मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्रावरील तीव्र वाऱ्यांच्या प्रभावामुळे यंदा अनेक दुर्मीळ समुद्री पक्ष्यांनी किनारा गाठला आहे (rare pelagic bird). टोकदार शेपटीचा समुद्रचोर (
Pomarine Skua), तपकिरी डोलमान्या (
Brown Noddy), पांढऱ्या गालाचा सुरय (
White-cheeked Tern) यांसारख्या दुर्मीळ पक्ष्यांच्या नव्या नोंदी मुंबईतून झाल्या आहेत (rare pelagic bird). त्यामुळे पक्षीनिरीक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. (rare pelagic bird)
मुंबई महानगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अरबी समुद्रातील तीव्र वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक दुर्मीळ समुद्री पक्ष्यांच्या नोंदी होत आहेत. दुर्मीळ समुद्री पक्षी मुंबईच्या किनारी प्रदेशात घिरट्या घालताना दिसत असल्याने पक्षीनिरीक्षकांची पावले कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, ससून डॉक आणि रेडिओ क्लब परिसराकडे वळली आहेत. या दुर्मीळ पाहुण्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी दररोज अनेक छायाचित्रकार आणि पक्षीप्रेमी दक्षिण मुंबईत गर्दी करत आहेत. यामध्ये खोल समुद्रात आढळणाऱ्या दुर्मीळ समुद्री पक्ष्यांच्या नोंदी विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. या पक्ष्यांचे निरीक्षण पक्षीनिरीक्षक मयुरेश परब यांनी केले असून, चंद्रिका खिराणी, कल्याणी कापडी, प्रज्ञावंत माने, आदेश शिवकर, सुशांत जाधव, आलोक भावे, तुषार अभ्यंकर, शंतनू मुजुमदार आणि यश कंजारिया यांनीही संयुक्तपणे या दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत.
समुद्री पक्षी हे सहसा खोल समुद्रात राहणारे पक्षी असून ते मुख्य भूमीवर क्वचितच दिसतात. त्यांची वीणवसाहत समुद्रातील दूरवरच्या बेटांवर असते. मात्र, पावसाळ्यात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र, चक्री वारे आणि जोरदार पावसामुळे हे पक्षी समुद्रातून भरकटून किनाऱ्याजवळ किंवा शहरांमध्ये येतात. काही पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसतात, तर काही जखमी अवस्थेत जमिनीवर आढळून येतात, अशी माहिती पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी दिली. टोकदार शेपटीचा समुद्रचोर (Pomarine Skua), तपकिरी डोलमान्या (Brown Noddy) अशा प्रकारचे पक्षी हे खोल समुद्रात असणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या परिणामीच किनारी भागात आले आहेत.
हे पक्षी कोण आहेत?
■ टोकदार शेपटीचा समुद्रचोर
उत्तर ध्रुवीय (आर्क्टिक) प्रदेशात प्रजनन करणारा हा मोठा समुद्री पक्षी स्थलांतराच्या काळात हिंदी महासागरातून प्रवास करतो. इतर समुद्री पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडील मासे हिसकावून घेण्याची त्याची खास सवय आहे. खोल समुद्रात राहणारा हा पक्षी किनाऱ्यावर अत्यंत क्वचितच दिसतो. त्यामुळे मुंबईतील त्याची नोंद विशेष महत्त्वाची मानली जाते.
■ तपकिरी डोलमान्या
तपकिरी रंगाचा मध्यम आकाराचा हा समुद्री पक्षी प्रामुख्याने मालदीव, सेशेल्स, लक्षद्वीप आणि हिंदी महासागरातील इतर बेटांवर वीण करतो. तो बहुतेक वेळ समुद्रावरच घालवतो आणि लहान मासे व स्क्विड यांवर उपजीविका करतो. मुख्य भूमीवर तो अत्यंत दुर्मीळ पाहुणा असून, वादळी हवामानातच किनाऱ्यावर येण्याच्या घटना घडतात.
■ पांढऱ्या गालाचा सुरय
गालांवरील पांढऱ्या रंगामुळे सहज ओळखता येणारा हा देखणा समुद्री पक्षी अरबी समुद्र, लाल समुद्र आणि पर्शियन आखात परिसरात आढळतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर तो समुद्रात दिसत असला तरी मुंबई शहरात त्याची नोंद तुलनेने दुर्मीळ मानली जाते. हा पक्षी पाण्याच्या पृष्ठभागाजवळ झेपावत लहान मासे पकडण्यात तरबेज आहे.