नाचता येईना...

    08-Jul-2026   

Lonavala Landslide Missing Link
 
परवा लोणावळ्यातील विक्रमी पावसामुळे (एका दिवसात ६०० मिमीपेक्षा अधिक) मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्याबाहेर दरड कोसळली आणि राज्यातील फडणवीसविरोधी टोळीला आनंदाच्या जणू उकळ्याच फुटल्या. या कामांमध्ये कसा भ्रष्टाचार झाला, कामाचा दर्जा कसा राखला गेला नाही, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच कसा सुरक्षित नव्हता, म्हणून तो काँग्रेस सरकारने बासनात गुंडाळला वगैरे वगैरे अपप्रचारातून फडणवीसांवर टीकेची अक्षरश: झोड उठण्यात आली. पण, फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले आणि अधिकार्‍यांच्या मदतीने परवा रात्रीच ‘मिसिंग लिंक’ पुन्हा प्रवाशांच्या सेवेत तत्परतेने दाखल करुन विरोधकांना प्रत्यक्ष कृतीतून चपराक लगावली.
 
उबाठाचे बोलघेवडे खासदार संजय राऊत यांनी तर, "फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिन्याभरात कोसळतात,” असे आपल्या वाचाळ वाणीला शोभेल असेच वक्तव्य केले. पण, राऊतांना मुंबई पालिकेतील २५ वर्षांच्या ठाकरेंच्या काळातील सर्वांगीण दुरवस्थेचा आणि अडीच वर्षांच्या ठाकरेंच्याच मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील गैरव्यवस्थापन आणि घोटाळ्यांचा साफ विसर पडलेला दिसतो. महापालिकेत ठाकरेंचीच सत्ता असताना महापूरही आले; खड्ड्यात पडून, मॅनहोलमध्ये पडून, झाडे-इमारती कोसळून मुंबईकरांचे मृत्यूही झाले. २०१७ साली ठाकरेंनीच मुंबईची ‘तुंबई’ झाल्यावर नऊ किमी उंचीच्या ढगांवर त्याचे खापर फोडले होते. एवढेच नाही, तर ठाकरे मुख्यमंत्री असताना ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ चक्रीवादळाचांही मुंबईसह कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला होता. तेव्हा ठाकरेंनी किती दिवसांनी बाधित भागाचे दौरे केले आणि ते दौरेही किती तासांत आवरते घेतले, गरजूंना किती दिवसांत मदत मिळाली, याची राऊतांनी जरा माहिती घ्यावी. अगदी ‘कोविड’च्या काळातही उबाठा सेनेने भ्रष्टाचार करून मृतांच्या ‘टाळूवरचे लोणी खाल्ले.’ बॉडी बेग, खिचडी, जंबो कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन आणि अन्य वैद्यकीय सामग्रीच्या खरेदीतही अनियमितता समोर आली. एवढेच नव्हे, तर ठाकरेंच्या स्थगिती धोरणामुळे विकास तर झाला नाहीच; उलट महाराष्ट्राचा विकासरथ खड्ड्यांतच रुतून बसला. त्यामुळे ‘नाचता येईना...’ अशीच उबाठाची केविलवाणी अवस्था!
 
अंगण वाकडे...
 
भारतात जेव्हा-जेव्हा जनआंदोलनाचा उल्लेख होतो, तेव्हा-तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव आजही तितक्याच आदराने घेतले जाते. कारण, अण्णा हजारेंनी अहिंसक आंदोलनाचा वस्तुपाठ तर घालून दिलाच. शिवाय, जनशक्तीची ताकद काय असते, हेही तत्कालीन काँग्रेस सरकारला दाखवून दिले. आज खरेतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या नावाखाली आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचूकही अण्णांच्या पावलांवर पाऊल टाकूनच या आंदोलनात उतरले आहेत. पण, ‘सीजेपी’चा म्होरक्या अभिजित दीपकेला जेव्हा नुकताच अण्णांविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा, "म्हातार्‍या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं,” असे उर्मट आणि कुत्सित उत्तर दीपकेने दिले. त्यावरून दीपकेवर अण्णांचा द्वेष करणार्‍या केजरीवाल आणि ‘आप’च्या टोळीचा दुष्प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवतो.
 
‘सीजेपी’चे आंदोलन दीपके म्हणतो तसे ‘जेन-झी’चे. पण, तसे असेल तर ५९ वर्षीय सोनम वांगचूक यांना दीपकेने आमरण उपोषणाला का बसविले? तरणाताठा दीपके स्वत:च उपोषणाला का बसला नाही? तर, दीपकेनेच त्याचे उत्तर मागे एका मुलाखतीत दिले की, "मला भूक सहन होत नाही. मी लगेच डोके धरून बसतो.” आता तोच दीपके "मीही आमरण उपोषणाला बसलो, तर आंदोलन कसे पुढे चालणार,” अशी सारवासारवही करताना दिसतो. त्यामुळे जंतरमंतरवर आंदोलन कमी आणि ‘जेन-झी’मधील फुकट्यांची दोनवेळचे आयते गिळण्यासाठीच ताराबंळ अधिक, असे एकूणच चित्र! खरेतर ‘सीजेपी’च्या आंदोलनात कोण हवे, कोण नको, हा दीपकेचाच निर्णय. परंतु, अण्णांचा असा अनादर करून त्यांना अपमानित करण्याची दीपकेची पात्रता आहे का? म्हणूनच, दीपकेला मुद्दाम सांगावेसे वाटते की, दिल्लीत त्याचे आंदोलन चालू असतानाच, महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार नियमावलीत केलेले बदल मागेही घेतले. त्याचे कारण ठरले अण्णांनी राज्य सरकारला दिलेला इशारा! अण्णांनी कमावलेले हे संचित असून, त्यांच्या शब्दांना मान, अजूनही किंमत आहे. तेव्हा, अण्णांना निवृत्तीचा सल्ला देण्याची भाषा करणार्‍यांनी, आधी यशस्वी आंदोलनाची बाराखडी अण्णांकडून समजून घेतली असती, तर कदाचित ‘जेन-झीं’चे असे ‘अंगण वाकडे’ झाले नसते.




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर