राम मंदिरातील दानवस्तू चोरीचा दावा खोटा; ट्रस्टचा पत्रकार परिषदेत खुलासा

    08-Jul-2026   
Ram Mandir Donation Controversy

मुंबई : (Ram Mandir Donation Controversy) अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानातील वस्तू गायब झाल्याच्या आरोपांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ट्रस्टने पत्रकार परिषदेत सुमारे ५ कोटी रुपये मूल्याची सोन्याची रामचरितमानस, चांदीच्या विटा आणि भगवान श्रीरामांच्या सुवर्ण चरणपादुका सर्वांसमोर सादर करून आरोप फेटाळून लावले.
 
ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी स्पष्ट केले की, दानात प्राप्त झालेली प्रत्येक वस्तू पूर्णपणे सुरक्षित असून चोरीचे सर्व आरोप निराधार आहेत. त्यांनी दानातून मिळालेल्या २,८०० वस्तूंची अधिकृत नोंद असलेली नोंदवहीही पत्रकारांसमोर सादर केली. माजी आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन यांनी त्यांनी अर्पण केलेली सुमारे ५ कोटी रुपये किमतीची सोन्याची रामचरितमानस गायब झाल्याचा आरोप केला होता. हा वाद संपवण्यासाठी ट्रस्टने पत्रकार परिषदेत ती मौल्यवान सोन्याची रामचरितमानस प्रत्यक्ष सर्वांसमोर ठेवली. यासोबतच भगवान श्रीरामांच्या सुवर्ण चरणचिन्हे, सुवर्णहार आणि काकभुशुंडी यांची प्रतिकृतीही प्रसारमाध्यमांना दाखविण्यात आली.(Ram Mandir Donation Controversy)
 
सोशल मीडियावर अफवा पसरल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीने तपास सुरू केला. प्राथमिक अहवालात असे स्पष्ट झाले की, भाविकांनी दान केलेल्या सुमारे ३८ किलो आणि २२.५ किलो वजनाच्या चांदीच्या विटांची ट्रस्टच्या नोंदींमध्ये व्यवस्थित नोंद असून त्या सुरक्षित आहेत.(Ram Mandir Donation Controversy)
 
तपास अहवालानुसार, दानात मिळालेल्या काही चांदीच्या विटा नंतर वितळविण्यात आल्या होत्या. त्या सुरक्षित स्वरूपात जतन करण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेची संपूर्ण कायदेशीर नोंद उपलब्ध असल्याचे ट्रस्टने सांगितले. तसेच, मुंबईतील एका उद्योगपती आणि सिंधी समाजाने दान केलेली २०० किलो चांदी देखील ट्रस्टच्या ताब्यात सुरक्षित असल्याचे तपासात स्पष्ट झाले.(Ram Mandir Donation Controversy)
 
ट्रस्टची पुढील बैठक २२ जुलै रोजी होणार असून, तोपर्यंत एसआयटीचा अंतिम अहवालही सादर होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत राम मंदिरासाठी नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची तसेच काही नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.(Ram Mandir Donation Controversy)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर