात. जेव्हा आलिंगनाचा पूर येतो, तेव्हा भोक्ता आणि भोग्य, प्रकाश आणि अंधार यांमधील सीमा पुसल्या जातात. एकाच ताटात जेवणारे आणि परस्परांच्या श्वासात श्वास मिळवून जगणारे हे अद्भुत युगुल आहे. जेव्हा सृष्टी निर्माण होते, तेव्हा तो शक्तीचा लडिवाळ विलास असतो आणि जेव्हा ही सृष्टी लय पावते, तेव्हा ती शक्ती लाजून पुन्हा शिवाच्या हृदयात गुप्त होते. हा विश्वाचा खेळ म्हणजेच, त्यांच्यातील अखंड संवादाचे आणि आनंदाचे नृत्य आहे.
 
आध्यात्मिक अनुभूतीच्या परमोच्च शिखरावरून पाहताना माऊली आपल्याला हेच समजावून सांगतात की, हे चराचर जग म्हणजे इतर काही नसून त्या शिव-शक्तीचे प्रत्यक्ष रूप आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांना दिसणारे तरंग हे पाण्याचेच असतात, त्याचप्रमाणे विश्वात जे काही दृश्य आणि अदृश्य आहे, ते त्या एकाच सच्चिदानंद शिवाचे शक्तिरूप स्पंदन आहे. जेव्हा साधकाला हा दिव्य दृष्टिकोन लाभतो, तेव्हाच त्याच्या मनातील भेदाची भिंत कोसळते. त्यानंतर त्याला संपूर्ण ब्रह्मांडात, केवळ एकाच माऊलीच्या वात्सल्याचा आणि शिवाच्या शांत प्रकाशाचा साक्षात्कार होतो.
 
ज्ञानेश्वर माऊलींचे हे ‘शिवशक्ती ऐय’ भाष्य म्हणजे, बुद्धीला थक्क करणारे, भक्तीला तृप्त करणारे आणि आत्म्याला डोलावणारे एक अनुपम रसकौतुक आहे. सृष्टीच्या कणाकणात नटलेला हा शिव-शक्तीचा महाविलास शेवटी एका शांत, अखंड आणि अद्वैत ‘अमृतानुभवात’ विरघळून जातो. जिथे केवळ एकच परमतत्त्व स्वतःच्याच आनंदात डोलते. ‘भाष्यकाराते पुसोनी वाट’ हा जो उल्लेख माऊलींनी केला, त्याचा हा रहस्यभेद. आदि शंकराचार्य आणि संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यातील साम्यस्थळे आणि आध्यात्मिक सिद्धांतांची मांडणी इतकी अभिन्न आहेत की, कधीकधी ज्ञानेश्वर माऊली हा आचार्यांचाच एखादा अवतार होता का, असाही संभ्रम निर्माण होतो.
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर