समाजविकासाचा विधायक संकल्प

    08-Jul-2026   
 
Sakal Hindu Maratha Samaj Kurla 
 
समाजाची सर्वांगीण प्रगती ही केवळ शैक्षणिक यशावर अवलंबून नसून सक्षम महिला, संस्कारित कुटुंबव्यवस्था, जागरूक समाज आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यांच्या समन्वयातून घडत असते. या विचाराला केंद्रस्थानी ठेवत ‘सकल हिंदू मराठा समाज, कुर्ला’ यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासह महिला एकत्रीकरण संमेलनाचे नुकतेच आयोजन केले होते. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या माध्यमातून भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कारमूल्ये आणि सामाजिक ऐक्य यांवरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुटुंब प्रबोधन आणि समाजजागृती यांचा प्रभावी संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
 
कुर्ला प. येथील कच्छी विसा सभागृहात सकल हिंदू मराठा समाजाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि महिला एकत्रीकरण संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक जागरूकता आणि समाजसंघटन या पाच महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, महिला आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विधायक उपक्रमांची मालिका उभी करण्याचा संस्थेचा संकल्प या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.
 
महिला एकत्रीकरण संमेलनाच्या पहिल्या सत्रात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. मनपा अधिकारी नितीन घरत यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना, महिला बचतगटांची संकल्पना, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महिला बचतगट ही केवळ आर्थिक बचतीची व्यवस्था नसून महिलांना संघटित करून नेतृत्वक्षम बनविणारी सामाजिक चळवळ आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचणे आणि त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून आर्थिक स्वावलंबन साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
 
दुसर्‍या सत्रात रा. स्व. संघाच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीचे कोकण प्रांत संयोजक विजय शिंदे यांनी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, महिलांची मध्यवर्ती भूमिका, मुलांवरील संस्कार, कुटुंबातील संवाद, परस्पर विश्वास आणि सामाजिक जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबसंस्था अधिक सक्षम आणि संस्कारित ठेवणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या माध्यमातून कुटुंबव्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी विविध स्तरांवर जनजागृतीचे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून समाजातील इतर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
 
‘नवहिंद ज्युनिअर कॉलेज, दादर’चे प्रा. डॉ. शरद पाटील आणि अ‍ॅड. आशिष गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा-परीक्षा, उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक उत्तरदायित्व यांविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या काळात ज्ञानासोबत कौशल्य, चारित्र्य आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेले विद्यार्थी घडणे, ही समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘महिला व बालकल्याण समिती’च्या अध्यक्षा तथा नगरसेविका मीनल तुर्डे उपस्थित होत्या. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि ध्येयवादी वृत्ती यांमुळेच यशाचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन केले.
 
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या ललिता अनपट, अविनाश मोरे आणि अथर्व भोसले यांचा विशेष गौरव करण्यात आला. ‘आरोग्य सेविका’ म्हणून कार्यरत राहून ‘एम.कॉम.’, ‘एलएल.बी.’ पूर्ण करत सध्या ‘एल.एल.एम.’चे शिक्षण घेणार्‍या ललिता अनपट, संगणक अभियांत्रिकी पूर्ण करून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विश्लेषण क्षेत्रात पुढील शिक्षण घेणारे अविनाश मोरे, तसेच मुंबई संघाकडून १५ वर्षांखालील, १८ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्तरावर प्रतिनिधित्व करणारे आणि ‘एमपीएल’ स्पर्धेत गोलंदाज म्हणून खेळणारे अथर्व भोसले यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक व क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
 
मराठा समाजाच्या संघटनातून निर्माण झालेली सामाजिक शक्ती विधायक कार्यात रूपांतरित करण्याचा सकल हिंदू मराठा समाजाचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आला. शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, क्रीडा, कला, सामाजिक प्रबोधन आणि युवक विकास या क्षेत्रांमध्ये संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असून समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
 
या कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन सकल हिंदू मराठा समाज, कुर्ला यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी समन्वयपूर्ण नियोजनातून केले. समाजहिताच्या विविध उपक्रमांना सातत्याने चालना देण्याची संस्थेची कार्यतत्परता या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली.
 
याच सत्रात महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध सामाजिक प्रश्नांवरही चर्चा झाली. बदलत्या सामाजिक परिस्थितीत तरुणींनी आणि पालकांनी अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता उपस्थितांनी व्यक्त केली. चर्चेदरम्यान ‘ऊर्जा ट्रस्ट’ या नावाने कार्य करणार्‍या एका संस्थेबाबत एका महिलेने स्वतःचा अनुभव मांडला. त्यांच्या कथनानुसार, त्यांच्या मुलीचा त्या संस्यथेशी संपर्क आल्यानंतर ती घरापासून दूर गेली आणि त्यानंतर तिच्याशी संपर्क तुटल्याचा त्यांचा दावा आहे.
 
मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. या अनुभवाच्या आधारे कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीशी संपर्क साधताना संपूर्ण माहिती घेणे, कुटुंबीयांशी सातत्याने संवाद ठेवणे, कोणताही निर्णय घाईने न घेणे आणि आवश्यक वाटल्यास संबंधित शासकीय यंत्रणांची मदत घेणे, अशी भूमिका चर्चेत मांडण्यात आली. या विषयावर मांडण्यात आलेले विचार हे चर्चासत्रातील सहभागींची मते असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
 
मराठा समाजाचे संघटन केवळ एखाद्या मागणीपुरते मर्यादित राहू नये, तर शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवकांना दिशा, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक उत्तरदायित्व या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचे कायमस्वरूपी व्यासपीठ बनावे, हा सकल हिंदू मराठा समाजाचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सहभागी करून विधायक परिवर्तन घडविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने उभारणी केली जाईल. -विवेक चव्हाण, अध्यक्ष, सकल हिंदू मराठा समाज, कुर्ला
 
९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर