ताजमहालातील 'तेजो महाल' दाव्याला नवे वळण

अलाहाबाद उच्च न्यायालयाची केंद्र, एएसआयला नोटीस

    08-Jul-2026   
Taj Mahal Tejo Mahal Case
 
मुंबई : (Taj Mahal Tejo Mahal Case) ताजमहाल संकुलात 'तेजो महाल' मंदिर असल्याच्या दाव्याशी संबंधित दीर्घकालीन न्यायालयीन वादात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा हस्तक्षेप करत केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग एएसआय यांना प्रतिज्ञापत्र (काउंटर ॲफिडेव्हिट) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला.
 
याचिकाकर्त्यांनी स्थळाचे सर्वेक्षण आणि वैज्ञानिक नोंदणी करण्यासाठी अॅडव्होकेट कमिशनर नियुक्त करण्याची मागणी केली होती. ही मागणी कनिष्ठ न्यायालयांनी फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. केंद्र सरकार आणि एएसआय व्यतिरिक्त न्यायालयाने प्रतिवादी पंकज कुमार वर्मा यांनाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये आग्रा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या घोषणात्मक दाव्यापासून झाली होती. या दाव्यात 'भगवान श्री अग्रेश्वर महादेव नागनाथेश्वर विराजमान तेजो महाल मंदिर' या नावाने याचिका दाखल करण्यात आली असून, ताजमहाल संकुलाला मंदिराचे कायदेशीर स्वरूप मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.(Taj Mahal Tejo Mahal Case)
 
आग्रा न्यायालयातील सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी अॅडव्होकेट कमिशनर नियुक्त करून ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण आणि छायाचित्रण करण्याची विनंती केली होती, जेणेकरून वास्तूचे ऐतिहासिक स्वरूप निश्चित करता येईल. मात्र, ही मागणी प्रथम खटला चालविणाऱ्या न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिकाही अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ग्राह्य धरता येणार नसल्याचे सांगत फेटाळून लावली.(Taj Mahal Tejo Mahal Case)
 
याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीशंकर जैन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बाजू मांडली. त्यांनी कनिष्ठ न्यायालयांनी याचिका फेटाळण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला. वादाचे न्याय्य आणि अंतिम निराकरण करण्यासाठी स्थळाचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि छायाचित्रांसह अधिकृत नोंद करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.(Taj Mahal Tejo Mahal Case)
 
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या नव्या आदेशामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, प्रस्तावित सर्वेक्षणाबाबत केंद्र सरकार आणि एएसआय यांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे.(Taj Mahal Tejo Mahal Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर