मुंबई : ( Ritu Tawde) गेल्या सहा दिवसांतील मुसळधार पाऊस, ताशी वेगाने वाहणारे वारे आणि समुद्रातील हाय टाईड यांच्या तिहेरी परिणामामुळे मुंबईत तब्बल ११०० झाडे उन्मळून पडली असून, या दुर्घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर यातील झाडे अंगावर पडल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. मात्र, या घटनांसाठी वृक्षछाटणीला जबाबदार धरणे चुकीचे असून, शहरातील वाढते काँक्रिटीकरण हे झाडे पडण्यामागील प्रमुख कारण असल्याचा दावा त्यांनी केला.
तावडे म्हणाल्या की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते आणि पेव्हर ब्लॉक करण्यात आल्याने झाडांच्या मुळांभोवती काँक्रिटचे आवरण तयार झाले आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना माती, पाणी आणि हवा मिळत नसल्याने त्यांचा "श्वास कोंडला" जात आहे. परिणामी, वरून निरोगी दिसणारी झाडेही आतून कमकुवत होऊन वेगवान वाऱ्यात उन्मळून पडत आहेत. याची दखल घेत झाडांच्या बुंध्याभोवतीचे काँक्रिट काढून तेथे मातीचे आळे तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने १ लाख ३ हजार झाडांची छाटणी केली असल्याचे सांगत, "झाडे पडली म्हणजे छाटणी झाली नाही, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही," असे तावडे म्हणाल्या. वॉर्ड क्रमांक १३२ मधील वडाचे झाड याचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, ते झाड पूर्णपणे निरोगी होते. मात्र, मुसळधार पाऊस आणि अतिवेगवान वाऱ्यामुळे ते मुळासकट उन्मळून पडले.: (Ritu Tawde)
सध्या वाकलेल्या (टिल्ट) झाडांचे गुगल मॅपिंग करून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अशा झाडांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी इशारा फलक लावण्यात आले असून, त्याचा अर्थ झाड पडणार आहे असा नसून नागरिकांनी अशा झाडांखाली उभे राहू नये किंवा वाहने उभी करू नयेत, एवढाच त्यामागील उद्देश असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.: (Ritu Tawde)
वृक्षछाटणीच्या कामातही सुधारणा करण्यात येणार असून, एका बाजूचीच जास्त छाटणी केल्यामुळे झाडांचा तोल बिघडू नये यासाठी कंत्राटदारांच्या कामावर अधिक प्रभावी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या 'वृक्ष संजीवनी अभियान' अंतर्गत आतापर्यंत ३ हजार २४० झाडांमधून सुमारे ५० किलो खिळे काढण्यात आले, तर एक हजारांहून अधिक झाडांभोवतीचे काँक्रिट हटवून माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. झाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे अभियान सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.: (Ritu Tawde)
विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या टीकेलाही तावडे यांनी प्रत्युत्तर दिले. "मुंबईकर सुज्ञ, सतर्क आणि चाणाक्ष आहेत. इशारा फलकांचा गैरअर्थ काढण्याची गरज नाही. हे फलक केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत. अशा विषयांवर बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नाही," असा टोला त्यांनी लगावला.: (Ritu Tawde)
झाड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना महापालिकेकडून ५ लाख रुपयांची मदत दिली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच १९१६ हेल्पलाइन, 'माय बीएमसी' पोर्टल आणि एसएमएस अलर्टद्वारे नागरिकांना सातत्याने सावधगिरीच्या सूचना दिल्या जात असून, मुसळधार पावसाच्या काळात झाडांखाली थांबणे, समुद्रकिनारे आणि नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.: (Ritu Tawde)