अविश्वसनीय...

    09-Jul-2026   


Argentina vs Egypt World Cup
 
आमच्या पिढीने चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडताना; इतिहास घडताना पाहिले; मंगळावर उतरलेले यान पाहिले; पेजरपासून स्मार्टफोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा तंत्रज्ञानाचा चमत्कार अनुभवला; जग अक्षरशः बदलताना पाहिले.
 
पण या सर्व अविश्वसनीय घटनांच्या मालिकेत काल रात्री आणखी एका क्षणाची नोंद झाली.
 
होय, आमच्या पिढीने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा विश्वचषकातील इजिप्तविरुद्धचा तो अविश्वसनीय पुनरागमन विजयही पाहिला.
 
दोन गोल्सनी पिछाडीवर पडलेली, पराभव जवळजवळ निश्चित झालेली आणि महानायक मेस्सीच्या हातून पेनल्टीही हुकलेली अर्जेंटिना काही क्षणांतच जिद्दीच्या, विश्वासाच्या आणि भावनेच्या बळावर उभी राहिली. ७९व्या मिनिटापासून सुरू झालेला चमत्कार अखेर अतिरिक्त वेळेत ‘एन्झो फर्नांडेझ’च्या हेडरने पूर्णत्वास गेला आणि फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अध्याय तयार झाला. हा फक्त विजय नव्हता; हा आशेचा पुनर्जन्म होता. हा त्या संघाचा संदेश होता की, अंतिम शिट्टी वाजेपर्यंत कोणताही सामना संपत नसतो. आणि हा त्या एका जादूगाराचा प्रभाव होता, ज्याचे नाव लिओनेल मेस्सी. काल मेस्सीने जगाला दाखवून दिले की, सामना अजून संपलेला नाही; कारण आम्ही तो जिंकलेला नाही!
 
संपूर्ण सामनाभर संघर्ष करणारा, पेनल्टी चुकवणारा, टीकेच्या भोवर्‍यात अडकलेला मेस्सी एका क्षणात पुन्हा नायक ठरला. एका असिस्टने, एका गोलने आणि आपल्या अढळ इच्छाशक्तीने त्याने संपूर्ण अर्जेंटिनाला पुन्हा जिवंत केले. अंतिम शिट्टीनंतर त्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू केवळ आनंदाचे नव्हते; ते सुटकेचे, संघर्षाचे आणि लाखो चाहत्यांच्या स्वप्नांचे अश्रू होते.
 
कित्येक वर्षांनी जेव्हा या विश्वचषकाची पाने उलटली जातील, तेव्हा या सामन्याचा उल्लेख केवळ ‘अर्जेंटिना ३-२ इजिप्त’ असा होणार नाही. त्याची ओळख असेल, ‘शतकातील सर्वोत्तम विजयी पुनरागमन!’ कारण, काही सामने जिंकले जातात, काही इतिहास घडवतात आणि काही पिढ्यान्पिढ्या सांगितले जातात.
 
अर्जेंटिनाचा हा विजय तिसर्‍या प्रकारात मोडतो!




संबंधित मजकूर