मुंबई : (Malad School Conversion Case) मुंबईतील मालाड पश्चिम येथील रिजॉयस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना कार्यक्रमात धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा मुद्दा भाजप आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. यासंबंधी प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
आ. अतुल भातखळकर यांनी मालाड पश्चिममधील एका शाळेत धर्मांतर करण्याचा प्रकार सुरु असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "याप्रकरणातील संबंधित आरोपीला अटक केली का? या शाळेवर काय कारवाई होणार? या प्रकरणाची पुन्हा एकदा तपासणी करणार का? आणि शाळांमध्ये असे प्रकार होऊ नये, याबाबत सरकार अधिक कठोर सूचना देणार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.(Malad School Conversion Case)
यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, "मालाड पश्चिम येथील रिजॉईस इंटरनॅशनल स्कुल या शाळेत १० मे रोजी एका प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवून मी तुमचे आजार बरे करतो, तुमच्या जीवनातील दु:ख दूर करून देतो, असे वक्तव्य केले. परंतू, याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी साक्षीदारांचे जबाब घेतले असता त्यांना कुठेही आपला धर्म बदलवण्याबाबत सांगण्यात आले नाही. मात्र, आपल्या घरात देवी-देवतांचे फोटो लावण्यात येऊ नये, असे तक्रारदाराला सांगण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. या अनुषंगाने प्रार्थनेकरिता जमलेल्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली."(Malad School Conversion Case)
धर्मपरिवर्तन केल्याचे आढळून आले नाही
"त्यामुळे याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात कलम २९९, ३(५) आणि सहकलम ३ (२) या महाराष्ट्र नरबळी तसेच इतर अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा या अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणातील लोक हिंदू आहेत आणि कार्यक्रमाचे आयोजन करणारा व्यक्तीदेखील हिंदू आहे. त्यामुळे धर्मपरिवर्तन केल्याचे कुठेही आढळून येत नाही. मात्र, यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच शाळांमध्ये अशा पद्धतीचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात येतील," असेही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.(Malad School Conversion Case)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....