मुंबई : (Ministers absent in Assembly) विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्तावावरील चर्चा सुरु असताना संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिवरून बुधवारी गदारोळ झाला. यावर विधानसभा अध्यक्षांनी संताप व्यक्त करत सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकुब केले. तसेच पुढच्या अर्ध्या तासात मुख्य सचिवांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले.
गॅलरीमध्ये अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, "ही गॅलरी अदृष्य आहे. महाराष्ट्राचा एवढा अवमान करू नका. चार चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करून लोक इथे येतात आणि पोटतिडकीने बोलतात पण, त्यांचे ऐकायला इथे कुणीही नाही. सभागृह पाच मिनिटांसाठी तहकुब करा आणि अधिकाऱ्यांना ताकीद द्या. या सभागृहाचा तमाशा लावला आहे. आम्ही आमच्या प्रस्तावात जे विषय दिले त्यातील एकही मंत्री इथे उपस्थित नाही. मंत्र्यांच्या आणि सचिवांच्या उपस्थितीसंदर्भात आतापर्यंत पाचवेळा निर्देश देण्यात आले आहेत. तरीही अध्यक्षांच्या निर्देशांचे पालन होत नाही. त्यामुळे संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलवा आणि तोपर्यंत दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा," अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर मंत्र्यांना निरोप दिले असून ते ताबडतोब येतील, असे अध्यक्षांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारे कामकाज रेटून नेणे योग्य नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. यानंतर सभागृहाची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली. (Ministers absent in Assembly)
अध्यक्षांचा संताप
विधानसभेत नियम २९३ अन्वये प्रस्ताव चालू असताना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केला. "सभागृहात घडलेला प्रकार ही अवमानास्पद घटना आहे. या सभागृहात आतापर्यंत मंत्री उपस्थित नाही म्हणून आपण सभागृह तहकुब केले. आता मंत्री सोडा पण अधिकारीसुद्धा गॅलरीत बसायला तयार नाहीत. मंत्रालयात ११० सचिवांना सरकार वेतन देते, त्यातील ४ सचिवही सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत का? पुढच्या अर्ध्या तासात राज्याच्या मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन गॅलरीत बसावे. तसेच संसदीय कार्यमंत्र्यांनी याची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी. आतापासून यापुढे अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात मंत्र्यांची योग्य ती उपस्थित नसेल आणि संबंधित अधिकारी नसतील तर, दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात येईल," असे निर्देश त्यांनी दिले.(Ministers absent in Assembly)
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सभागृहात उपस्थित झाले. सभागृह पुन्हा चालू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्री तेथे गेल्याची माहिती सभागृहात दिली. त्यावर राहुल नार्वेकर यांनी सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही, असे स्पष्ट केले. (Ministers absent in Assembly)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....