मुंबई : (Mumbai Rain Update) गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, हवामान विभागाने जुलैअखेरपर्यंत एक-दोन वेळा पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या पावसापासून दिलासा मिळाला असला तरी साचलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारींमध्येही वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील आठ दिवसांच्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिससारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.(Mumbai Rain Update )
पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब, कावीळ किंवा इतर संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसल्यास उपचारात विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वेगाने वाढते. त्यामुळे घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे, अन्न झाकून ठेवावे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.(Mumbai Rain Update )
डासांच्या प्रतिबंधासाठी पालिकेने फॉगिंग, कीटकनाशक फवारणी तसेच जनजागृती मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे. नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवून आरोग्यविषयक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी आता संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.(Mumbai Rain Update )