महाराष्ट्राला लाभलेले सर्वांत मोठे आध्यात्मिक वैभव म्हणजे संतपरंपरा! संतांच्या भक्तीने वारकरी संप्रदायाला अखंड चैतन्य प्राप्त झाले. चंद्रभागेच्या तीरावर टाळ-मृदुंगाच्या निनादात, ‘विठ्ठल’ नामाच्या अखंड गजरात आजही त्या परंपरेचे तेज झळाळते. या वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ म्हणजे संत निवृत्तीनाथ होय! संत ज्ञानेश्वरांना दीक्षा देणार्या त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथांचा समाधी दिन येत्या शनिवार दि. ११ जुलै रोजी. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि जीवनचरित्राचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अद्भुत कार्य निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या चार भावंडांनी केले. या चारही भावंडांमध्ये ज्येष्ठ असणारे संत निवृत्तीनाथ हे माऊली ज्ञानेश्वरांचे सद्गुरू, मार्गदर्शक आणि संपूर्ण वारकरी पंथाचे आद्यपीठ होते. त्यांच्या अलौकिक, त्यागमय आणि अध्यात्मिक जीवनाचा वेध घेणे, म्हणजेच भक्ती आणि ज्ञानाच्या एका महासागरात डुबकी मारण्यासारखे आहे.
संत निवृत्तीनाथांचा जन्म शके १११५ (इ.स. १२७३) मध्ये पैठणजवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुमिणीबाई. विठ्ठलपंतांनी संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर, गुरूंच्या आज्ञेवरून पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. त्या काळातील सनातनी समाजाने या गोष्टीला ‘संन्याशाची मुले’ म्हणून प्रचंड कडाडून विरोध केला.
निवृत्तीनाथांचे बालपण अत्यंत खडतर आणि संघर्षात गेले. समाजाकडून झालेली अवहेलना, छळ आणि बहिष्कृत जिणे जगत असतानाही, निवृत्तीनाथांच्या अंतःकरणात कधीही समाजाबद्दल आक्रस्ताळेपणा किंवा द्वेष निर्माण झाला नाही. त्यांच्या चेहर्यावर विरक्ती आणि डोळ्यांत अथांग शांतता होती. माता-पित्यांनी मुलांच्या शुद्धीपत्रासाठी पैठण गाठले; परंतु तेथेही त्यांना नकार मिळाला. शेवटी आपल्या मुलांचे भविष्य उजळ व्हावे आणि त्यांना समाजात स्थान मिळावे, म्हणून विठ्ठलपंत आणि रुमिणीबाई यांनी प्रयाग येथे त्रिवेणी संगमावर आत्मार्पण केले. माता-पित्यांच्या या महान त्यागाचा आणि विरहाचा डोंगर अवघ्या दहा-बारा वर्षांच्या निवृत्तीनाथांवर कोसळला. त्यांनी अत्यंत धैर्याने आपल्या तिन्ही लहान भावंडांना सांभाळले.
आई-वडिलांच्या जाण्यानंतर, चारही भावंडे त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी गेली. वाटेत एका रात्री वाघाने हल्ला केल्यामुळे सगळी भावंडे सैरावैरा पळाली. या गडबडीत निवृत्तीनाथ आपल्या भावंडांपासून ताटातूट होऊन, ब्रह्मगिरी पर्वतावरील एका गुहेत शिरले. ती गुहा म्हणजे, साक्षात योगिराज गहिनीनाथ यांचे निवासस्थान!
गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातील एक सिद्धपुरुष. त्यांनी बाल निवृत्तीनाथांचे तेज, त्यांची वैराग्यवृत्ती आणि आध्यात्मिक अधिकार ओळखला. त्यांनी निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची गुप्त दीक्षा दिली. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर गुरूकृपेचा अनुग्रह केला आणि त्यांना कृष्णभक्तीचा सोपा मार्ग जनमानसाला शिकवण्याची आज्ञा केली. हा अनुग्रहच पुढे, संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानामृताने न्हाऊ घालणारा ठरला.
गुरू गहिनीनाथांकडून मिळालेला ज्ञानाचा हा अनमोल ठेवा, निवृत्तीनाथांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी धाकटे बंधू ज्ञानदेव यांच्यातील अलौकिक प्रतिभा ओळखली आणि त्यांना आपला पहिला शिष्य म्हणून दीक्षा दिली. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांच्यातील नाते हे जसे बंधुत्त्वाचे होते, तसेच एका श्रेष्ठ गुरू आणि तितयाच श्रेष्ठ शिष्याचेही अद्वैत होते.
ज्ञानदेवांनी आपल्या संपूर्ण वाङ्मयात, विशेषतः ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थदीपिका) आणि ‘अनुभवामृत’ यामध्ये, गुरू निवृत्तीनाथ यांच्या चरणी अत्यंत भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला किंवा शेवटी, ज्ञानदेव आपल्या गुरूंना वंदन करायला विसरत नाहीत. ते म्हणतात,
आता अभिनव वाग्विलास|
जेणे चातुर्यासी होय सोस|
तो वंदू श्रीनिवृत्तीचरण सुरस| कृपेचा जो|
ज्ञानदेवांच्या मते, निवृत्तीनाथ हे केवळ मनुष्य नसून साक्षात शिवस्वरूप आहेत. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना समाज कल्याणासाठी, मराठी भाषेत भगवद्गीतेवर टीका लिहिण्याची प्रेरणा दिली.
निवृत्तीनाथांचे गुरू म्हणून कार्य अत्यंत व्यापक आहे. त्यांनी ज्ञानदेवांना, लोकभाषेत म्हणजेच प्राकृतात (मराठी) ज्ञान आणण्याचा आदेश दिला, जेणेकरून ते ज्ञान अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकेल. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या पाठीवर हात ठेवून, त्यांच्यातील सुप्त चैतन्याला जागे केले. त्यांनी ज्ञानेश्वरांना नेहमी नम्रतेचा आणि करुणेचा पाठ दिला. एक हजार, ४०० वर्षे जगणार्या चांगदेवांचा गर्व हरण करण्यासाठी जेव्हा ज्ञानदेवांनी भिंत चालवली, तेव्हा चांगदेवांना ‘पासष्टी’ लिहून आत्मज्ञान देण्याचे सुचवणारे निवृत्तीनाथच होते. निवृत्तीनाथांनी आपल्या शिष्याला संवादाचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये एका अत्यंत सुलभ आणि रसाळ गुरू-शिष्य संवादाची निर्मिती झाली.
शके १२१८ मध्ये अवघ्या २१व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या लाडक्या शिष्याला आणि भावाला डोळ्यांदेखत समाधीस्थ होताना पाहणे, हे ज्येष्ठ बंधू आणि गुरू म्हणून निवृत्तीनाथांसाठी अत्यंत हृदयद्रावक होते. ज्ञानदेवांच्या समाधीप्रसंगी निवृत्तीनाथांनी केलेले वर्णन, संत नामदेवांच्या अभंगातून दिसून येते. निवृत्तीनाथांचे डोळे अश्रूंनी भरले होते, तरीही त्यांनी अत्यंत धैर्याने समाधीची शिळा स्वतःच्या हाताने लावली.
ज्ञानदेवांच्या समाधीनंतर एका वर्षभरातच सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनीही आपापले देह विसर्जित केले. एकापाठोपाठ एक अशा तिन्ही भावंडांच्या विरहाने, निवृत्तीनाथांचे अंतःकरण व्याकूळ झाले. परंतु, गुरूची आज्ञा आणि वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळण्यासाठी, ते काही काळ कार्यरत राहिले. त्यांनी ज्ञानदेवांच्या समाधीनंतर, वारकरी संप्रदायाला धीर दिला. नामदेव महाराजांच्या साथीने त्यांनी भक्तीचा प्रचार चालू ठेवला. त्यांच्या अभंगवाणीत या काळातील विरहाचा, भगवंताच्या भेटीचा आणि विरक्तीचा उत्कट भाव पाहायला मिळतो. त्यांनी रचलेले अभंग आजही भक्तांच्या मनाला स्पर्शून जातात.
निवृत्तीनाथांचे या जगातील कार्य पूर्ण झाले होते. त्यांनी त्र्यंबकेश्वर हीच आपली तपोभूमी निवडली. ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या सान्निध्यात त्यांना गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला, त्याच पवित्र भूमीत त्यांनी समाधी घेण्याचे निश्चित केले. शके १२१९ (इ.स. १२९७) मध्ये, ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. त्या दिवसाला भागवत एकादशी असे संबोधले जाते. संत नामदेवांनी निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचे अतिशय कारुण्यपूर्ण आणि भावूक वर्णन केले आहे. संपूर्ण सृष्टी हेलावली होती, वारकरी अश्रू ढाळत होते आणि निवृत्तीनाथ शांतपणे ब्रह्मीभूत झाले.
संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे मूळ बीज आहेत. त्यांनी पेरलेल्या बीजातूनच ज्ञानेश्वरांसारखा वटवृक्ष बहरला, ज्याच्या सावलीत आजही लाखो वारकरी सुखावत आहेत. निवृत्तीनाथांचे जीवन हे त्याग, सोशिकता, गुरूभक्ती आणि अथांग ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यांनी स्वतः मागे राहून आपल्या शिष्याला (ज्ञानदेवांना) जगासमोर आणले, हे एका खर्या गुरूचे लक्षण आहे. त्र्यंबकेश्वर येथील त्यांची समाधी आजही लाखो भक्तांना शांती, भक्ती आणि वैराग्याची प्रेरणा देत उभी आहे. अशा या महान सद्गुरूंना आणि संतांना कोटी कोटी प्रणाम!
श्री ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा,
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा|
मच्छिंद्र तयाचा दास झाला॥
मच्छिंद्राने उपदेश गोरक्षासि केला|
गोरक्षवोळलागहिनीप्रति॥
गहिनीप्रसादेनिवृत्तीदातार|
ज्ञानदेवा सार चोजविले॥
- आसावरी पाटणकर