दमास्कस : (Emmanuel Macron Syria Visit) फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांच्या सीरिया दौर्यादरम्यान मंगळवार दि. 07 जुलै रोजी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये दोन स्फोट झाल्याने, तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्फोटांमध्ये 18 जण जखमी झाले असून, त्यात चार पोलिसांचाही समावेश आहे. स्फोटांच्या वेळी मॅक्रॉन हे सीरियाच्या राष्ट्रपती भवनात, राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांच्यासोबत चर्चेत असल्याने फ्रेंच शिष्टमंडळाला कोणतीही ईजा झाली नाही.
दमास्कसमधील फोर सीझन्स हॉटेल परिसर आणि पर्यटन मंत्रालयाजवळ हे स्फोट झाले. स्फोटानंतर परिसराची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली असून, जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी, तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.(Emmanuel Macron Syria Visit)
बशर अल-असद यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर, एखाद्या प्रमुख युरोपीय राष्ट्रप्रमुखाचा हा पहिलाच सीरिया दौरा आहे. सोमवार दि. 06 जुलै रोजी दमास्कस विमानतळावर सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद अल शैबानी यांनी मॅक्रॉन यांचे स्वागत केले. त्यानंतर मॅक्रॉन यांनी राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक उमय्याद मशिदीला भेट दिली. या भेटीकडे सीरियाची पुनर्बांधणी, आर्थिक सहकार्य आणि नव्या सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवर वैधता मिळवून देण्याच्या दृष्टीने बघितले जात होते. मात्र, या स्फोटांमुळे, सीरियातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले.(Emmanuel Macron Syria Visit)
हे स्फोट गेले काही दिवस सातत्याने सीरियामध्ये होत असलेल्या हिंसक घटनांच्या मालिकेचा भाग असल्याचे मानले जात आहे. दि. 3 जुलै रोजीही दमास्कच्या पॅलेस ऑफ जस्टीसजवळ स्फोट झाला होता. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी झाले होते. या दहशतवादी कारवांमुळे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांनी सीरियामध्ये स्थैर्य प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त केला असला, तरी दहशतवादी गट अस्तित्व आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे हे कार्य आव्हानात्मक असल्याचेच चित्र आहे.(Emmanuel Macron Syria Visit)